गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

मायेचा ‘सुगंध


आजच सकाळी दादाने आईचा फोटो पाठवला. दिवाळी जवळ आल्यामुळे आईची खास सुगंधी कामाची सुरुवात झाली आहे. अत्यंत निगुतीने आणि तिच्या खास प्रमाणामध्ये तयार होणाऱ्या उटण्याचा सुगंध घरभर दरवळू लागला आहे. महिनाभर घरच्या सणावाराबरोबरच आईची ही लगबग सुरू होते. उटण्यासाठी लागणारे खास जिन्नस, निवडणं, वाळवणं, दळणं असे सारे सोपस्कार पार पाडून जेव्हा हे मऊसूत आणि सुगंधी उटणे हाती पडते, तेव्हा स्वर्गसुख असते ते. उटणे म्हणा, फेसपॅक म्हणा नाही तर बॉडीवॉश… सुगंधाची नि मायेच्या स्पर्शाची हमी तर असतेच…

आईचा आज फोटो पाहिला आणि थोडंस बालपणात रमले. शॅम्पूच्या बाटल्यांनी घरातील जागा अडवण्यापूर्वी न्हाणं हा सोहळा असायचा घरात. शिकेकाई, रिठा, आवळा आणि बरंच काही वाळवून दळलेली शिकेकाई गरम पाण्यात उकळून आई केसावर छान चोळून द्यायची. डोळ्याशी घट्ट फडकं धरलेलं असायचं. तरीही छोटेस कण डोळ्यात जायचे नि मी थैमान घालायचे. मग कोमट पाण्याने अंघोळ आणि कोवळ्या उन्हात केस वाळवणे असा कार्यक्रम असायचा. त्याबरोबरच आणखी एक जिन्नस आवर्जून दाखल व्हायचा. ते म्हणजे उटणे. ऑक्टोबर हीट संपली की तळेगावांत आधी सुखद आणि नंतर कडाक्याच्या थंडीचे आगमन व्हायचे. या काळात साबणाने अंग जास्त फुटते, असं म्हणत आणि तो हद्दपारच करायची. साय घालून कालवलेले उटणे आणि त्यानंतर डाळीचे पीठ लावून अंघोळ व्हायची. दिवाळीच्या दिवसांत तर उटणे हा सोहळा असायचा. चार महिने साबणाची जागा सुगंधी उटणे घ्यायचे. त्याने अंघोळ केली की पुढचा काळी काळ तो सुगंध टिकून रहायचाच 

आईच्या घरगुती स्वरूपातील या उटण्याला दादाने व्यावसायिक स्वरूप दिले. नि थोड्याश्या स्वरूपात करण्याची तयारी आता अधिक बारकाईने मोठ्या स्वरूपात होऊ लागली. स्वत: नि नातेवाईकांसाठी किलोभर होणारे उटणे आता १०० ते १५० किलोपर्यंत होऊ लागले आणि तरी या सगळ्याची जबाबदारी तिने घेतली. आज जवळपास २० वर्षे आई दिवाळीच्या आधी उटणे तयार करते. या उटण्याचे स्वरूप मोठे झाले तरी तिची रित बदलली नाही की दर्जात तडजोड नाही. उन्हाळ्याच्या वाळवणाबरोबरच उटण्याचे जिन्नस आणून दगड, माती काढून स्वच्छ निवडत कडकडीत उन्हात वाळण्यासाठी पडू लागले. गणपती झाले की तिच्या खास प्रमाणात हे जिन्नस एकत्र यायचे नि पुण्यात राजमाचीकरांकडे रवाना व्हायचे. तिथून खास उटण्याच्या गिरणीवर बारीक दळून उटणे घरी येऊ लागले. उटणे हाती आले की बंद पिशवीत ठेवून थोडे थोडेच बाहेर काढायचे. उटण्याचा मोठा ढिग करून बसायचे नाही. त्यानंतर वजनकाट्यावर सारखे वजन करत पाकिटात भरून रवाना करायचे. ही सगळी प्रक्रिया नोकरी करतानाही ती एकहाती सांभाळत होती. उटणे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तिला अजिबात लुडबूड चालत नसे. आता तर निवृत्त झाल्यापासून तिने सुखनैव हे काम हाती घेतले.    

व्यावसायिक उटण्याची सुरुवातही छोटेखानी होती सुरुवातीला १५ ते २० किलो उटणे करून ते दादाच्या हाती पडे. पण या काळातही पाकिटांपेक्षा वजनावर मोठ्या प्रमाणात उटणे घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठीच होती. दिवाळीच नाही, पण त्यानंतरही आम्हाला ते हवेच, असा हक्काचा आग्रह आईकडे केला जाई. माझ्यासाठी पाव किलो, अर्धा किलो तरी ठेवाच, असे आधीच नोंदवले जायचे. एका काकूंसाठी तर आईला पूर्णपणे नव्याने उटणे तयार करावे लागले. पण तरी दर्जात तडजोड केली नाही. तान्ह्या बाळांसाठी तिने उटणे वस्रगाळ करून दिले. पण प्रत्येकाचे समाधान महत्त्वाचे मानले. दरवर्षी वर्षभरासाठी उटणे दिवाळीच्या सुमारासच घेऊन ठेवणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले नि छोटेखोनी स्वरूप मोठे झाले. आज दादा, वहिनी, बाबा सगळे दिवाळीआधी या उटण्याच्या कामात आणि तिच्या दिमतीला सज्ज असतात. माझ्यावरच्या विश्वासाने आणि अनुभवाने लोक उटण्याची मागणी नोंदवतात. हा विश्वास नि ते तयार करण्यामागची माया यात कुठे कसूर होऊ नये गं, त्यामुळे मी स्वत:च करते हे.. असं अगदी काल ती सांगत होती.. नि मी माझ्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाच्या ‘सुगंधी’ आठवणीत रमले होते.

सोमवार, ३१ जुलै, २०२३

अठ्ठावीस युगांचं एकटेपण!

 (ही कोणत्याही कलाकृतींची समीक्षा नाही. कलाकृतीतील तुलनाही नाही.  बाईपण, तिच जगणं आणि भावनांचा कल्लोळ यावर जोडलेले समान धागे एवढ्यापुरतीच ही मांडणी आहे.)

यामिनी सप्रे

तुकोबारायांनी गाथेतून, अभंगातून जगण्याचं सार सांगितलं. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दिला. जगण्याचं कोडं उलगडलं. पण प्रत्यक्ष तुकोबारायांचं मन कधीही संसारात रमले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीचे भाव काय असतील? संसाराच्या तिच्या कल्पनांचं काय झालं? विश्वाला चिंतेतून वाट दाखवणाऱ्या तुकोबारायांच्या आवलीची चिंता काय असेल? संवाद, जगण्याचा आनंद आणि सुखदु:खातील साथीची साधी अपेक्षाही पूर्ण होत नसताना तिचं काळीज किती तुटलं असेल? नकारात्मक परिस्थितीत पाय घट्ट रोवून संसाराला ठिगळं लावताना तिच्या वाट्याला किती एकटेपण, एकाकीपण आलं असेल?

विठ्ठलावर रखुमाई रुसल्याच्या कहाण्या सगळीकडे सांगितल्या जातात. पण, रुसलेल्या रखुमाईच्या मनीचे भाव ना कोणी जाणले, ना कुणी विचारात घेतले. आपला विठ्ठल आपल्याशेजारी उभाच असेल, या भावनेने अठ्ठावीस युगे विटेवर उभ्या असलेल्या रखुमाईच्या वाट्याचं जगणं नि त्याबाबत तिचा कल्लोळ, तरीही विठ्ठलाशी असलेले जोडलेपण कसे असेल? त्याच्यासोबत वाट्याला येईल तसंच जगणं तिनं का स्वीकारलं असेल? आवलीला स्वतंत्र, स्वच्छंद जगायला हवं सांगताना तिला स्वत:ला मुक्त जगावं वाटलं नसेल?

जिंकावा संसार। येणें नांवें तरी शूर॥

येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं॥

पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें॥

तुका म्हणे ज्यावें । सत्कीर्तीनें बरवें॥

जो संसाराला जिंकतो, तोच खरा शूर असतो, बाकीचे सारे मूर्ख असे अभंगातून सांगत जनप्रबोधन करणाऱ्या तुकोबारायांच्या आवलीच्या संसारस्वप्नाचं काय झालं?

‘देवबाभळी’तील रखुमाई आणि आवलीच्या मनीचं हितगुज काळाच्या कसोटीपल्याड जाऊन आजही पोखरत असेल, तर परिस्थितीत फारसा बदल झाला नाही का? आपण जग फिरून आल्यावरही आपलं घर, संसार आणि वाट बघणारी ती असणारच हा विश्वास असतो, तोपर्यंत सन्मान असतो. पण विश्वासापल्याड गृहित धरण्याकडे हे सरकतं, तेव्हा तिच्या भावनांचं काय होतं?



तू शेवटचं पावसात कधी भिजलीस? परसातील फुलांचा छाती भरून सुगंध कधी घेतलास? मनात दाबून ठेवलेल्या भावना दूर सारत शेवटचं मनसोक्त कधी जगलीस? कधी तरी करपू दे भाकरी, कधी तरी कढ ऊतू जाऊ दे, कधी तरी भोवताल विसरून जग… सगळं ओझं उराशी धरण्याचं बळ कायम एकवटण्याची गरज नाही.. कधीतरी तू तुझी हो, हा अर्थगर्भ सल्ला जेव्हा रखुमाई आवलीला देते तेव्हा तो जणू मलाच दिलाय, असा भाव प्रत्येकीच्या मनात तयार होतो. स्त्री-पुरुष समानतेच्या आणि पुढारलेपणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी वास्तवातील चित्र आजही फारसं वेगळं नसल्याचं जाणवतं. ‘मी आहे म्हणून टिकलेय’ या वाक्यावर समस्त महिलांचा एकसूर उमटतो नि आपल्याही आयुष्यात असा बदल व्हावा, सारं भान विसरून आवाज मोकळा व्हावा, ही इच्छा दृढ झाल्याचं जाणवतं.

पाऊस येवो न येवो, आपल्यावाटचं नांगरावच लागतं असं म्हणणारी आवली आणि आपलं आभाळ आपणच बांधायचं आणि आपला पाऊस आपणच व्हायचं, हे सांगणारी रखुमाई या आजच्या काळातील घराघरात वावरणाऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात. पण त्याचबरोबर बाई तुझ्या आयुष्यातील आनंदासाठी सतत अवलंबून राहू नको. तुझी तू जग, तुझा आनंद तू शोध, हेही त्या सहज मांडून जातात.  



दोन आठवड्यांपूर्वी ‘बाईपण भारी देवा’ पाहिला. त्यापाठोपाठ ‘देवबाभळी’. बायकांच्या मनातील गूढ विश्वावर आणि संसाराचा गाडा ओढण्याच्या ओझ्याबद्दल भाष्य करणाऱ्या या दोन्ही कलाकृती. आपल्या आयुष्यातील बाई ही साथीदार आहे, सोबती आहे. त्याचवेळी, तिचं आयुष्य तिच्या पद्धतीनं जगण्याचा आणि आयुष्याचा मनमुराद आनंद घेण्याचा तिला अधिकार आहे, हे आज २१व्या शतकात सांगावं लागतंय. तिच्यावर कुणाची मालकी नाही, तिच्या एकटीवर कुटुंब, संसार चालवण्याचा भार नाही, हे दाखवून द्यावं लागतं. समाजानं लादलेलं बाईपणाचं ओझं काळाच्या कसोटीवर टिकणारं नसतानाही बायका पेलत राहिल्या आणि आपल्याखेरीज घर आणि कुटुंब चालणार नाही, या भावतून कधी जबाबदारीचं, कधी अपराधीपणाचं तर कधी आपल्यावाचून अडले नाही तर काय, या भावनेचं ओझं अंगावर घेत राहिल्या. पण त्यातून वाट्याला येणारी घुसमट दुर्लक्षितच राहिली. ‘बाईपण…’च्या निमित्तानं सिनेमागृहात बायकांची मोठी गर्दी झाली. पण खरं तर प्रत्येक पुरुषानंही हा सिनेमा बघायला हवा, अशी गरज अधिक दिसते. या सिनेमातील मुलगी, सून आणि त्यांच्या स्वतंत्र आयुष्यासाठी धडपडणारी मंडळी हे वैश्विक रूप असायला हवं. पण प्रत्यक्षात कुठल्यातरी रूपातील घुसमट मोठ्या संख्येनं बायका स्वत:शी जोडत आहेत, हे समाज म्हणून अधिक चिंतेचं दिसतं. तिची स्वप्त, तिच्या आकांक्षा, तिचं आयुष्य अधिक व्यापक करायचं तर ते सगळ्यांना मिळून करावं लागेल. त्याची सुरुवात माझ्यावाचून सगळं अडतं या भावनेच्या गुंत्यातून बाहेर पडण्यापासून करावी लागेल. सभोवताली आपल्याला गृहित धरले जाऊ नये आणि आत्मसन्मानाशी तडजोड नाही, हा धडा आधी तिलाच गिरवावा लागेल.

जोडीदारांचं एकत्र असणं आणि सोबत असणं यातील भावनिक अंतर या कलाकृती मांडतात. कधी परतावसं वाटलं तर, घर जागच्या जागी असायला हवं, पुन्हा सांधताना हात हातात असायला हवेत, या अट्टहासातून सारं हृदयाशी धरताना आणि हातून काही निसटू नये हा प्रयत्न करताना स्वत:साठी जगायचं राहून जातंय. आपल्या आवडीचं काही करणं, त्यासाठी वेळ देणं राहून जातंय. नाट्यगृहातील, सिनेमागृहातील बाई आज याच विचारानं अंतर्मुख होऊन बाहेर जाते, तेव्हा माझ्या जखमेवर फुंकर घालायला माझा ‘विठ्ठल’ सोबत हवा, त्याने पाठवलेली कुणी रखुमाई नाही.. ही भावना कितीतरी मोठी झालेली असते.

इझू दे रे देवा अंतरीची पिडा… ही आर्त साद तिने देवाइतकीच स्वत:ला आणि समाजाला घातलेली असते.


 

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

बदल हवाच, पण स्वत:पासून


फँड्रीमध्ये व्यवस्थेवर दगड फेकून मारणारा जब्या किंवा घरात रांधा-वाढा-उष्टी काढा करत जिथे तिथे पुरे पडण्याची अपेक्षा धरणाऱ्यांवर संतापाचे पाणी फेकणारी ‘द ग्रेट इंडियन किचन’मधील सखी … दोन्ही गोष्टीत एक सारखेपणा आहे. समाजाने, व्यवस्थेने वर्षानुवर्षे केलेला अन्याय भिरकावण्यासाठी एकवटलेलं बळ. 

खरं तर ती कोण आहे आणि काय सांगू पाहतेय? ती आणि समाजातील ९० टक्के बायकांची गोष्ट फारशी वेगळी नाहीच मुळी. मग तरी ती वेगळी का वाटतेय? कारण समाजाने, पुरुषप्रधान संस्कृतीने आजवर जे लादले किंवा मधाचे बोट लावून ज्या गोष्टी गळी उतरवल्या, करण्यास भाग पाडल्या त्याविरोधात आवाज उठवता येऊ शकतो, ही जाणीव प्रत्येकीच्या मनात पेरण्याचे काम तिने केले आहे. त्याचबरोबर समाजातील पुरुषांना तुम्ही बदलला नाहीत, तर आम्ही बदलू याची स्पष्टपणे जाणीव करून दिलीये. आज आपल्या समाजातील अनेकींना आपल्यावर काही लादलं जातंय, याचीच जाणीव नसते. त्यांना जे करावं लागतं, ते असंच असणार अशी गृहितक मांडून त्या आला दिवस जगतात. पण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा आणि नकार देण्याचा अधिकार आहे, ही जाणीव करून देण्याचे काम या सिनेमातील ‘तिने’ केले आहे. त्यामुळेच हा सिनेमा तिचा, बायकांचा यापेक्षा समाजातील समस्त वर्गाचा आणि रुढीचे खुंट अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रत्येकाला धक्का देण्याच्या प्रयत्नांचा अधिक आहे.

एका समवयस्कांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिने धरलेला आरसा लखलखू लागला. प्रत्येकाच्या मनात खळबळ तर होतीच. शिवाय त्या सगळ्यांच्याच नजरेत ते पुढारलेल्या विचारांचे, महिलांच्या हक्कांबाबत जागरूक असलेले वगैरे आहेत, अशीच भावना होती. त्यामुळे ती सांगू पाहत असलेली गोष्ट आपल्याशी संबंधित नाहीच, या गृहितकावरून चर्चेची मांडणी होत राहिली. मी सकाळी आठला घर सोडतो, ते रात्री आठला येतो. ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात तर कामाचे तास असे उरलेच नाहीत. तरीही तिची मीटिंग असेल तर मी वेळ काढून संध्याकाळचा चहा करतोच. तिने यादी दिली की भाजीपाला आणि किराणा आणण्याचं कामही अनेकदा करतो. जबाबदारी दोघांची आहेच ना, असा सूर एकाने धरला. त्यावर आणखी एक पुढारलेले मत येऊन पडले. मला काही हे सगळं जमणार नाही, तिने करावे अशीही अपेक्षा नाही. मी सांगितले तिला सरळ सगळ्या कामांना मदतनीस नेमून टाक. अगदी भांडी घासण्यापासून भाज्या, धान्य निवडण्यापर्यंत. तिला हवंच असेल तर स्वयंपाकालाही. फक्त आपली पद्धत तिला शिकव इतकंच म्हटलं. थोडक्यात मी करणार नाही, तू करावं अशी अपेक्षा नाही हे अगदी क्लिअरच केलंय. मांडली गेलेली ही प्राथमिक दोन मतं. बहुतांश सूर हे आम्ही कशी मोकळीक दिलीये, तिचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे वगैरे होते. त्यांच्या या प्रश्नावर मला पडलेल्या चारच प्रश्नांची तथाकथित पुढारलेल्यांकडे मात्र उत्तरं नव्हती आणि हीच मेख आहे ‘दिलेल्या’ आणि अपेक्षित मोकळीकीत.

चहापासून पुरणपोळीपर्यंत स्वयंपाक येणे हे कौतुकास्पद आहेच. पण फक्त येऊन उपयोग नसतो, तर रोजच्या चहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतच्या कामात माझा वाटा किती आणि आवड, मूड म्हणून नाही तर जबाबदारी, बांधिलकी म्हणून किती पेलतो, हे महत्त्वाचे आहे. दोन दिवस चहा करून, नि चार दिवस कूकर लावून विचारांची, कृतीची समानता सिद्ध होणार नसते. मी ही करणार नाही, तू ही करू नको या विचारांत तर मूलभूतच गोंधळ आहे. एका घरात राहत असताना कुणीच न करता, फक्त मदतनीसांच्या भरवश्यावर घर चालतं? नाश्ता काय करायचा, जेवणासाठी काय काय हवे, त्यासाठी आवश्यक गोष्टी आणलेल्या आहेत का? घरात पाहुणे आले तर त्यांच्यासाठी काय त्याचे नियोजन, तयारी. मदतनीसांना सूचना देऊन हे करून घेण्याचं काम कुणाचं? त्यांच्या वेळांशी जुळवून घेण्याची कसरत आणि ऑफिसच्या डेडलाइन्सचे गणित कोणी जमवायचं? बरं घरात फक्त ढोबळ दिसतात, तितकीच कामं असतात? कपडे धुण्यापासून इस्त्री होऊन कपाटात जाईपर्यंत, भांडी घासून पुसून जागेवर ठेवण्यापर्यंत, घराच्या भिंतीचे कोपरे वारंवार तपासून स्वच्छ ठेवण्यापर्यंत, घरातल्या सगळ्या बेडशीट, कव्हर काढून बदलून, धुवून नवी घालेपर्यंत, पडदे दोन महिन्यांनी की चार महिन्यांनी धुवून पुन्हा जागेवर येईपर्यंत असंख्य गोष्टी तिला डोक्यात ठेवाव्याच लागतात. ही कामं तिने सांगितली आणि मी केली असं न करता आपली म्हणून स्वत:हून कोणकोण करतं? त्याचं गणित कुणाच्या डोक्यात असतं? घरातील नळाचं लिकेज, पंख्यातून येणारा आवाज, बँकेतून आणायची सर्टिफिकेट, आठवड्याचा भाजीबाजार, महिन्याचा किराणा, विजेपासून क्रेडिट कार्डपर्यंतची बिले, एवढं करून कामाच्या वेळा, डेडलाइन्स, टार्गेट्स बरोबरीने संध्याकाळचा कूकर, भाजीची फोडणी, सकाळच्या नाश्त्याची तयारी अशी असंख्य व्यवधानं आपली म्हणून किती जण पेलतात? स्वत:करा किंवा करून घ्या, पण करून घेण्याची जबाबदारी तर तिच्यावरच असते ना. यावर उत्तर होते इतके स्वातंत्र्य दिल्यावर एवढे तर करावे लागणारच ना. स्वातंत्र्य देणं आणि मानणं हाच फरक लक्षात येत नाही तोवर बदल घडूच शकत नाही. माझ्यावर कामाचा इतका ताण असतो, लोकांना भेटायचं असतं. एकच सुट्टी मिळते, त्यात हेच करायच? डेडलाइन्स असतात. मित्रपरिवाराबरोबर ‘मी’ टाइम हवा असतो. हेच घरगृहस्थी करत बसलो तर माझा वेळ कुठून आणणार? क्षणभर हसू आलं. तिलाही तिच्या अशाच वेळाची गरज असते, आठ दिवस, महिनाभर चार महिने तिलाही यातलं काहीच करू नये असं वाटलं तर? हा विचार कधी तरी कुणी करत असेल?

लॉकडाउनच्या काळात अनेक पुरुष पहिल्यांदाच इतके घरात राहिले. मग स्वयंपाकघरातील त्यांच्या करामती, मॉप हातात घेऊन स्वच्छता, भांडी घासणं अशी घरगुती कामे करताना अनेकांनी फोटो पोस्ट केले. अनेक महिलांनी घरच्या ‘पुरुषां’चे असे फोटो कौतुकोद्गारासह पोस्ट केले. मुळात आपण ही कामे करतो याचे त्यांना स्वत:ला आणि घरातल्या बायकांना अप्रुप वाटले, यातच प्रश्नाचे मूळ आहे. आज त्याच्या मनात आले त्याने केले, उद्या तसे नसेल. पण तिच्या मनात आठ दिवस काहीच करू नये, असे लॉकडाउनच्याच काळात आले असते, तर चालेल? असं कसं घर आहे, अडचण आहे तर करावंच लागणार हा सूर तिच्यासाठी आळवताना स्वत:साठी लावू शकतो का, हा विचार तेव्हा आसपासही नसतो. 

मुळात आपल्या जडणघडणीतूनच हे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे त्यात वावगं न वाटण्याइतकं सरावलेपण येतं. घर आणि निगडित जबाबदाऱ्या या तिच्या असतात. मग त्या तिने स्वत: पेलाव्यात किंवा कुणाकडून करून घ्याव्यात. पण अंतिम जबाबदारी तिचीच असते, हे आई, आजी, बहिण यांच्या वावरातून दिसतं आणि मनात पक्कं होतं. मग आई करते, बहीण करते तर बायको का नाही? घर दोघांचं आहे तर तिला करावंच लागणार ही धारणाही त्यातूनच. पण घर दोघांचं आहे तर जबाबदारी दोघांची हा विचारही डोकवतच नाही. जबाबदारी घेतानाही तिनं यादी केली की… असं का असतं? घरातील डाळ, तांदूळ, कणिक, साबण संपले आहेत. पडदे, बेडशीट आणायला हव्या आहेत, वॉशिंग मशिन कुरकुरतेय, फ्रीज बदलायला झालाय या गोष्टी तिनं यादी केल्यानंतर का लक्षात याव्यात? अनेकांना घरातील चहा, साखरेचे डबे कुठे आहेत, गॅस कसा पेटवायचा हेच माहित नसेल, ती नसेल तर कपड्यांचा ढिग तिची वाट बघत कपाट रिकामं करत राहत असेल, तर तेव्हा कधी तरी तरी आठवतं का की घर दोघांचं आहे!

मासिक पाळीच्या काळात बाजूला बसण्याची प्रथा अशीच लादलेली. पूर्वीच्या काळाची फुटकळ समर्थने देत आजही कामाच्या व्यापात तिला हे उद्योग करावे लागतात. अगदीच बाजूला बसायचे नाही तरी या काळातील तिची मनस्थिती, दुखणे-खुपणे, याची पर्वा कितीजण करतात? तिला होत असलेल्या त्रासाची जाणीव किती जणांना असते, तो कमी नाही तर शेअर तरी करावा, असं किती जणांना वाटतं. मुळात मासिक पाळीत तिला त्रास होतो म्हणजे नेमकं काय, हे किती जणांना माहीत असतं? प्रश्नांची यादी इतकी लांबलचक आहे की समानतेच्या रस्त्यावर आपण अर्ध अंतरही चाललेलो नाही, हे लक्षात आपोआप येतं. हे प्रश्न आजचे नाहीत. यावर कुणीच कधीच बोललं नाही, असंही नाही. मुळात समानतेच्या आणि पुढारलेपणाच्या कल्पनाच इतक्या तकलादू आहेत की त्या बदलण्यापासूनच यातील बदलची सुरुवात होऊ शकते. पण या अशा विषयावर एक अख्खा सिनेमा होऊ शकतो, हा विचारच खूप महत्त्वाचं आहे. सिनेमात काही वेळानंतर ती तेच तेच काम करत असताना पाहून संथपणा येतो आणि काय चाललंय, असं ज्या क्षणी वाटतं तिथेच सिनेमा जिंकलाय. काही मिनिटे तेच तेच करताना आपण पाहू शकत नसू तर बायका अख्ख आयुष्य चिरणं, धुणं, फोडण्या, घासणं, पुसणं यामध्ये घालवतात ते काही काळानंतर एकसुरी असू शकतं, हा विचार करायला हवा. तो विचार पटला तर काही तरी चुकतंय असं वाटू शकेल. तीच बदलाची सुरुवात असेल. अशी सुरुवात करू या आज, आत्तापासून आणि मुख्य स्वत:पासून.

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

आतला आवाज ऐकू या!

 

आत्महत्येसारख्या घटनेनंतर बोलायला हवं होतं, कुणाला बोलावं वाटलं तर मी आहे वगैरे म्हणण्यापेक्षा जवळच्या एका तरी मनाची खळबळ ओळखू इतकं कुणाचं आपण होऊ शकू का, हा प्रश्न विचारू या स्वत:ला.



ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा 

क़ाफिला साथ और सफ़र तन्हा

सभोवतालचं जग आनंदानं वावरत असतं, गाड्यांचे आवाज-माणसांचा वावर जाणवत असतो, पक्षी-प्राणी त्यांच्या परीनं विहार करत असतात, दोस्तांचा-नातेवाईकांचा-सहकाऱ्यांचा-जोडीदाराचा हात हातात असतो, बरं सोशल मीडियावर मुबलक वावर असल्यानं तिथला गोतावळाही मोठा असतो, सकाळपासून रात्रीपर्यंत आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर बांधलेलं असतं, मन आणि वेळ रिकामा राहण्यासाठी जागाच नसते हे असं सगळं असताना एकाकीपण, अस्वस्थता, नैराश्य कसं आणि कुठून येतं असावं? आपल्या व्यस्त आयुष्यात शिरकाव करण्याची संधी त्याला कशी-कुठून मिळत असावी? ही सगळी खळबळ होत असताना ती व्यक्त करण्याचं धैर्य, गरज, इच्छा, खुलेपण यातलं काही डोकावत असेल का मनाच्या कोपऱ्यात

प्रश्नांचं काहूर उठतं या सगळ्या विचारांनी आणि मग वाटतं, ज्या गोतावळ्याचा अभिमान आपण मिरवतो, शेकडो लोकांची साथ आपल्याला आहे, हे दाखवत असतो, त्यातला एकही खांदा-मन निवडता येत सेल किंवा अगदी हाती घट्ट हात असणाऱ्यांना पकड सैलावल्याचं जाणवत नसेल? भावनांचा निचरा होऊ शकेल, असा एकही आधार वाटू नाही? मला जज करता जसं आहे तसं समजून घेणारा एकही भक्कम हात हातात आहे, असं वाटू नाही? मग गोतावळा म्हणजे काय? माणसांचं-दोस्तांचं-आपल्या लोकांचं कोंडाळ भोवती असणं म्हणजे काय? या सगळ्यांमध्ये असतानाही एकटं, त्याहीपेक्षा एकाकी होणं किती भयानक असेल? अस्वस्थता किती पोखरत असेल? आतून तुटलेपण येणं किती असह्य होत असेल?

रवा मानसिक आरोग्य दिन झाला. त्यानिमित्तानं सध्याचा ताणतणाव, स्पर्धा, मनाची विस्कटलेली घडी, चिंताचं काहूर, मग नात्याची गुंतागुंत अशा अनेक बाजूंचा सोशल मीडिया आणि इतर अनेक ठिकाणी ऊहापोह झाला. पण तो दिवस एकूणच निमित्त. लॉकडाउन, त्यामुळे निर्माण झालेला गुंता, बदलती परिस्थिती, करोना संकटाचा मानसिक सामना अशा अनेक बाजूंनी आज चिंता मोठी होत आहे. त्यामुळेच या काळात मानसिक आरोग्याकडे अधिक गांभीर्याने बघण्याची आवश्यकता वाटू लागली.

अनन्या, आशुतोष, राधिका आणि अगदी सुशांतसिंग राजपूतसारख्या तरुण, रुढार्थानंयशस्वीअभिनेत्याच्या आत्महत्येनंतर मनात खळबळ उडाली. मग कुणी बॉलीवूडच्या राजकारणावर बोलू लागलं, कुणाला मानसिक आरोग्य हा विषय आजवर दुर्लक्षित राहिल्याची जाणीव झाली, कुणाला समस्त मित्रांना बोलण्यासाठी आपण उपलब्ध आहोत, हा विश्वास द्यावा वाटला, तर कुणाला हे पाऊल म्हणजे पळपुटेपणा सर्वांगानं चौफेर मतमतांतरं आदळत होती. बोललं जात होतं. पण तरीही काहीतरी राहतंय, एक धागा जो सुटतोय नि त्यामुळे सगळीच वीण उसवतेय असं वाटत राहिलं.

मानसिक आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीबाबत या क्षेत्राशी निगडित बऱ्याच जणांशी यानिमित्तानं बोलणंही झालं. मानसिक आरोग्यावर माझा अभ्यास नाही, त्यामुळे त्यावर अधिकारवाणीनं मी बोलू शकत नाही, पण या विषयातील कुतूहलानं मी सतत जाणून घेत असते, बोलत असते. त्यातून काही गोष्टी जाणवल्या. नैराश्य हा एक आजारच आहे, त्यावर बोलून मात करता येते, कुणाला बोलावं वाटलं तर मी आहे हे लक्षात ठेवा, माझ्याशी मन मोकळं करा असंसोशलमीडियावर मोकळेपणाने जो तो टाकतोय. त्यातील भावही खूप खरा, आतून आलेला वाटतो अनेकदा. पण मानसिक आरोग्य अणि आजार हे ताप येण्याइतके दृश्य कधीच नसतात. आपल्याला आजार झालाय, दुखतंय, उपचार घेण्याइतक्या वेदना बळावल्यात आणि उपचार घेऊनबरेहोऊ शकतो, हा विचारच संबंधित व्यक्तीच्या आतपर्यंत अनेकदा झिरपत नाही. वरवर सगळं उत्तम दाखवण्यासाठी जी जीवघेणी घालमेल होते, ती प्रत्येकजण सांगू, बोलू शकतंच नाही. आतून वाटू लागलं तरी ते समजून घेणारे भोवताली असतीलच असंही नाही. अशा परिस्थितीत आज जे मी आहे हे लक्षात ठेवा म्हणतात, त्यापैकी किती जण आपल्या अत्यंत जवळच्या एका तरी माणसाच्या मनातील ही घालमेल सांगता समजून घेऊ शकतात? आवाज-वागण्यातले बदल नोंदवू शकतात, आपण कुणाला इतकं जवळून ओळखू शकतो, ही बाबही महत्त्वाची वाटते. कारण मला नैराश्य आलंय, असं ताप आल्यासारखं कुणी सांगणार नसतं. मी, माझं या चौकटीबाहेर जाऊन आपण आपल्या जवळच्यांना किती जाणतो? जिवाला जीव देणारं माणूस हवं म्हणजे नेमकं काय, हे कधी उमगतं का आपल्याला?

ऑफिस, मित्रमंडळी, सोशल मीडिया, करिअरमुळे खुणावणारं विश्व अशा अनेक कंपूत आपण रमत असतो. तिथल्या प्रत्येकाचं एक दृश्य आणि अदृश्य जग असतं. समोर दिसतं त्यापेक्षा अनेकदा कितीतरी आतं असं ज्याचं त्याचं जग असतं. प्रत्येकाच्या स्वभावानुसार ते समोर येत असतं. अनेकदा सोशल मीडियाच्या आभासी म्हणाव्या अशा जगात आपलं यश, आनंद दाखवण्याचा अट्टहास इतका मोठा होतो की त्याचं नकळत दडपण आपल्या आयुष्यावर कधी येतं ते लक्षातच येत नाही. इतरांच्या वाट्याला सगळं इतकं उत्तम येत असताना माझंच आयुष्य असं का, ही तुलना मोठी होऊ लागते. त्याचा ताण दिसू लागतो.

महिलांच्या आयुष्यातील टप्पे आणि मनोवस्था यावर व्हिडीओ करताना डॉ. आनंद नाडकर्णी अगदी सहज म्हणाले.. बायकांचं बोलणं, गॉसिप, गप्पा याकडे लोक तुच्छतेनं बघतात अनेकदा.. पण या सगळ्यातून बाकी काही होत असेल नसेल, तिचं मन मोकळं होतं भडाभडा बोलून भावनांचा निचरा होतो. आनंद, दु:, संताप, वेदना खणखणीत व्यक्त होत असल्यानं पाटी कोरी होऊन नव्यासाठी जागा तयार होते. मनात आलं आता किती जणांना भावनांची अशी पाटी कोरी करणं जमतं? असा निचरा आपण करतो, होऊ देतो? मग गुंतागुंत वाढतच जाते. अनाहूत दडपण येत जातं. त्यातून निराशेची भावना घर करून राहते. अस्वस्थता मोठी होऊ लागते. त्यातून एखाद्याला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं वाटतं. या अगदी भावनांच्या कडेलोटाच्या क्षणी जरी दिलासा देणारा हात हातात आला, तरीही सारं काही परत येऊ शकतं, सावरलं जाऊ शकतं. पण तो आश्वासक हात मिळण्याची आणि हातात धरण्याच्या तयारी या दोन्ही बाजू कळीच्या ठरतात. तो मिळालेल्यांचं आणि त्याचं महत्त्व उमगलेल्यांचं आयुष्य नव्यानं उभं राहतं. इथेच मित्र, मैत्रीण, जवळचा कुणी म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी मोठी होत असते. आत्महत्येसारख्या घटनेनंतर बोलायला हवं होतं, कुणाला बोलावं वाटलं तर मी आहे वगैरे म्हणण्यापेक्षा जवळच्या एका तरी मनाची खळबळ ओळखू इतकं कुणाचं आपण होऊ शकू का, हा प्रश्न विचारू या स्वत:ला. बाकी मला नैराश्येने ग्रासलेलं, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली, वाईट मनोवस्थेतून गेलो हे आपल्यापैकी किती जण खुलेपणानं मान्य करतील, त्यांवर बोलतील? मानसिक दुखावलेपण आजही गूढतेच्या चक्रात आहे, यांवरही विचार करूया. त्याचवेळी स्वत:ला आणि दुखावलेल्या प्रत्येक मनाला सांगू या

थोड़ा सा रफू करके देखिये ना,

फिर से नयी सी लगेगी, ज़िन्दगी ही तो है