सोमवार, २३ मार्च, २०१५

जगणं तिला कळले हो…


वय वर्ष १६ ते १८… या वयात आपण काय करतो? शाळा, कॉलेजचं रूटीन. आपल्याला काय हवं, याची आईवडिलांसमोर यादी ठेवायची. क्लास, अॅक्टिव्हिटीज यात जगाचा विसर पडू देत भन्नाट, बेबंद जगायचं. त्या वयाची नशाच वेगळी. पण, असं मुक्त स्वच्छंद जगण्याचा, भान हरपायला लावणाऱ्या वयाचा अनुभव घेण्याचा आनंद प्रत्येकालाच मिळतो, असे नाही. काही मुले याच वयात स्वतःबरोबर कुटुंब, आपला समाज, त्यांचे कल्याण असे प्रचंड बोजड (आपल्यासाठी बोजडच) विचार करतात. नुसतेच विचार नाही, तर कृतीही करतात. इतक्या लहान वयात हे भान येतं कुठुन?

परवा ‘तिचा’ फोन आला. हॅलो, ताई ओळखलंस का गं? सांग मी कोन बोलतेय ते… आवाज अगदी ओळखीचा, लक्षात राहिलेला वाटला.. पण नावच डोळ्यासमोर येईना… अग ताई आपण एकदाच भेटलो, पण माझ्या लक्षात आहेस तू… तू मात्र विसरलीस? खट्टू होत तिने असं म्हटल्यावर मला अधिकच ओशाळल्यासारखं वाटू लागलं… त्याचक्षणी लख्खकन आठवलं.. अरे हीच ती. पुरस्कार वगैरे मिळवलेली. प्रचंड आत्मविश्वास बाळगणारी आणि सतत जगाशी दोन हात करण्यासाठी सरसावलेली.. तीच शेवंता. एकदाच भेटलेले तिला. पण जादू केली या पोरीनं. तिला मिळालेला पुरस्कार घेण्यासाठी ती मुंबईत आली आणि पत्रकार म्हणून मी तिला भेटले. तशा आणखीही लढवय्या होत्याच. पण, माहीत नाही, शेवंता अगदी मनाला भिडलेली. तिला मी माझं कार्ड दिलं आणि मुंबईत कधी आलीस, किंवा केव्हाही कसलीही मदत लागली तरी हक्कानं फोन कर, असं आवर्जून सांगितलेलं. त्यामुळे मला वाटलं नेमकी काय अडचण असेल? माझे विचार सुरू असतानाच तिनं थांबवलं नी म्हणाली. ताई, सहज फोन केला. आठवण आली तुझी. काही सांगावं वाटलं तुला… पुढेही ती बोलत राहिली. पण, मी मात्र आमच्या त्या मला थक्क केलेल्या भेटीत पोहोचले होते.

लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये असलेल्या फरतपूर तांड्यांवर राहणारी शेवंता राठोड. आई-वडील ऊसतोडणी कामगार. त्यामुळे सहा महिने विंचवाचं बिऱ्हाड. उरलेले दिवस रस्त्यावर डांबर ओतण्याचं काम. हरभरा, तुरीच्या शेतातली कामं, असं करत गुजराण करणारं तिचं कुटुंब. त्यातच वडलांनी साडेसात लाख रुपये खर्च करून एका ‘शिक्षका’शी बहिणीचं लग्न करून दिल्यानं घरावर कर्जाचा डोंगर. त्याही आधी सख्ख्या आत्यानं ब​हिणीसाठी न पेलवणारा हुंडा मागितल्यानं वडील पुरते कोलमडलेले. मुलींच्या लग्नाच्या चिंतेनं त्यांना दिवसरात्र पोखरलेलं. अशा स्थितीतच हुंड्याच्या हंड्या देऊन वडिलांनी तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न केले. समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात जागृत करण्याचे बाळकडून देण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकाशी तिचं लग्न झाले. शेवंतासाठी हा पहिला धक्का होता. ज्यानं हे थांबवायला हवं, तोच हात पसरून उभा आहे, हे तिच्या मनाला लागलेलं. आत्याचं घर तर तिनं टाकलंच होतं. पण, या कर्जाच्या ओझ्यानं खचलेल्या वडिलांना हात द्यायलाच हवा, हा विचार त्या बालवयातही तिच्या मनानं घेतला आणि दिवसरात्रीचं भान न बाळगता ती त्यांच्या बरोबरीनं मेहनतीची कामं करू लागली. गुरं राखणं, खुरपणी, शेताला पाणी देणं ही कामं करू लागली. माणसं, प्राणी, जनावरं, दिवस, रात्र.. कशाचंच भय तिला उरलं नव्हतं. हे सगळं करताना शाळेच्या दिनक्रमात तिनं कधी अडथळा येऊ दिला नाही. हाती असलेला पैसा पाहून कधी एसटीनं, कधी चालत जात १५ किमीवर असलेल्या शाळेतून आपलं शिक्षण सुरू ठेवलं. बोचरी थंडी, कडाक्याचं ऊन याची पर्वा न करता इतक्या लहान वयात तिचे हात राबत राहिले.

या वाटेतील अडथळा म्हणजे चौदाव्या वर्षी तिचं लग्न करण्याचा घातलेला घाट. पण, त्याक्षणी तिनं वडिलांशी भांडण केलं. बघायला आलेल्या मुलाला दोन शब्द सुनावून वाटेला लावले. मोठ्या हिंमतीनं तिनं आपलं लग्न थांबवलं. गावातील आणखीही चार-पाच बालविवाह रोखले. यासाठी हिंमतवाल्या मैत्रिणींची टोळीच जमवली. कुणाचं शिक्षण थांबवलं जातंय, कुणाला मारहाण होतेय, कुणाला सक्तीने बोहल्यावर उभं केलं जातंय, कुणाकडे वाकवणारा हुंडा मागितला जातोय… सगळ्या अडचणींवेळी ही टोळी​ हजर होते. मुलासाठी अट्टहास करणाऱ्या समाजातील या मुली म्हणजे त्यांच्या आईवडलांना त्यांची ताकद वाटावी, इतका बदल या मैत्रिणींनी घडवून आणलाय. दहावीत शिकणाऱ्या शेवंतानं गावात मुलींचा बचतगट सुरू केलाय. त्यातून मुलींना त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकीन गावात स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा तिचा प्रयत्न आहे. पुढची पिढी व्यसनमुक्त असावी, त्यांचं आयुष्य असंच रगडलं जाऊ नये, असले विचारही या मुली करताहेत. आमच्या तांड्यावर एकही पानपट्टी नाही, हे सांगताना अभिमान तिच्या डोळ्यात चमकला होता. ताई रडत बसणं, हार मानणं मला पटतच नाही. सरळ जाऊन भिडायचं, द्यायची टक्कर असं बोलताना तो आवेशही तिच्यात संचारला होता…

शेवंताच्या एका फोननं मला हे सगळं पुन्हा आठवायला लावलं.  पुन्हा कुणाचा तरी बालविवाह तिनं थांबवला होता. कुणाच्या शिक्षणातील अडथळा दूर केलेला. सगळं भरभरून बोलत होती. हे सांगतानाच ताई बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्जही फिटत आलंय गं… त्यामुळे बाबा खूष असतात, हे सांगताना ती हळवी झाली होती. पण काही क्षणच… छान वाटलं तुझ्याशी बोलून. करेन पुन्हा फोन असं म्हणत, तिनं फोन कटही केला. पण… खरं तर मलाच तुझ्याशी बोलून मस्त वाटतंय.. बळ मिळंतय… वगैरे… जे मला सांगायचं होतं, ते सांगण्याइतकं भानच मला उरलं नव्हतं.