शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

थांबवा हा उन्माद


दहीहंडीच्या सरावादरम्यान सानपाड्यात १४ वर्षांच्या बालगोविंदाला पाचव्या थरावरून पडल्यामुळे जीव गमवावा लागला. किरण तळेकर या लहानग्याला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी या खेळाबाबत संताप व्यक्त केला. पण आपल्या मुलाला अशा जीवघेण्या खेळाकडे जाण्यापासून रोखण्याची जबाबदारीच खरं तर त्यांची नव्हती का?
या घटनेआधीच तीन दिवस मुंबईत करी रोड येथील एक तरुण थरावर पडला आणि मानेला गंभीर जखम झाली. त्याच्यावर ऑपरेशन करण्याची वेळ आली. या घटनेनंतरही बालगोविंदांना दहीहंडीत खेळवायचेच, राजकीय आग्रह, मंडळाची हटवादी भूमिका हे सारं सुरू झालं. दुर्घटनेनंतरही आत्मपरीक्षण करण्याचा विचार नाही, इतका हा उन्माद फोफावला आहे.
छोट्या वाडीमध्ये, चाळीमध्ये वेगवेगळ्या घरातील मुलांनी, तरुणांनी एकत्र येत दोन तीन थरांची छोटेखानी दहीहंडी रचत, या सणाचे मर्म असलेल्या मस्त दहीकाल्याचा आस्वाद घ्यावा, इतकं माफक खरं तर या सणाचे महत्त्व. छोट्याशा हंडीत असणारा इतकासा कालाही सगळ्यांनी वाटून घेत खाण्याची सवय लावणारा आणि देण्यातील आनंद शिकवणारा हा सण. त्यातही एकमेकांवर थर लावताना दुसऱ्याबाबत असलेला विश्वास, खात्री दृढ व्हावी, जबाबदारी घेण्याची सवय लागावी, असाही एक त्यामागचा दृष्टिकोन. पण काळानुरूप जसे इतर सणांचे अवडंबर माजून त्यामागचा मूळ दृष्टिकोन लयास गेला. तसेच दहीहंडीचे झाले. या सणातील दहीकाल्याची मुलांना वाटणारी मजा जाऊन त्याची जागा आधी स्पर्धेने आणि आता राजकीय चढाओढीने घेतली आहे. निखळ आनंदाऐवजी त्यात पैशाची बाजू वरचढ झाली.
दहीहंडीमध्ये या आर्थिक स्पर्धेबरोबरच थरांच्या उंचीची स्पर्धाही रंगू लागली. नऊ, दहा अशा या थरांसाठी मग लहान मुलांचा सहभागही अपरिहार्य झाला. अगदी तीन वर्षांपासूनच्या मुलांनाही या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाऊ लागले. वजनाने हलकी असलेली ही मुले वरच्या थरांसाठी उपयुक्त ठरू लागली आणि लहान मुलांना वेठीस धरण्याची स्पर्धाच जणू मंडळांमध्ये लागली.
दहीहंडीचे राजकीयीकरण झाल्यापासून त्याचे स्वरूपच बदलले. आधी मैदानात होणाऱ्या हंड्या आता रस्त्यावर, चौकाचौकात आल्या. त्यामुळे या खेळासाठी आवश्यक नियम, जागा, पद्धती सगळ्यांनाच फाटा दिला गेला. कुठल्याही खेळाच नियम असतात. त्यासाठी खास सुरक्षेची तयारी करावी लागते, ही बाब विसरून त्याचे उन्मादात रूपांतर झालेय आणि त्यामुळेच कुणीही जखमी होवो, कायमचे अपंगत्व येवो किंवा काही, आम्ही बदलणार नाही, अशी पद्धती आता रूढ झाल्याने लहान मुलांसह तरुणांचे जीव या खेळात टांगणीला लागत आहेत.
दहीहंडीच्या या स्वरूपाविरोधात अनेकांनी कोर्टात धाव घेतली. माध्यमातून चर्चा झाल्या. कुणी उघडपणे तर कुणी मनातून सध्या सण ज्या पद्धतीने साजरा होतो, त्या पद्धतीला विरोध करू लागले. त्यांच्यातीलच एक असलेल्या पवनकुमार पाठक यांनी बालहक्क आयोगाकडे मुलांच्या हिताच्या दृष्टीने धाव घेतली. या खेळात लहान मुलांच्या सुरक्षेचा कोणताही विचार होत नाही. लहान वयात झालेल्या इजांचे आयुष्यभर परिणाम भोगावे लागतात, कुणाला कायमच अपंगत्व येऊ शकतं, तसेच उंचीवरून पडल्याने असणारा मानसिक धक्काही मोठा असतो, याकडे या तक्रारीतून लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे. बालहक्क आयोगानेही या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेत १२ वर्षांखालील मुलांना सहभागाची बंदी घातली आहे. मात्र त्यावर सणांतील हस्तक्षेप असा कांगावा करत नियमभंग करण्याचा हट्ट मंडळांनी धरला. राजकीय उंबरे झिजवले. मोठमोठ्या वल्गना केल्या. मात्र निवडणुका लक्षात घेत सरकारने भूमिका जाहीर करणे टाळून सकारात्मक ​भूमिकाच घेतली आणि मंडळांना दोन पावले मागे जाणे भाग पाडले.
डांबरी रस्त्यांवर प्रचंड गर्दीत मुलांना असे थर लावत आठव्या, नवव्या थरावर चढवले जाते. त्यामुळेच त्यांच्या जीवाला असलेला धोका वाढतो. बालहक्क कायद्याच्या सेक्शन ८४ अन्वये मुलांची सुरक्षा महत्त्वाची मानली जाते. मुलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या पालकांसह इतरांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळेच या खेळात मुलांना सहभागी करून घेणारे आयोजक, मंडळे यांच्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेशी खेळणारे पालकही तेवढेच जबाबदार मानले जाणार आहे. याप्रश्नी आयोग १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना या खेळात सहभागी होण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाला अनेक थरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा निर्णय केवळ मुलांची सुरक्षा आणि हितासाठीच असेल, अशी ठाम भूमिकाही आयोगाने घेतली आहे.

या बंदीचा अर्थ कुठलेही सणच साजरे करू नका, साहसी, धाडसी खेळच मुलांनी खेळायचे नाही असा नक्कीच नाही. मात्र प्रत्येक धाडसी खेळाचेही काही नियम, अटी असतात. असे खेळ खेळण्याची योग्य जागा, आवश्यक तो पुरेसा सराव, सातत्य आवश्यक असते. मुख्य म्हणजे त्यात हुल्लडबाजीला थारा नसतो. मात्र केवळ राजकीय स्पर्धेपोटी महिन्याभराच्या सरावावर भर चौकात असे जीव टांगणीला लावणे, याचे संस्कृतीच्या नावाखाली समर्थन कसे होऊ शकते?
सानपाड्यातील बालगोविंदाचा गेलेला जीव, आजवर अनेक तरुणांची एक प्रकारे झालेली हत्या आणि जखमी अवस्थेत अनेकांचे टांगणीला लागलेले जीव या साऱ्याचाच एकत्रित विचार करून सणाच्या नावाखाली चाललेल्या हुल्लडबाजी आणि उन्मादाला आता आवरायलाच हवे. त्यादिशेने बालहक्क आयोगाने घातलेल्या नियमांच्या पुढे पाऊल टाकत सरकारने चौकाचौकातील थरांच्या जीवघेण्या स्पर्धेवर बंधने आणून चांगला पायंडा पाडावा आणि सणांचे ‘आनंदी’ स्वरूप टिकवावे, ही अपेक्षा




गुरुवार, २६ जून, २०१४

अन्याय भिरकावलेली…


भर दुपारची वेळ लोकल, लोकलमधील प्रवासी सारेच थोडे सुस्तावलेले. एवढ्यात महिलांच्या डब्यामध्ये असणाऱ्या दोन विक्रेत्या महिलांचा संवाद कानावर पडला. संवादच तो. सुखदुःखाची वाटणी. अश्रूला वाट करून द्यायची नी पुन्हा पदर खोचून उद्योगाला लागायचे. त्यातील एक जण अगदी पंचवीस ते तिशीच्या आसपासची. ती नवरा, घर असं काही बोलू लागली अन् अचानक अश्रू अनावर झाले. थोडा वेळाने आवंढा गिळला आणि संतापानेच कर्मकहाणी सांगू लागली.
नवरा गवंडीकाम करतो. दारूचे व्यसन आहेच.  आज काम तर उद्या नाही, अशी गत दारूला पैसाही हिच्याच पदरचा. दिवसभर लोकलमध्ये काहीबाही कमावून जे मिळवायची त्यातून पोरींना दोन घास खाऊ घालत होती. त्यातूनही काही, नवऱ्याच्या दारूसाठी.  हे सारं मान्य करत संसाराचा गाडा ती रेट होती. पण दोन मुलींच्या पाठीवर तिसरी मुलगीच झालीअन् सारं बिनसलं. नवऱ्याने दुसरा घरोबा करत तिला तीन मुलींनिशी हाकलून दिलं माहेरी अठराविश्व दारिद्य्रत्यामुळे तिथे आसरा मिळणं कठीणच. आता गोवंडीला शेजार पाजारांच्या आधाराने राहातेय पण पदरात असलेली तीन मुलींसह जगणं, उभं राहणं त्यात नवऱयाने टाकलेली हेबिरूदसोबत घेत, अनेक नजरा झेलत, चुकवत जगायचं म्हणजे कधी तरी अवसान गळायचंच तिची कहाणी ऐकून हादरले मुलाच्या हट्टापायी अशा कितीतरी शेवंतांना आज बेघर व्हावं लागलंकुणी आत्महत्या केल्या, कुणी लाचारीचं जिणं आपलं मानू लागल्या पण या शेवंतामध्ये मला वेगळीच चमक दिसली.
लोकलमध्ये आपल्या सखीशी बोलता बोलता अचानक अश्रू तिने आवरले नवऱयाने टाकलं म्हणून काय झालं? नाहीतरी घर मीच चालवत होते. त्याच्या दारूलाबी पुरत होते. माझ्या तीन पोरींना मी वाढवेन, समाजापासून, वाईट नजरांपासून जपेन. त्यांचा बाप नी माय दोन्ही होईन, पण जीव नाय देणार आणि त्याच्या पायाशी बी नाय जाणारसंकटाचा डोंगर कोसळला असतानाही ताठ उभं राहण्याची तिची जिद्द पाहून चमकले. तिन्ही मुली तिच्या भोवती फिरत होत्या. फाटके फ्रॉक घातलेल्या अनवाणी, काहीशा भुकेलेल्या आणि  सगळ्याच प्रसंगांमुळे भेदरलेल्या एकाच वेळी मी सुन्न झाले, संताप आला, कौतुक वाटलं आणि त्या मुलींच्या आजच्या अवस्थेमुळे काळजीही वाटली.
ताई आता मी माझ्या दूरच्या आत्याला बोलावलय माझ्याकडे रहायला गोवंडीत झोपडं मिळालय ती पोरींना तर सांभाळेल. मी इथे माझी काम करेन. सकाळी भाजी पण विकणारे जेवढं जमेल तेवढं करेन. पोरींना शाळेत पण घायलाचंय तिच्याजवळ तिला काय करायचंय हे सारं तयार होतं आणि महत्त्वाचं कुणापुढे हात पसरायचे नव्हते स्वाभिमानाने जगायचं होतं. परिस्थितीच्या तडाख्याने ती हाललेली पण कोलडून पडली नाही. त्या परिस्थितीला शिंगावर घेत लढायला तयार झाली. कुर्ल्यात ती उतरूनही गेली पण माझ्या डोळ्यासमोरचीतिची १५ मिनिटांत दिसलेली वेगवेगळी रूपं हलत नव्हती. मी तिला दुसऱ्या दिवशी त्याच लोकलला नक्की भेटायला सांगितलं..
दुसर्या दिवशी आमची भेट झाली भाचीने केवळ कंटाळा आला म्हणून फेकलेले बूट, तिचे तिला काही फ्रॉक, माझे काही बरे ड्रेस अशी पिशवीच तिच्या हातात ठेवली यात नवं काही नाही, पण तरीही तुला कामात येईल वाटलं म्हणून आणलं तिच्या मुलींसाठी सहजच थोडा खाऊ दिला. तिच्या चेहर्यावर आनंदाची, समाधानाची लकेर उमटली पुन्हा कुर्ल्यात उतरताना म्हणाली पैसे पुढे केले नाहीत, हे फार बरं झालं पण तुमच्या या मदतीने माझी काही काळाची अंग झाकण्याची आम्हा सगळ्यांची चिंता मिटवलीत दहा वेळा आभार मानत ती उतरली पण माझ्या नजरेत ती आणखी मोठी झाली
आज जगात अनेक शेवंता, त्यांच्या पातळीवर त्यांच्या लढाया समर्थपणे लढत असतील नाकारलेपणाच्या जगण्यावर थुंकून आपलं विश्व उभारत असतील त्यातल्याच एकीला मी ओळखते, ​याचं मला खरंच समाधान आहे छोट्या छोट्या गोष्टी न मिळाल्याने संतापणारे, अन्यायाची भाषा करणारे आपण आणि सगळच नाकारलेलं असताना ठामपणे उभे राहिलेली ती दोन्हीतलं अंतर, विचार लख्खपणे जाणवलं!!! खरं तर स्वतःत नव्याने डोकावण्याची गरज वाटली

सोमवार, २८ एप्रिल, २०१४

अस्वस्थता आणि हतबलता


अस्वस्थता आणि हतबलता
स्टेशनला येण्यासाठी रोज शेअर रिक्षाचा प्रवास नित्याचाच. रिक्षाने स्टेशनला उतरले की दहा रुपये द्यायचे आणि दोन रुपये पर मिळणार हे ही ठरलेलेच. पण हेच दोन रुपये मागण्यासाठी त्याचवेळी तीन चार हात सरसावतात. अत्यंत केविलवाणे चेहरे करून, भर उन्हात ही चिमुकली मुले उभी असतात. त्यांच्याकडे बघून अस्वस्थ वाटू लागतं. दोन रुपये दिले तर काय फरक पडेल, असा विचारही मनात येतो. पण त्यांच्या हातावर पैसे टेकवणे हे प्रश्नाचे उत्तर नाहीच, असं पुढच्याच क्षणी वाटतं.
रोज असे पुढे येणारे हात सतत अस्वस्थ करत असतात. स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्येच तान्ह्या बाळाला झोपवून त्याचा भाऊ पैसे मागत असतो. दोन-तीन वेळा या मुलांना बिस्कीटे, चणे-दाणेही दिले. पण त्यांचे आणि आपले क्षणिक समाधान एवढेच त्याचे फलित.  खूप अस्वस्थ वाटूनच माझा रोजचा प्रवास सुरू होतो. पण एका घटनेने मात्र तिडीक गेली या मुलांबाबतची अस्वस्थताही तितकीच वाढली.
एकदा अशीच दोन मुले भीक मागायला नकार देत होती. तर जवळच बसलेल्या त्यांच्या बाप दोन सणसणीत लगावून त्यांच्या अंगावर गेला. पैसा माँगना ही पडेगा, असे दटावू लागला. एवढी लहान मुले आणि त्यांना होणारी मारहाण खूप संताप झाला. त्याला दोन शब्द सुनावण्यासाठी गेले. हातीपायी धड आहात, तर तुम्ही काम करा, स्टेशनचे काम सुरू आहे, तिथे शेकडो कामगार काम करतात, तिथे तुम्हाला जायला काय होतं, असे अनेक प्रश्न त्याला विचारले. पण तो निर्विकार आपको पैसा देना है तो दे दो नही तो जाओ अपने रस्तेसे, असे उर्मटपणे सुनावले पैसे मागण्यासाठी केविलवाणे होणारे हेच का ते लोक, असं वाटू लागलं. ये धंदे मे अच्छे पैसे है बच्चे जितना रोएंगे, गिडगिडाएंगे उतना पैसा ज्यादा, ये सरासर हिसाब है, असे निर्लज्जपणे त्याने सांगितले. मुलांना कामाला लावलं तर पोलिसांत जाईन, असं म्हटल्यावर हसत म्हणाला, उनको पता है सब वो कुछ नही करेंगेमी हतबल. एकीकडे गाल चोळत टिप गाळणारी ती मुलं, भुकेपायी समोरच्याकडे पैसे मागण्यासाठी पुढे होणारे त्यांचे हात आणि त्यांचा निष्ठुर, उर्मट, बिनकामाचा बापकशाचाच अंदाज लागत नव्हता. त्या मुलांच्या वाट्याला आलेल्या अशा जगण्याबद्दल अधिकच खिन्नता, अस्वस्थता वाटत होती तर समाजातील या फुकट्या वृत्तीचा अतोनात संताप येत होता. त्या माणसाला जाहीर चार सणसणीत शिव्या देऊन चालते होणे, हाच पर्याय होता. व्यवस्थेच्या परस्पर सहकार्यसंबंधांमुळे अशा सामाजिक प्रश्नावर कायमचे उत्तर असे आपल्याकडे नाहीच ना पण आजही रिक्षातून बाहेर पडताना ते हात समोर आले की अस्वस्थ वाटतेच त्यालाही पर्याय नाहीच!

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

शहाणपण

एरवी कितीही खरेदी होत असली तरी दिवाळीच्या खरेदीचा आनंद निराळाच मग ती उच्चवर्गीयांची रोषणाई, झगमगाट असो किंवा सामान्यांची पणतीखरेदी हे करतानाच आनंद ​मात्र सारखाच. दोन-तीन महिने दिवाळीसाठी पै पै साठवून, काटकसर करून कुटुंबाला आनंदी करण्याचा प्रयत्न ‘गरीबा’घरी नवा नाही. परवाची गोष्ट. सीएसटीच्या सबवेतील दुकाने, गाळे, फेरीवाल्यांचे बस्तान सारे काही दिवाळीनिमित्त फुलले आहे. एक अगदी गरीब कुटुंब. ज्यांचं पोट हातावरच आहे आणि कुटुंबातील नवरा बायको मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. त्या दोघांबरोबर त्यांची म्हातारी आई आणि दोन लेकी, एक मुलगाही​. सबवेतील तिसऱ्याच दुकानात ते थांबले. दोन लेकींची कपडेखरेदी सुरू झाली. घासाघीस टिपेला पोहोचली होती. दुकानदार दीडशेवर तर हा १२० रुपयांवर अडून बसलेला. त्यांच्याजागी तुम्ही आम्ही असतो तर कुठे २०-३० रुपयाकडे बघायचं, असं म्हणत १४० रुपयांमध्ये मांडवली केलीही असती आणि पुढे गेलो असतो. पण हा काही ऐकेना. खूप वेळ त्यांचा ‘व्यवहार’ सुरू होता. मी बाजूच्या बाटामध्ये जाऊन बाहेरही आले, तरी तोडगा नाहीच. दुकानदार वैतागून त्यांना म्हणाला, २०-३० रुपयासाठी किती रक्त आटवणार? हे वाक्य ऐकल्यावर त्या माणसाचाही धीर सुटला, पटकन म्हणाला या २०-३० रुपयांची किंमत फकस्त आम्हालाच ठाव हाय  तुमच्यासाठी ते किरकोळीत असत्यालही दोन लेकींना मिळून २५० रुपये ठरवलेले! ८००-हजार रुपयांत आम्हाला दिवाळी करायचीय आई, बायकोलाही खूश करायला हवं काही बाही घेऊन शिवाय तेल, पीठ, मीठ काय फुकटं मिळतयं दिवाळीला त्यांना खायला तर घालायला हवं हे ऐकल्यावर दुकानदारानेही १२० रुपयांत देऊन टाकले ड्रेस.
हा संवाद मी कुतुहलाने दुरून ऐकत होते मुलींसाठी एवढा विचार आणि मुलावर बघा कसा सहज पैसे खर्च करेल, हा ‘सर्वसाधारण’ विचार तेवढ्यात डोकावून गेला. त्यामुळेच त्याची शहानिशा करण्याच्या अंतस्थ हेतूने बोलायचं ठरवलं. कुटुंब, त्यांचा आनंद याची इतकी पर्वा करणाऱ्या या ‘श्रीमंत’ माणसाची वास्तव जाणीव पाहावीच, म्हणून त्यांना म्हटलं लेकींच्या खरेदीनंतर आता मुलासाठी घ्यायचं असेल ना काही. त्यावर तो लगेच म्हणाला, दोन लेकींवर थांबलो आम्ही. इथं खायचे प्यायचे वांदे आणि कुठं कुटुंबाचा पसारा वाढवायचा पोरगा, पोरगी आता सारखेच असतात की. त्या बी शिकतात आनि जास्त मायेनं करतात नंतर आईबापाचं कशाला पोरासाठी लांबण लावत रहायचं आई करत्ये भुणभूण पण तिला बी गप केलंय आता. हा बहिणीचा मुलगा आलाय सहज मामाकडं मी आनी माझी बायको दिवसभर काबाडकष्ट करतो पण मुलींना आनंदात ठेवण्यासाठी झटतो त्याच तर सगळं आमचं.. शाळंत बी जातात त्या लै शिकवणारे त्यांना
मी थक्क! त्याच्या डोळ्यातली, आपुलकी प्रेम, चमक सगळं एकाच वेळी जाणवलं. शिक्षणाचा, हुशारीचा, पांढरपेशी असण्याचा आणि मुख्य म्हणजे जगाला अक्कल​ शिकवण्याची ‘ताकद’ आल्याचा टेंभा एका मिनिटांत गळून पडला.  त्या दोन इयत्ता शिकलेल्या माणसाला जे कळंतय, जे तो पोटतिडकीने करू पाहतोय, तेवढी समज तुमच्या आमच्यापैकी अनेक शिकलेल्यांकडेही नाही, हे जाणवलं., स्वतःच आणि सो कॉल्ड व्हाइट कॉलर समाजाचं सुशिक्षितपणाचं विश्व अधिक उघडं पडल्याची जाणीव झाली. त्याच्या कुटुंबासाठी सुखाची प्रार्थना करत मी आपली चालती झाले