फँड्रीमध्ये व्यवस्थेवर दगड फेकून मारणारा जब्या किंवा घरात रांधा-वाढा-उष्टी काढा करत जिथे तिथे पुरे पडण्याची अपेक्षा धरणाऱ्यांवर संतापाचे पाणी फेकणारी ‘द ग्रेट इंडियन किचन’मधील सखी … दोन्ही गोष्टीत एक सारखेपणा आहे. समाजाने, व्यवस्थेने वर्षानुवर्षे केलेला अन्याय भिरकावण्यासाठी एकवटलेलं बळ.
खरं तर ती कोण आहे आणि काय सांगू पाहतेय? ती आणि समाजातील ९० टक्के बायकांची गोष्ट फारशी वेगळी नाहीच मुळी. मग तरी ती वेगळी का वाटतेय? कारण समाजाने, पुरुषप्रधान संस्कृतीने आजवर जे लादले किंवा मधाचे बोट लावून ज्या गोष्टी गळी उतरवल्या, करण्यास भाग पाडल्या त्याविरोधात आवाज उठवता येऊ शकतो, ही जाणीव प्रत्येकीच्या मनात पेरण्याचे काम तिने केले आहे. त्याचबरोबर समाजातील पुरुषांना तुम्ही बदलला नाहीत, तर आम्ही बदलू याची स्पष्टपणे जाणीव करून दिलीये. आज आपल्या समाजातील अनेकींना आपल्यावर काही लादलं जातंय, याचीच जाणीव नसते. त्यांना जे करावं लागतं, ते असंच असणार अशी गृहितक मांडून त्या आला दिवस जगतात. पण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा आणि नकार देण्याचा अधिकार आहे, ही जाणीव करून देण्याचे काम या सिनेमातील ‘तिने’ केले आहे. त्यामुळेच हा सिनेमा तिचा, बायकांचा यापेक्षा समाजातील समस्त वर्गाचा आणि रुढीचे खुंट अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रत्येकाला धक्का देण्याच्या प्रयत्नांचा अधिक आहे.
एका समवयस्कांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिने धरलेला आरसा लखलखू लागला. प्रत्येकाच्या मनात खळबळ तर होतीच. शिवाय त्या सगळ्यांच्याच नजरेत ते पुढारलेल्या विचारांचे, महिलांच्या हक्कांबाबत जागरूक असलेले वगैरे आहेत, अशीच भावना होती. त्यामुळे ती सांगू पाहत असलेली गोष्ट आपल्याशी संबंधित नाहीच, या गृहितकावरून चर्चेची मांडणी होत राहिली. मी सकाळी आठला घर सोडतो, ते रात्री आठला येतो. ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात तर कामाचे तास असे उरलेच नाहीत. तरीही तिची मीटिंग असेल तर मी वेळ काढून संध्याकाळचा चहा करतोच. तिने यादी दिली की भाजीपाला आणि किराणा आणण्याचं कामही अनेकदा करतो. जबाबदारी दोघांची आहेच ना, असा सूर एकाने धरला. त्यावर आणखी एक पुढारलेले मत येऊन पडले. मला काही हे सगळं जमणार नाही, तिने करावे अशीही अपेक्षा नाही. मी सांगितले तिला सरळ सगळ्या कामांना मदतनीस नेमून टाक. अगदी भांडी घासण्यापासून भाज्या, धान्य निवडण्यापर्यंत. तिला हवंच असेल तर स्वयंपाकालाही. फक्त आपली पद्धत तिला शिकव इतकंच म्हटलं. थोडक्यात मी करणार नाही, तू करावं अशी अपेक्षा नाही हे अगदी क्लिअरच केलंय. मांडली गेलेली ही प्राथमिक दोन मतं. बहुतांश सूर हे आम्ही कशी मोकळीक दिलीये, तिचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे वगैरे होते. त्यांच्या या प्रश्नावर मला पडलेल्या चारच प्रश्नांची तथाकथित पुढारलेल्यांकडे मात्र उत्तरं नव्हती आणि हीच मेख आहे ‘दिलेल्या’ आणि अपेक्षित मोकळीकीत.
चहापासून पुरणपोळीपर्यंत स्वयंपाक येणे हे कौतुकास्पद आहेच. पण फक्त येऊन उपयोग नसतो, तर रोजच्या चहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतच्या कामात माझा वाटा किती आणि आवड, मूड म्हणून नाही तर जबाबदारी, बांधिलकी म्हणून किती पेलतो, हे महत्त्वाचे आहे. दोन दिवस चहा करून, नि चार दिवस कूकर लावून विचारांची, कृतीची समानता सिद्ध होणार नसते. मी ही करणार नाही, तू ही करू नको या विचारांत तर मूलभूतच गोंधळ आहे. एका घरात राहत असताना कुणीच न करता, फक्त मदतनीसांच्या भरवश्यावर घर चालतं? नाश्ता काय करायचा, जेवणासाठी काय काय हवे, त्यासाठी आवश्यक गोष्टी आणलेल्या आहेत का? घरात पाहुणे आले तर त्यांच्यासाठी काय त्याचे नियोजन, तयारी. मदतनीसांना सूचना देऊन हे करून घेण्याचं काम कुणाचं? त्यांच्या वेळांशी जुळवून घेण्याची कसरत आणि ऑफिसच्या डेडलाइन्सचे गणित कोणी जमवायचं? बरं घरात फक्त ढोबळ दिसतात, तितकीच कामं असतात? कपडे धुण्यापासून इस्त्री होऊन कपाटात जाईपर्यंत, भांडी घासून पुसून जागेवर ठेवण्यापर्यंत, घराच्या भिंतीचे कोपरे वारंवार तपासून स्वच्छ ठेवण्यापर्यंत, घरातल्या सगळ्या बेडशीट, कव्हर काढून बदलून, धुवून नवी घालेपर्यंत, पडदे दोन महिन्यांनी की चार महिन्यांनी धुवून पुन्हा जागेवर येईपर्यंत असंख्य गोष्टी तिला डोक्यात ठेवाव्याच लागतात. ही कामं तिने सांगितली आणि मी केली असं न करता आपली म्हणून स्वत:हून कोणकोण करतं? त्याचं गणित कुणाच्या डोक्यात असतं? घरातील नळाचं लिकेज, पंख्यातून येणारा आवाज, बँकेतून आणायची सर्टिफिकेट, आठवड्याचा भाजीबाजार, महिन्याचा किराणा, विजेपासून क्रेडिट कार्डपर्यंतची बिले, एवढं करून कामाच्या वेळा, डेडलाइन्स, टार्गेट्स बरोबरीने संध्याकाळचा कूकर, भाजीची फोडणी, सकाळच्या नाश्त्याची तयारी अशी असंख्य व्यवधानं आपली म्हणून किती जण पेलतात? स्वत:करा किंवा करून घ्या, पण करून घेण्याची जबाबदारी तर तिच्यावरच असते ना. यावर उत्तर होते इतके स्वातंत्र्य दिल्यावर एवढे तर करावे लागणारच ना. स्वातंत्र्य देणं आणि मानणं हाच फरक लक्षात येत नाही तोवर बदल घडूच शकत नाही. माझ्यावर कामाचा इतका ताण असतो, लोकांना भेटायचं असतं. एकच सुट्टी मिळते, त्यात हेच करायच? डेडलाइन्स असतात. मित्रपरिवाराबरोबर ‘मी’ टाइम हवा असतो. हेच घरगृहस्थी करत बसलो तर माझा वेळ कुठून आणणार? क्षणभर हसू आलं. तिलाही तिच्या अशाच वेळाची गरज असते, आठ दिवस, महिनाभर चार महिने तिलाही यातलं काहीच करू नये असं वाटलं तर? हा विचार कधी तरी कुणी करत असेल?
लॉकडाउनच्या काळात अनेक पुरुष पहिल्यांदाच इतके घरात राहिले. मग स्वयंपाकघरातील त्यांच्या करामती, मॉप हातात घेऊन स्वच्छता, भांडी घासणं अशी घरगुती कामे करताना अनेकांनी फोटो पोस्ट केले. अनेक महिलांनी घरच्या ‘पुरुषां’चे असे फोटो कौतुकोद्गारासह पोस्ट केले. मुळात आपण ही कामे करतो याचे त्यांना स्वत:ला आणि घरातल्या बायकांना अप्रुप वाटले, यातच प्रश्नाचे मूळ आहे. आज त्याच्या मनात आले त्याने केले, उद्या तसे नसेल. पण तिच्या मनात आठ दिवस काहीच करू नये, असे लॉकडाउनच्याच काळात आले असते, तर चालेल? असं कसं घर आहे, अडचण आहे तर करावंच लागणार हा सूर तिच्यासाठी आळवताना स्वत:साठी लावू शकतो का, हा विचार तेव्हा आसपासही नसतो.
मुळात आपल्या जडणघडणीतूनच हे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे त्यात वावगं न वाटण्याइतकं सरावलेपण येतं. घर आणि निगडित जबाबदाऱ्या या तिच्या असतात. मग त्या तिने स्वत: पेलाव्यात किंवा कुणाकडून करून घ्याव्यात. पण अंतिम जबाबदारी तिचीच असते, हे आई, आजी, बहिण यांच्या वावरातून दिसतं आणि मनात पक्कं होतं. मग आई करते, बहीण करते तर बायको का नाही? घर दोघांचं आहे तर तिला करावंच लागणार ही धारणाही त्यातूनच. पण घर दोघांचं आहे तर जबाबदारी दोघांची हा विचारही डोकवतच नाही. जबाबदारी घेतानाही तिनं यादी केली की… असं का असतं? घरातील डाळ, तांदूळ, कणिक, साबण संपले आहेत. पडदे, बेडशीट आणायला हव्या आहेत, वॉशिंग मशिन कुरकुरतेय, फ्रीज बदलायला झालाय या गोष्टी तिनं यादी केल्यानंतर का लक्षात याव्यात? अनेकांना घरातील चहा, साखरेचे डबे कुठे आहेत, गॅस कसा पेटवायचा हेच माहित नसेल, ती नसेल तर कपड्यांचा ढिग तिची वाट बघत कपाट रिकामं करत राहत असेल, तर तेव्हा कधी तरी तरी आठवतं का की घर दोघांचं आहे!
मासिक पाळीच्या काळात बाजूला बसण्याची प्रथा अशीच लादलेली. पूर्वीच्या काळाची फुटकळ समर्थने देत आजही कामाच्या व्यापात तिला हे उद्योग करावे लागतात. अगदीच बाजूला बसायचे नाही तरी या काळातील तिची मनस्थिती, दुखणे-खुपणे, याची पर्वा कितीजण करतात? तिला होत असलेल्या त्रासाची जाणीव किती जणांना असते, तो कमी नाही तर शेअर तरी करावा, असं किती जणांना वाटतं. मुळात मासिक पाळीत तिला त्रास होतो म्हणजे नेमकं काय, हे किती जणांना माहीत असतं? प्रश्नांची यादी इतकी लांबलचक आहे की समानतेच्या रस्त्यावर आपण अर्ध अंतरही चाललेलो नाही, हे लक्षात आपोआप येतं. हे प्रश्न आजचे नाहीत. यावर कुणीच कधीच बोललं नाही, असंही नाही. मुळात समानतेच्या आणि पुढारलेपणाच्या कल्पनाच इतक्या तकलादू आहेत की त्या बदलण्यापासूनच यातील बदलची सुरुवात होऊ शकते. पण या अशा विषयावर एक अख्खा सिनेमा होऊ शकतो, हा विचारच खूप महत्त्वाचं आहे. सिनेमात काही वेळानंतर ती तेच तेच काम करत असताना पाहून संथपणा येतो आणि काय चाललंय, असं ज्या क्षणी वाटतं तिथेच सिनेमा जिंकलाय. काही मिनिटे तेच तेच करताना आपण पाहू शकत नसू तर बायका अख्ख आयुष्य चिरणं, धुणं, फोडण्या, घासणं, पुसणं यामध्ये घालवतात ते काही काळानंतर एकसुरी असू शकतं, हा विचार करायला हवा. तो विचार पटला तर काही तरी चुकतंय असं वाटू शकेल. तीच बदलाची सुरुवात असेल. अशी सुरुवात करू या आज, आत्तापासून आणि मुख्य स्वत:पासून.