मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

काळोखावर करुनि स्वारी…



खाली उल्लेख केलेल्या घटना व व्यक्ती काल्पनिक आहेत. प्रत्यक्ष आयुष्यातील घटना व व्यक्ती यांच्याशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

...

ही कहाणी किंवा कर्मकहाणी आहे तिची. ती आहे ओरिसातली. तिचं नाव काय ठेवूया? अभया? चालेल. पण तिच्या ओरिसात अभयाचा उच्चार अभाया असा होतो. अभायाच्या घरात अठराविश्व दारिद्र्य. वडील लहानपणीच गेलेले. घरात तिच्यापेक्षा वयाने लहान भावंडे. वयाच्या बाराव्या वर्षी, म्हणजे डोळ्यांतील लहानपण अजूनही लहान असतानाच्या वयात अभायाला तिची आई म्हणाली, आपल्या घरासाठी तू आता काही हातभार लावला पाहिजेस. कामाला लाग. मग सुरू झाली अभायाच्या कामाची तयारी. मग एक दिवस तिची आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथे तिच्या काही तपासण्या झाल्या. त्यानंतर अभाया घरी आली. आणखी दोन दिवसांनी आईने एक कागद तिच्या हातावर टेकवला आणि फर्मान सोडले ते एका पन्नाशीच्या गृहस्थाबरोबर जाण्याचे. आपल्या बापाच्याही वयापेक्षा अधिक वयाच्या या गृहस्थासोबत आपण कुठे जायचे? का जायचे? कशासाठी जायचे? आणि आईने हाती दिलेले कागद कसला?
 
प्रश्नांची लगड
 
आणि त्यांची उत्तरेही.

 आईने हातावर ठेवलेला कागद तिच्या कौमार्याचा. म्हणजे या मुलीला अद्याप कुणी हात लावलेला नाहीयाचा पुरावा. या पुराव्याच्या बळावर मग अभायाची त्या गृहस्थासोबत रवानगी. आठवड्यातून दोन-तीन वेळा. त्याच्या गरजेनुसार. मागणीनुसार. त्याची गरज काय? मागणी काय? अभायाचे शरीर.

त्यातून अभायाच्या हाती काय? तर, अबोध वयात मनावर उठलेले असंख्य ओरखडे. आपल्या शरीरावर आपला अधिकार नाही? हा सतावणारा प्रश्न आण‌ि डोळ्यांत दाटलेली अमाप वेदना. आण‌ि तिच्या आईच्या हाती काय? तर बरे पैसे. त्यातून कर्जाची परतफेड.

आई आपल्याबाबतीत नेमकं काय करतेय, हेच अभायाला कळत नव्हतं. डोक्यात भुंगा होता एका प्रश्नाचा पण, आजवर समाजापासून, अगदी घरच्यांपासून जे शरीर संपूर्ण कपड्यांनी आईने झाकायला लावलं, ते पैसे मिळावे म्हणून की काय? आपल्याबाबतीत काहीतरी वाईट होतंय, त्याचा आपल्याला खूप त्रास होतोय, एवढंच तिला कळत होतं. याच काळात आई तिच्याकडून विणकाम, एम्ब्रॉयडरीची कामेही दिवसा करून घेई.

काही दिवसांनी तो पन्नाशीचा माणूस तिला नाकारू लागला. मग अभायाची रवानगी आईच्या फर्मानाने तीन दिवसांसाठी दुसर्या एकाकडे. तिथे सहा जणांकडून तिच्या शरीराची, मनाची ओरबाडणूक. 

तीन दिवसांनंतर अभाया घरी आली ती पूर्णपणे कोलमडलेल्या आणि विषण्ण मनाने. पण त्याचवेळी तिच्या डोक्यात चक्र सुरू होती ती या नरकातून सुटकेच्या प्रयत्नांची. आई पुन्हा एकदा आपला सौदा करणार, याची कुणकुण लागल्यानंतर अभायाने हिंमतीने घराचा उंबरठा स्वतःहून ओलांडला. पळण्याचा मार्ग पत्करला तिने. पण तिच्या दुर्दैवाने पाठ सोडली नाही. पुन्हा आणि कुणाच्या हाती लागली. तेच दुष्टचक्र वाट्याला. आधी इंदौर, मग अहमदाबाद असा शरीर ओरबाडून घेणारा प्रवास करत पोहोचली ती मुंबईत, एका सामाजिक संस्थेत.

 
इथे तिचे आयुष्य बदलले

अर्थात ते काही सहज सोपे नव्हते. चार वर्षांत मनावर झालेले आघात, मनासोबत शरीराचे झालेले राक्षसी शोषण, आईबद्दलचा पराकोटीचा संपात, पुरुषांबद्दलची पराकोटीची दहशत. ही दहशत इतकी की संस्थेतला एखादा पुरुष आसपास जरी आला तरी ती थरथर कापायची. इथे असलेल्या मॅडम, ताईंनी ​तिची मानसिक ​स्थिती ओळखली. ती या संस्थेत पूर्णतः सुरक्षित असून आता तिच्या बाबतीत काहीच वाईट होणार नाही, याची सतत ग्वाही त्या देत राहिल्या. तिचं मन रमावं, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमात तिला सहभागी करून घेण्यात आलं. रिकामपण आणि त्याबरोबर विचारांचे चक्र सुरू राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. अशा अवस्थेत कौन्सिलर्सची मदत घेऊन तिची भीती दूर करण्याचा प्रयत्न झाला. तरीही तिचे मन रमेल, असं काही करण्याची आवश्यकता होतीच. हीच बाब हेरून तिला लहानपणी आईनेच शिकवलेलं एम्ब्रॉयडरी​ करण्याचं काम सफाईने जमतंय, हे लक्षात घेऊन ते सोपवण्यात आलं. त्यात तिचं हळूहळू रमू लागलं, उभारी घेऊ लागलं. संस्थेतल्या लोकांच्या जिव्हाळापूर्ण प्रयत्नांना यश येऊ लागलं. मुंबईत आत्मविश्वासाने वावरण्यासाठी, बोलण्यासाठी ती हिंदी शिकू लागली. हातातील कलाकुसरीचा वेग वाढवला. हेच काम आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. संस्था आणि तिच्या एकत्रित प्रयत्नांतून आधी छोट्या आणि हळूहळू मोठ्या ऑर्डर्स तिला मिळू लागल्या आणि त्यातून बरे पैसेही मिळू लागले.
 
काळाकुट्ट भूतकाळ मागे टाकून आज ती नव्या प्रकाशमय काळाच्या स्वागतासाठी उत्सुक  उभी आहे. तिच्या नावाला साजेल अशा निर्भयतेने


इथे एक तळटीप सुरू होते

वर उल्लेख केलेल्या सगळ्या घटना आणि त्यातील सगळ्या व्यक्ती अगदी खरोखरीच्या आहेत. प्रत्यक्ष आयुष्यातील काही घटना वा कुणी व्यक्ती यांच्याशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो योगायोग अजिबात समजू नये.
 

ही अभाया मला खरोखर भेटलेली.

परवा एका मैत्रिणीला भेटायला गेले. एमएसडब्लू केल्यानंतर ती गेल्या काही वर्षांपासून एका एनजीओमध्ये काम करतेय. सेक्स वर्कर म्हणून ट्रॅफिकिंग झालेल्या मुलींच्या पुनर्वसनाचे काम ही संस्था करते. तिच्या संस्थेत गेल्यावर नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळालेल्या अनेक मुली भेटतात. त्यांचे अनुभव जितके अंगावर काटा आणणारे, तितकेच समाजात काय चाललंय, हे वास्तव दाखवणारे. कुणाला या उद्योगात ढकललं असतं, कुणी कुठली कुठली सोनेरी स्वप्न घेऊन मायावीनगरीकडे आलेलं असतं. परिस्थिती वेगळी, पण त्यांच्याबाबतीत घडलेलं थोड्या फार फरकाने सारखंच.

मैत्रिणीचे अनुभव, तिचं काम अशा काही गप्पा सुरू असतानाच एक १७-१८ वर्षांची अतिशय देखणी, चुणचुणीत मुलगी आमच्या समोर आली. काही फाइल्स तिने समोर ठेवल्या, छानशी हसली आणि गेली. एक वेगळा आत्मविश्वास, वेगळी चमक तिच्या डोळ्यात होती. तिचं काम करून ती गेली आणि तिच्याबाबतीत काय झालं असेल, ही एवढी सुंदर मुलगी कुठली असेल, तिचे आईवडील कुठे असतील, आता ती काय करते, असे अनेक प्रश्न पिंगा घालू लागले. माझ्या मनातले हे प्रश्न सखीने ओळखले आणि म्हणाली आज हिच्याचबद्दल तुला सांगायचंय.

हीच ती अभाया

मग मैत्रिणीने अभायाच्या आयुष्याचा पट माझ्यासमोर मांडला.  तिच्या आयुष्यात काही चांगलं घडल्याचा मलाच खूप आनंद झालाय आणि तो तुझ्याशी शेअर करायचाय, असं म्हणत तिने सारं सांगितलं. एखाद्या चित्रपटाची कथा असावी, किंवा त्यासाठी केलेला कल्पनाविस्तार वाटावा इतकं या मुलीने भोगलं होतं. पण, ते सारं मोठ्या हिंमतीने दूर ठेवून आज ती नव्याने उभी राहते आहे

मैत्रिणीशी गप्पा झाल्यानंतर खास अभायाला भेटायला गेले. आजवरच्या आयुष्यात माझ्या आईने मला फसवंल, माझा वापर करत  तिचासंसार उभा केला. हो तिचाच संसार कारण यात मी कुठेच नव्हते गं असेन तर फक्त पैसे देणारं मशीन एवढंच माझं स्थान आईनेच जिथे माझा सौदा केला, तिथे बाकीच्यांना काय बोल लावायचे? पण, चार वर्षांनी का होईना, सावरायची संधी मिळाली. संस्थेतल्या प्रत्येक माणसाने मला जपलं माझी काहीच चूक नसताना माझ्या भूतकाळात जे भोगलं, त्यासाठी मी स्वतःला का दोष देत कुढत मरायचं, हा विचार माझ्या मनात आला आणि सगळं दूर फेकलं. आता मला माझ्यासाठी जगायचंय माझं शरीर ओरबाडलं तरी मनाने मी खंबीर आहे, स्वतःच नाव समाजात मानाने घेतलं जावं हा प्रयत्न आहे अभाया सांगत राहिली तिच्या हिंमतीचं खूप कौतुक वाटलं. आयुष्यातल्या नाजूक अशा चार वर्षांत ब्रह्मांड दिसल्यानंतरही तिने हिंमत हरली नाही. समाजातील ओरबाडण्याच्या प्रवृत्तीवर थुंकत ती पुन्हा उभी राहिलीये स्वतःला सिद्ध केलंय बायकांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघण्याच्या, वापरा आणि फेका म्हणून समजण्याच्या वृत्तीला अभायाने खणखणीत उत्तर दिलंय तिच्यासारख्या अनेक मुली आज आधाराअभावी किंवा योग्य आसरा न मिळाल्याने या दलदलीत रूतलेल्या आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी, नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अनेक संस्थांच्या पातळीवर हे प्रयत्न होत असले तरी फसवले गेलेल्या मुली आणि त्यांना मिळणारी मदत याचे प्रमाण आजही व्यस्तच आहे. या मुलींना त्यांच्या हक्काचं जगणं जगता यावं यासाठी सरकार, संस्था आणि समाज म्हणून आपण एकत्र येऊन ठोस प्रयत्न करायला हवेत, असं तिला भेटून निघताना वाटत राहिलं

२ टिप्पण्या:

  1. Liked it. please keep posting. Blog follow karnyacha option pan ON kar please.
    Thanks

    उत्तर द्याहटवा
  2. एखाद्या चित्रपटाची कथा असावी, किंवा त्यासाठी केलेला कल्पनाविस्तार वाटावा इतकं या मुलीने भोगलं होतं. पण, ते सारं मोठ्या हिंमतीने दूर ठेवून आज ती नव्याने उभी राहते आहे…
    Good One

    उत्तर द्याहटवा