सोमवार, २३ मार्च, २०१५

जगणं तिला कळले हो…


वय वर्ष १६ ते १८… या वयात आपण काय करतो? शाळा, कॉलेजचं रूटीन. आपल्याला काय हवं, याची आईवडिलांसमोर यादी ठेवायची. क्लास, अॅक्टिव्हिटीज यात जगाचा विसर पडू देत भन्नाट, बेबंद जगायचं. त्या वयाची नशाच वेगळी. पण, असं मुक्त स्वच्छंद जगण्याचा, भान हरपायला लावणाऱ्या वयाचा अनुभव घेण्याचा आनंद प्रत्येकालाच मिळतो, असे नाही. काही मुले याच वयात स्वतःबरोबर कुटुंब, आपला समाज, त्यांचे कल्याण असे प्रचंड बोजड (आपल्यासाठी बोजडच) विचार करतात. नुसतेच विचार नाही, तर कृतीही करतात. इतक्या लहान वयात हे भान येतं कुठुन?

परवा ‘तिचा’ फोन आला. हॅलो, ताई ओळखलंस का गं? सांग मी कोन बोलतेय ते… आवाज अगदी ओळखीचा, लक्षात राहिलेला वाटला.. पण नावच डोळ्यासमोर येईना… अग ताई आपण एकदाच भेटलो, पण माझ्या लक्षात आहेस तू… तू मात्र विसरलीस? खट्टू होत तिने असं म्हटल्यावर मला अधिकच ओशाळल्यासारखं वाटू लागलं… त्याचक्षणी लख्खकन आठवलं.. अरे हीच ती. पुरस्कार वगैरे मिळवलेली. प्रचंड आत्मविश्वास बाळगणारी आणि सतत जगाशी दोन हात करण्यासाठी सरसावलेली.. तीच शेवंता. एकदाच भेटलेले तिला. पण जादू केली या पोरीनं. तिला मिळालेला पुरस्कार घेण्यासाठी ती मुंबईत आली आणि पत्रकार म्हणून मी तिला भेटले. तशा आणखीही लढवय्या होत्याच. पण, माहीत नाही, शेवंता अगदी मनाला भिडलेली. तिला मी माझं कार्ड दिलं आणि मुंबईत कधी आलीस, किंवा केव्हाही कसलीही मदत लागली तरी हक्कानं फोन कर, असं आवर्जून सांगितलेलं. त्यामुळे मला वाटलं नेमकी काय अडचण असेल? माझे विचार सुरू असतानाच तिनं थांबवलं नी म्हणाली. ताई, सहज फोन केला. आठवण आली तुझी. काही सांगावं वाटलं तुला… पुढेही ती बोलत राहिली. पण, मी मात्र आमच्या त्या मला थक्क केलेल्या भेटीत पोहोचले होते.

लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये असलेल्या फरतपूर तांड्यांवर राहणारी शेवंता राठोड. आई-वडील ऊसतोडणी कामगार. त्यामुळे सहा महिने विंचवाचं बिऱ्हाड. उरलेले दिवस रस्त्यावर डांबर ओतण्याचं काम. हरभरा, तुरीच्या शेतातली कामं, असं करत गुजराण करणारं तिचं कुटुंब. त्यातच वडलांनी साडेसात लाख रुपये खर्च करून एका ‘शिक्षका’शी बहिणीचं लग्न करून दिल्यानं घरावर कर्जाचा डोंगर. त्याही आधी सख्ख्या आत्यानं ब​हिणीसाठी न पेलवणारा हुंडा मागितल्यानं वडील पुरते कोलमडलेले. मुलींच्या लग्नाच्या चिंतेनं त्यांना दिवसरात्र पोखरलेलं. अशा स्थितीतच हुंड्याच्या हंड्या देऊन वडिलांनी तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न केले. समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात जागृत करण्याचे बाळकडून देण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकाशी तिचं लग्न झाले. शेवंतासाठी हा पहिला धक्का होता. ज्यानं हे थांबवायला हवं, तोच हात पसरून उभा आहे, हे तिच्या मनाला लागलेलं. आत्याचं घर तर तिनं टाकलंच होतं. पण, या कर्जाच्या ओझ्यानं खचलेल्या वडिलांना हात द्यायलाच हवा, हा विचार त्या बालवयातही तिच्या मनानं घेतला आणि दिवसरात्रीचं भान न बाळगता ती त्यांच्या बरोबरीनं मेहनतीची कामं करू लागली. गुरं राखणं, खुरपणी, शेताला पाणी देणं ही कामं करू लागली. माणसं, प्राणी, जनावरं, दिवस, रात्र.. कशाचंच भय तिला उरलं नव्हतं. हे सगळं करताना शाळेच्या दिनक्रमात तिनं कधी अडथळा येऊ दिला नाही. हाती असलेला पैसा पाहून कधी एसटीनं, कधी चालत जात १५ किमीवर असलेल्या शाळेतून आपलं शिक्षण सुरू ठेवलं. बोचरी थंडी, कडाक्याचं ऊन याची पर्वा न करता इतक्या लहान वयात तिचे हात राबत राहिले.

या वाटेतील अडथळा म्हणजे चौदाव्या वर्षी तिचं लग्न करण्याचा घातलेला घाट. पण, त्याक्षणी तिनं वडिलांशी भांडण केलं. बघायला आलेल्या मुलाला दोन शब्द सुनावून वाटेला लावले. मोठ्या हिंमतीनं तिनं आपलं लग्न थांबवलं. गावातील आणखीही चार-पाच बालविवाह रोखले. यासाठी हिंमतवाल्या मैत्रिणींची टोळीच जमवली. कुणाचं शिक्षण थांबवलं जातंय, कुणाला मारहाण होतेय, कुणाला सक्तीने बोहल्यावर उभं केलं जातंय, कुणाकडे वाकवणारा हुंडा मागितला जातोय… सगळ्या अडचणींवेळी ही टोळी​ हजर होते. मुलासाठी अट्टहास करणाऱ्या समाजातील या मुली म्हणजे त्यांच्या आईवडलांना त्यांची ताकद वाटावी, इतका बदल या मैत्रिणींनी घडवून आणलाय. दहावीत शिकणाऱ्या शेवंतानं गावात मुलींचा बचतगट सुरू केलाय. त्यातून मुलींना त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकीन गावात स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा तिचा प्रयत्न आहे. पुढची पिढी व्यसनमुक्त असावी, त्यांचं आयुष्य असंच रगडलं जाऊ नये, असले विचारही या मुली करताहेत. आमच्या तांड्यावर एकही पानपट्टी नाही, हे सांगताना अभिमान तिच्या डोळ्यात चमकला होता. ताई रडत बसणं, हार मानणं मला पटतच नाही. सरळ जाऊन भिडायचं, द्यायची टक्कर असं बोलताना तो आवेशही तिच्यात संचारला होता…

शेवंताच्या एका फोननं मला हे सगळं पुन्हा आठवायला लावलं.  पुन्हा कुणाचा तरी बालविवाह तिनं थांबवला होता. कुणाच्या शिक्षणातील अडथळा दूर केलेला. सगळं भरभरून बोलत होती. हे सांगतानाच ताई बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्जही फिटत आलंय गं… त्यामुळे बाबा खूष असतात, हे सांगताना ती हळवी झाली होती. पण काही क्षणच… छान वाटलं तुझ्याशी बोलून. करेन पुन्हा फोन असं म्हणत, तिनं फोन कटही केला. पण… खरं तर मलाच तुझ्याशी बोलून मस्त वाटतंय.. बळ मिळंतय… वगैरे… जे मला सांगायचं होतं, ते सांगण्याइतकं भानच मला उरलं नव्हतं.

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०१५

अन्न, वस्त्र, निवारा…



दुपारी अडीच-तीनची वेळ. बातमीच्या कामानिमित्त एका रिमांड होममध्ये गेले होते. तिथल्या अधिकाऱ्यांकडून नेमकी व्यवस्था समजून घेतली. मुले आल्यानंतर त्यांचं रूटीन, त्यांच्याबाबतची निर्णयप्रक्रिया सारं जाणून घेत होते. काही मुलांशी गप्पा झाल्या. कुठल्याशा गुन्ह्यामुळे ही मुले येथे पोहोचली होती. यापुढे त्यांचा मार्गसुधारण्याची जबाबदारी याच अधिकाऱ्यांची. नेमकी ही मुले इथे कशी आली, काय झालं त्यांच्या आयुष्यात, कसं होतं त्यांचं जगणं आणि आता मनातला कल्लोळ काय आहे, हे सारं ऐकून सुन्न झाले होते. या तेथीलमित्रांचा निरोप घेत बाहेर पडले, माझ्या मनातील या मुलांच्या विचारांसह. तेवढ्यात एका पायरीवर गुडघ्यात डोके खुपसून एक मुलगा बसलेला दिसला. १०-११ वर्षांचा असेल. इथल्या राहणीमानाला, शिस्तीला, जगण्याला सरावलेला नव्हता. त्याचं नवखेपण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्याच्या बाजूला त्याच्या सारखीच गुडघ्यात डोकं घालून बसले. काय झालं रे बाळा, तू असा एकटाचमित्रांपासून लांब का, माझा स्वाभाविक प्रश्न. त्यावर मला मित्रच नाहीत, मला कोणी त्यांच्या घेतच नाही, अशी साधारण आईकडे शाळेत असताना वगैरे करू, अशी त्याची तक्रार. अर्थात त्याचं वयही आईकडे तक्रार करण्याइतकच होतं. पण, ते जगणं त्याच्या वाट्याला आलं नव्हतं. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, तो ढिम्म. उत्तरच देईना. आमच्यातला परकेपणा दूर करण्यासाठी माझ्याकडचा बिस्कीटचा पुडा, कॅडबरी असं त्याला दिलं आणि म्हटलं चल मी तुझी ताई, मैत्रीण. आपण दोघं हे खाऊया. तो ही थोडा हुशारला. हात पुढे केला आणि आमच्यातल्या संवादाला सुरुवात झाली. मला जाणून घ्यायचं होतं तो कुठला, इथे का, इथपर्यंत कसा आला, आता शाळा आवडतेय का वगैरे. पण, माझ्या मनातलं प्रश्नांचं काहूर त्याला जाणवू न देता बोलतं करणं महत्त्वाचं होतं. मग अगदी सहज गप्पांतून सुरुवात झाली आणि तो सांगत होता ते ऐकून हे, असं जगणं असतं? एवढंच वाटलं.
त्याला जेव्हापासून आठवतय तेव्हापासून तो रस्त्यावरच राहिलेला. म्हणजे आधी झोपडी आणि आई त्याच्याबरोबर होती, पण एक दिवस आई अचानक कुठे गेली माहिती नाही. त्यापाठोपाठ झोपडीतून त्याची हकालपट्टी करून कुणी दुसऱ्याने कब्जा केला आणि हा फुटपाथवर आला. येथे त्याच्याबरोबर कायम येथेच राहणारे लोक, मुलं पाकिटमारीसारख्या गोष्टी करतच सर्रास पैसे कमवायचे. लहानपणापासून त्याने हेच पाहिलेलं. छोट्या मोठ्या पाकिटमारीसारख्या चोऱ्या तो करू लागला. आधी पोलिसांचा मार खाऊन सुटला, कधी कुणी बदडून लहान म्हणून सोडून दिलं. पण, एकदा त्याने मोठी बॅग चोरली आणि त्यातून आधीच्या गुन्ह्यांसह तो रिमांड होमपर्यंत पोहोचला. फुटपाथवरच्या मोकाट वातावरणातून एकदम छत्राखाली येणं, त्याच्या पचनीही पडलं नाही. त्यातच कुणाचं ऐकायचं, ठराविक गोष्टी, ठराविक वेळेत करायच्या, हे असलं त्याला काही सवयीचच नव्हतं. त्यामुळे त्याची घुसमट झाली होती. इथे आधीपासून असणारी मुले याला सरावली होती. पण, हा नवखा असल्याने अजून चार हात लांबच होता. या सगळ्यात एकाच गोष्टीच अप्रुप होतं, की आता रोज पैसे कमवायचे नाहीत, गाडीवर वडापाव, जेवण शोधत फिरायचं नाही, तरीही दोन वेळेला खायला मिळणार! आपण काहीतरी गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा म्हणून इथवर आलोय, याचे गांभीर्य त्याला कळत नव्हते. त्याच्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला आता रस्त्यावर झोपायचं नव्हतं!!! याच दोन गोष्टींचं कौतुक तो पुन्हा पुन्हा सांगत होता. पण, तरीही इथली लोकं काही करायला सांगतात, कसं वागायचं ते सारखं बजावतात, ते त्याला अजूनही पटलेलं नाही!! आजवर कुणासाठी तरी, कुणी सांगितलं म्हणून चोऱ्या करणाऱ्या त्याच्या हाताला आता कामच नव्हते. अनेकवेळा मार कसा खाल्ला, पाकीट मारून, मोबाइल चोरून तो कसा पसार व्हायचा. त्याने चोरलेल्या गोष्टी अनेकदा कुणाला द्याव्या लागायच्या, लोकल पकडणं, चालती गाडी सोडणं, उड्या मारणं, सगळं सगळं सांगत होता. कधी या सगळ्यातलं थ्रिल, कधी गरज, कधी नाइलाज असे सारे भाव त्याच्या बोलण्याबरोबरच डोळ्यातूनही व्यक्त होत होते. सारे ऐकून त्याच्याशी आणखी काही बोलण्याची, त्याला काही सांगण्याचीमाझी परिस्थिती नव्हती.
एखाद्याला आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी कोणत्या तरी मार्गाने पूर्ण होऊ शकतात, याचा इतका पराकोटीचा आनंद व्हावा? आयुष्याच्या दहा वर्षांत त्याने जगण्याची इतकी वेगवेगळी रूपे पाहिली, अनुभवली की खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे काय हे त्याला अनुभवायला मिळालेच नाही, त्यामुळे कळलेही नाही. चोरी हा गुन्हा असतो, तो करू नये, असं लहानपणापासून त्याला शिकवलं गेलंच नाही. त्यामुळेच याची नेमकी कल्पना न मिळाल्याने तो गुन्हा करत गेला.
बाहेर पडायला निघालेली मी पुन्हा आत गेले. या छोट्या दोस्ताबाबत अधिकाऱ्यांशी बोलले. मोडलेल्या गोष्टी, तुटलेलं काही यातून नवं करण्यात, ते पुन्हा जोडण्यात त्याला रस आहे, तासन तास त्यासाठी तो गुंतून रहातो, असं निरीक्षण येथील अधिकाऱ्यांनी नोंदवलं होतं. त्याला टेक्निकल काही शिकवता येईल का, याची चाचपणी सुरू होती. त्यांची ही ‘जोडण्या’ची आवड त्याला आयुष्य नव्याने ‘जोडण्या’स उपयुक्त ठरू दे, असे मनोमन वाटले. या सगळ्यात त्याच्यादृष्टीने आज एक चांगली गोष्ट घडत होती, ती म्हणजे तो तुलनेने लवकर रिमांड होमपर्यंत पोहोचला होता! आयुष्याकडे नव्याने बघण्याची संधी त्याला मिळाली होती!
मी ज्या सुधारगृहात गेले, तिथली अवस्था, तिथे येणारी मुले, तेथील अनास्था हे सगळं वास्तव पत्रकार म्हणून माहित आहेच. त्याच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल होण्याचीही गरज आहे, हेही मान्य. तरीही आज येथील बच्चेकंपनी किमान गुन्हेगारीपासून दूर आहे, याच समाधान तेथून बाहेर पडताना वाटत होते.

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

यहाँ के हम सिकंदर

समुद्राच्या लाटांची गाज मनात एक वेगळीच लय निर्माण करते. त्या लयीचा, लाटेने निर्माण होणाऱ्या खळबळीचा, किनाऱ्यावर निवांतपणे विसावण्याचा एक वेगळाच सिलसिला असतो. आधीची खळबळ आणि त्यानंतर येणारं विसावलेपण हा अनुभवच वेगळा…

नदी मूळातच शांत, संयत प्रवृत्तीची… तिचा प्रवाहही असाच निर्मळ.. खळबळ तिचा स्थायीभावच नाही… पण तरीही अडकून रहायचं नाही, साचलेपण येऊ द्यायचं नाही… प्रवाहीपण सोडायचं नाही, हा तिचा नेम.

निसर्गातील या दोन वाहिन्या मानवी स्वभावाच्या अगदी जवळ जाणाऱ्या. नेमकं कस असावं, याच उदाहरण देणाऱ्या… खरं तर हे सारं तात्विक, जीवनाचं सार वगैरे कुठुन आलं अचानक असं माझं मलाच वाटून गेलं. पण, देनवा नदीच्या शुभ्र, स्वच्छ खळाळत्या पाण्याने थोडंस अंतर्मुख केलं आणि रोज भेटणारा समुद्र आणि देनवा मनात घर करून राहिले. ही देनवा नदी भेटली ती निसर्गाचा असाच अद्भुत अविष्कार असलेल्या जंगलाच्या सफारीवेळी एक स्वतंत्र, न्यारी आणि विलोभनीय दुनिया.

सुंदरबन, ताडोबाची सैर केल्यानंतर निसर्गाच्या या रूपाकडे बघण्याची एक दृष्टी मिळावी. त्यामुळेच सातपुडा जंगल, तिथला निसर्ग, प्राणी, पक्षी यांना न्याहाळताना यावेळी केवळ भारावलेपण नव्हतं. मनात अनेक विचार, आपल्या रोजच्या आयुष्याशी असणारं येथील जीवनमानाचं जोडलेपण, असं बरंच काही मनात आलं.

येथे मुक्त विहार करताना भेटणारे अनेक प्रकारचे पक्षी, त्यांची लोभस रूपे, त्यांचा मुक्त विहार, त्यांचे स्वातंत्र्य याचा प्रत्येकाला हेवा वाटावा. जंगलातील झाडांचे वैविध्य, त्यांची प्राण्यापक्षांशी जोडली गेलेली नाळ, आभाळाकडे झोपावतानाही जमिनीत पाय घट्ट रोवून उभे असलेले वृक्ष, नुकताच पावसाळा संपल्याने चौफेर असलेली हिरवाई… हे सारंच आल्हाददायक. मनाला ‘हिरवं’, ‘ताजतवान’ करणारं.

सातपुडा जंगलाकडे जाणारी वाट ही देनवा नदीतील. या नदीत पहाटे सूर्योदयाच्यावेळी पाण्यात पडणाऱ्या तांबूस रंगाच्या किरणांचे प्रतिबिंब. लालसर तेजानं व्यापलेलं आकाश. दूरवर नदीचे पाणी आणि आकाशाची भेट होत असल्याचा आभास, सारं मनात घर करून राहतं. या पाण्यातून जाणारी वाट जंगलाबाबतचे औत्स्युक्य वाढते. जंगलात प्रवेश करताना, स्वागत करणारी हसरी कमळे, मोर, हरणांचे ताफे त्यांच्या साम्राज्याची झलक दाखवतात. या सफारीचे कुतुहल वाढवतात.

वाघाला जंगलाचा राजा का म्हणतात? त्याचे दर्शन अद्भुत का? ‘टायगर लक’ खरंच असावं लागतं? या साऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याची एक झलक दिसली तरी आपोआप मिळते. त्याचा रूबाब, त्याचा वेग, त्याचे राजेपण आणि त्याची शान… विलोभनीय! सातपुड्याला पहिल्याच सफारीच्या सुरुवातील अशी रूबाबदार सलामी मिळाली आणि राजेपणाचं दर्शन घडलं. जंगलातून रूबाबात येणारा आणि समोरच्याला खिजगण​तीतही न धरता आल्याचे ऐटीत निघून जाणारा वाघ पाहिला आणि सातपुड्याला येणं सार्थकी लागलं. आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट अनपेक्षितपणे मिळाली की जो आनंद होतो, तोच आनंद व्याघ्रदर्शनानेही मिळतो.

जंगल सफारीतील अनुभव, तिथलं जीवनमान याचा विचार केला तर ही सफारी आपल्याला निर्व्याज आनंद म्हणजे काय, प्रयत्नाने आणि पुरेशा प्रतीक्षेने एखादी गोष्ट मिळवण्यातलं समाधान काय आणि सगळ्यात महत्त्वाचं न मिळालेल्या गोष्टीने न हिरमुसता प्रयत्नातील आनंद अनुभवायला शिकवते. नव्याने शोध घेण्याची उर्मी कायम राखण्याचे धडे देते.

जंगलातील प्राणी धोक्याचा इशारा म्हणून देत असलेले ‘कॉल’ ऐकत जंगल प्रदक्षिणा झाली. जंगजंग पछाडलं. तेव्हा कुठे दूरवर झाडाखाली ‘बिबळ्या’च रूप दिसलं. तेही दुर्बिणीतून! म्हणजे तुम्ही आलात आणि आम्ही तुमचे स्वागत करायला सलामी देतो, असे शहरातल्या वातावरणात होत असलं, तरी नेहमी असं घडणार नाही. इथे आमचे नियमच चालतात. याची जाणीव त्यांनी करून दिली.

रोजचा कामाचा व्याप, घड्याळाच्या काट्यावर बांधलेलं आयुष्य यातून काढलेली फुरसत आल्हाददायीही हवी आणि काही मिळवल्याचा आनंद देणारीही. सातपुड्यात निसर्गाच्या चौफेर वेळ्यात मिळालेला निवांत विसावा, सूर्योदय-सूर्यास्त बघण्याचं भाग्य आणि जंगलदर्शन… सारंच प्रफुल्लित करणारं. संध्याकाळच्या वेळी हातात निवांत कॉफीचा कप, समोर वाहणारं नदीचं पाणी, सुखद गारवा, ‘प्रदूषण’ नसलेली हवा, हे सुख तरी कुठे असतं रोजच्या आयुष्यात? स्वतःसाठी काढलेला हा वेळ त्यामुळेच वेगळा ठरला. नवे मित्रमैत्रिणी, जुन्यांचा सहवास, त्यांचे अनुभव, मजा, थट्टा-मस्करी वातावरणं हलकफुलकं करणारे. तर जुन्या आठवणी नव्याने जगण्याची संधी देणारा मैत्रिणीचा सहवासही तितकाच आपलेपणाचा!

पक्षांचे प्रकार, त्यांचे बारकावे, रंग, रूप, वैशिष्ट्य यांची अचूक माहिती असणारे आणि ती देण्याची तयारी असणारे ‘साथी’ मिळणंही भारी. एखादा पक्षी दिसेपर्यंत थांबायचे, तो प्रत्येकाला दिसावा म्हणून अट्टहास ठेवायचा, त्याला न्याहाळायचे आणि निघायचे हे सारे वेगळा अनुभव देणारे. त्यामुळेच पक्षी आणि त्यांची ओळखही आनंददायी ठरली, ती त्यासाठी झपाटलेपण असलेल्या मंडळींमुळे!

रात्रीच्यावेळी जंगल कसं दिसतं? काय हालचाल असते? घनदाट झाडीत जंगल दिसतं? या साऱ्या प्रश्नांची एकल करणारी सैरही अनुभवायला मिळाली. रोजच्या नाइटशिफ्टने ‘रात्री’चे भय नाहीसे केले असले तरी जंगलातील रात्री मनातून थोडीतरी घाबरवणारीच. एरवी दीड-दोन वाजलेत वाटावं असं नऊ-दहा वाजताचं वातावरण. निरव शांतता, पक्ष्यांचे, प्राण्यांचे आपापले आवाज, झाडाच्या पानाची सळसळ अशी सारी हालचाल… जंगलातील ‘अवघड’ वाटेवरून धावणारी गाडी आणि बॅटरीच्या झोतात भिरभिरणाऱ्या नजरा… मस्त माहोल. आत्ताच सुरू झाली आहे अशी वाटणारी दोन तासाची सफारी संपते तरी कळत नाही.

एकूणच आयुष्यात फुरसतीचे मिळणारे दोन क्षण कृत्रिम हवेत घालवण्यापेक्षा मोकळी हवा भरून घ्यायला निसर्गाकडे यायला हवं.  त्याच्या अटीवर, त्याला शरण जायला हवं. हे त्याचं राज्य, त्याचं जग आणि इथे फक्त निसर्गाचे इशारे चालतात, हे मान्य करण्यासाठी यायला हवं. कधी मिळणारं भरभरून दान, कधी रिते हात, कधी प्रतीक्षा, कधी हुरहुर सारं ‘स्वीकारण्याची’ तयारी जोखण्यासाठी यायला हवं. सातपुड्याच्या अनोख्या जंगलानं अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. केवळ सफारीचा आनंद, सहलीची मजाच नाही तर वेगळी दृष्टी, दिशा दाखवली. आपल्या चकचकीत एसीच्या हवेतून खुल्या आकाशात फिरण्याचा निर्भेळ आनंद दिला. नवी उर्मी मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा येण्याचा निर्णय परतेपर्यंत निश्चित झाला होता.

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

थांबवा हा उन्माद


दहीहंडीच्या सरावादरम्यान सानपाड्यात १४ वर्षांच्या बालगोविंदाला पाचव्या थरावरून पडल्यामुळे जीव गमवावा लागला. किरण तळेकर या लहानग्याला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी या खेळाबाबत संताप व्यक्त केला. पण आपल्या मुलाला अशा जीवघेण्या खेळाकडे जाण्यापासून रोखण्याची जबाबदारीच खरं तर त्यांची नव्हती का?
या घटनेआधीच तीन दिवस मुंबईत करी रोड येथील एक तरुण थरावर पडला आणि मानेला गंभीर जखम झाली. त्याच्यावर ऑपरेशन करण्याची वेळ आली. या घटनेनंतरही बालगोविंदांना दहीहंडीत खेळवायचेच, राजकीय आग्रह, मंडळाची हटवादी भूमिका हे सारं सुरू झालं. दुर्घटनेनंतरही आत्मपरीक्षण करण्याचा विचार नाही, इतका हा उन्माद फोफावला आहे.
छोट्या वाडीमध्ये, चाळीमध्ये वेगवेगळ्या घरातील मुलांनी, तरुणांनी एकत्र येत दोन तीन थरांची छोटेखानी दहीहंडी रचत, या सणाचे मर्म असलेल्या मस्त दहीकाल्याचा आस्वाद घ्यावा, इतकं माफक खरं तर या सणाचे महत्त्व. छोट्याशा हंडीत असणारा इतकासा कालाही सगळ्यांनी वाटून घेत खाण्याची सवय लावणारा आणि देण्यातील आनंद शिकवणारा हा सण. त्यातही एकमेकांवर थर लावताना दुसऱ्याबाबत असलेला विश्वास, खात्री दृढ व्हावी, जबाबदारी घेण्याची सवय लागावी, असाही एक त्यामागचा दृष्टिकोन. पण काळानुरूप जसे इतर सणांचे अवडंबर माजून त्यामागचा मूळ दृष्टिकोन लयास गेला. तसेच दहीहंडीचे झाले. या सणातील दहीकाल्याची मुलांना वाटणारी मजा जाऊन त्याची जागा आधी स्पर्धेने आणि आता राजकीय चढाओढीने घेतली आहे. निखळ आनंदाऐवजी त्यात पैशाची बाजू वरचढ झाली.
दहीहंडीमध्ये या आर्थिक स्पर्धेबरोबरच थरांच्या उंचीची स्पर्धाही रंगू लागली. नऊ, दहा अशा या थरांसाठी मग लहान मुलांचा सहभागही अपरिहार्य झाला. अगदी तीन वर्षांपासूनच्या मुलांनाही या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाऊ लागले. वजनाने हलकी असलेली ही मुले वरच्या थरांसाठी उपयुक्त ठरू लागली आणि लहान मुलांना वेठीस धरण्याची स्पर्धाच जणू मंडळांमध्ये लागली.
दहीहंडीचे राजकीयीकरण झाल्यापासून त्याचे स्वरूपच बदलले. आधी मैदानात होणाऱ्या हंड्या आता रस्त्यावर, चौकाचौकात आल्या. त्यामुळे या खेळासाठी आवश्यक नियम, जागा, पद्धती सगळ्यांनाच फाटा दिला गेला. कुठल्याही खेळाच नियम असतात. त्यासाठी खास सुरक्षेची तयारी करावी लागते, ही बाब विसरून त्याचे उन्मादात रूपांतर झालेय आणि त्यामुळेच कुणीही जखमी होवो, कायमचे अपंगत्व येवो किंवा काही, आम्ही बदलणार नाही, अशी पद्धती आता रूढ झाल्याने लहान मुलांसह तरुणांचे जीव या खेळात टांगणीला लागत आहेत.
दहीहंडीच्या या स्वरूपाविरोधात अनेकांनी कोर्टात धाव घेतली. माध्यमातून चर्चा झाल्या. कुणी उघडपणे तर कुणी मनातून सध्या सण ज्या पद्धतीने साजरा होतो, त्या पद्धतीला विरोध करू लागले. त्यांच्यातीलच एक असलेल्या पवनकुमार पाठक यांनी बालहक्क आयोगाकडे मुलांच्या हिताच्या दृष्टीने धाव घेतली. या खेळात लहान मुलांच्या सुरक्षेचा कोणताही विचार होत नाही. लहान वयात झालेल्या इजांचे आयुष्यभर परिणाम भोगावे लागतात, कुणाला कायमच अपंगत्व येऊ शकतं, तसेच उंचीवरून पडल्याने असणारा मानसिक धक्काही मोठा असतो, याकडे या तक्रारीतून लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे. बालहक्क आयोगानेही या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेत १२ वर्षांखालील मुलांना सहभागाची बंदी घातली आहे. मात्र त्यावर सणांतील हस्तक्षेप असा कांगावा करत नियमभंग करण्याचा हट्ट मंडळांनी धरला. राजकीय उंबरे झिजवले. मोठमोठ्या वल्गना केल्या. मात्र निवडणुका लक्षात घेत सरकारने भूमिका जाहीर करणे टाळून सकारात्मक ​भूमिकाच घेतली आणि मंडळांना दोन पावले मागे जाणे भाग पाडले.
डांबरी रस्त्यांवर प्रचंड गर्दीत मुलांना असे थर लावत आठव्या, नवव्या थरावर चढवले जाते. त्यामुळेच त्यांच्या जीवाला असलेला धोका वाढतो. बालहक्क कायद्याच्या सेक्शन ८४ अन्वये मुलांची सुरक्षा महत्त्वाची मानली जाते. मुलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या पालकांसह इतरांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळेच या खेळात मुलांना सहभागी करून घेणारे आयोजक, मंडळे यांच्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेशी खेळणारे पालकही तेवढेच जबाबदार मानले जाणार आहे. याप्रश्नी आयोग १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना या खेळात सहभागी होण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाला अनेक थरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा निर्णय केवळ मुलांची सुरक्षा आणि हितासाठीच असेल, अशी ठाम भूमिकाही आयोगाने घेतली आहे.

या बंदीचा अर्थ कुठलेही सणच साजरे करू नका, साहसी, धाडसी खेळच मुलांनी खेळायचे नाही असा नक्कीच नाही. मात्र प्रत्येक धाडसी खेळाचेही काही नियम, अटी असतात. असे खेळ खेळण्याची योग्य जागा, आवश्यक तो पुरेसा सराव, सातत्य आवश्यक असते. मुख्य म्हणजे त्यात हुल्लडबाजीला थारा नसतो. मात्र केवळ राजकीय स्पर्धेपोटी महिन्याभराच्या सरावावर भर चौकात असे जीव टांगणीला लावणे, याचे संस्कृतीच्या नावाखाली समर्थन कसे होऊ शकते?
सानपाड्यातील बालगोविंदाचा गेलेला जीव, आजवर अनेक तरुणांची एक प्रकारे झालेली हत्या आणि जखमी अवस्थेत अनेकांचे टांगणीला लागलेले जीव या साऱ्याचाच एकत्रित विचार करून सणाच्या नावाखाली चाललेल्या हुल्लडबाजी आणि उन्मादाला आता आवरायलाच हवे. त्यादिशेने बालहक्क आयोगाने घातलेल्या नियमांच्या पुढे पाऊल टाकत सरकारने चौकाचौकातील थरांच्या जीवघेण्या स्पर्धेवर बंधने आणून चांगला पायंडा पाडावा आणि सणांचे ‘आनंदी’ स्वरूप टिकवावे, ही अपेक्षा