रविवार, ३ मे, २०२०

सुगंधी प्रवास


 

सकाळची वेळ. अगदी सूर्योदय वगैरे नाही. पण तरी माझ्यासाठी लवकरचीच. हॉलची खिडकी उघडली नि सुगंध भरून गेला. आज बाल्कनीतल्या माझ्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये आनंदाचा सुगंध दरवळत होता. साधारण दीड वर्षापूर्वी तळेगावहून बसमधून काय चिखल आहे, अशा लोकांच्या शिव्या खात अनंताचं झाड माझ्या मठीत घेऊन आले. त्याच्या आधी गेले तेव्हा सोनचाफा असाच आणला होता. तिसऱ्या फेरीत कृष्णकमळ दाखल झालं होतं. हे तीनही प्रवास माझ्यासाठी सुगंधी स्वप्न होते, जे मी नव्या मातीत रुजवणार होते. रोज इमाने इतबारे पाणी, कुणी सांगितलं म्हणून झाडांची संगीत थेरपी, कुणी सांगितलं म्हणून गप्पा, कांद्याचं पाणी, असे सारे काही मनापासून केले नि त्याचा ‘बंपर’ आनंद मला मिळाला. मंद पण स्वत:चे अस्तित्व दाखवणारा अनंताचा वास, थोडासा उग्र पण कुठूनही ओळखता येणारा सोनचाफा, नि या दोघांपुढे सुगंधाने कमी असलेले पण रूपाने नि वाऱ्याच्या मंद झुळुकेबरोबर जाणवणारे कृष्णकमळाचे देखणे अस्तित्व. आज सारा आनंद एकत्रित माझ्या वाट्याला आला होता. एरवीही सदाफुली, मोगरा, झेंडू, शेवंती फुलत असते. त्यांचीही निगुतीने काळजी घेत असते. पण अनंत, सोनचाफा नि कृष्णकमळाला माझ्या आठवणी नि मातीतील प्रेमाचा सुगंध होता. त्यामुळे त्यांचं फुलणंही माझ्यासाखी खास होतं. 
चार-बाराच्या शिफ्टमध्ये काम करताना माझी सकाळ कधीच लवकर होत नाही. आईच्या भाषेत सांगायचं तर सूर्य साधारण अर्धा डोक्यावर येतो तेव्हा मी उठते. त्यामुळे दारातील फुलांचाही अर्धा दिवस उमलून नि सुगंधाची पखरण करून झालेला असतो. त्यानंतर रोजची कामं, आवराआवर, काही वाचणं-ऐकणं-पाहणं, मेसेज, फोन नि त्यानंतर ऑफससाठी बाहेर पडणं या सगळ्यातच तो सुगंध नि त्यांचं अस्तित्व मागे पडतं. पण लॉकडाउननं या सगळ्याची खास जाणीव करून दिली. सकाळी लवकरच उठून चहाचा कप हातात घेत बाल्कनीत कितीतरी काळ या फुलांचं फुलणं निरखत होते. अनंताच्या पाकळ्या एकेक करत फुलत होत्या नि फूल आकाराने मोठे नि देखणे होत होते. हे सगळं मी बघत होते, नोंदवत होते. तिन्ही सुगंधांचं मिश्रण जाणवत होतं. त्याचे फोटो मैत्रिणीला पाठवले तर तिने पाठवलेली प्रतिक्रया खूपच पटली. भावली. लॉकडाउनमुळे हा होईना पण हे अनुभवायला तू घरी आहेस, सुगंध तू ‘फिल’ करू शकतेय. एरवी ही फुले फुलली असती, एकटीच डवरली असती नि सुगंध हवेत विरूनही गेला असता. खरंच आहे ना?

उद्याच्या जगण्याच्या तयारीत, अस्तित्व शोधण्याच्या प्रयत्नांत, स्पर्धेच्या लढाईत आपला आजचा दिवस नि त्यातला आनंद, जगणं ‘फिल’ करायचं राहतंय का? जो दिवस आलाच नाहीये, त्याच्या तयारीसाठी आजचा आनंद नजरेआड होतोय का? म्हणजे उद्याचा कानोसा घ्यायचाच नाही? तयारी करायचीच नाही? ती तर करावीच लागते. झाडं, वेली पण आधी मोठे होतात, फांद्या पसरतात, कळ्या धरतात नि मग उमलण्याचा क्षणिक आनंद मिळतो. त्यानंतर फूल सुकतं, पाकळ्या गळून पडतात, कधी फूल तोडलं जातं, नि झाडाला पुन्हा नव्याने उमलण्याची आस लागते. आपल्यालाही असं आधी फुलण्याचा आनंद अनुभवणं नि मग नव्यानं फुलण्याची तयारी करणं जमेल?
माझ्या दारात असाच मी मरवा लावलेला. त्याचा वेल मस्त चढायला लागला. छोटी छाटी चांदणफुलं फुलायला लागली. अख्खावेल शुभ्र फुलांनी नि मंद सुगंधानं भरून गेला. मैत्रीण वारंवार सांगत होती. लक्ष ठेव. त्यात बीज तयार होतं. ते पुन्हा रुजवावं लागतं. पण बहरलेल्या वेलाच्या आनंदात मी नंतर बघू म्हणत, बीज शोधलंच नाही. कालांतरानं त्या वेलाचं जगणं संपलं नि नव्याने रुजवणंही राहून गेलं. वेगळीच हुरहूर जाणवली. एखादी गोष्ट त्याच वेळेत नाही केली, तर पुढे उमलणारं छान काही गमावू शकतो, याची जाणीव तीव्रतेनं झाली. गोष्टी करायच्याच असतात पण त्याची वेळ साधता येणं किती महत्त्वाचं असतं ना?
फुलांचं नि माझं नातं खूप लहानपणापासून. छोट्या शहरात राहत असल्यानं अंगण नि दारात फुलं हे ओघानंच आलं. अगदी अंगण शेणानं सारवण्यापासून सारा अनुभव घेतलेला. आमच्या दारात मोगरा, गावठी गुलाब, कुंद, अबोली, जास्वंद अशी फुलं होती. नि मागच्या दारात भोंडे आजीचं मोठी बाग. पांचळ काकूंकडे निळ्या कृष्णकमळाचा वेल. झाडं रुजली त्यांच्या अंगणात असली, तरी अर्ध्याहून अधिक ती आमच्या दारात फुलायची. माझी आजी रोज संध्याकाळी उमलायला आलेली फुलं तोडून माझ्यासाठी गजरा करायची. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना आठवण करायची. रोज केसावर गजरा माळून मी शाळेत जायचे. खूपदा मैत्रिणी हसायच्याही. पण गजरा माझ्या गणवेशाचा नि जगण्याचा भाग होता. कधी कधी वेणीपेक्षा गजरा मोठा होऊन मी बावळटही दिसायचे. आता हसूही येतं. पण तेव्हा मला फरकच पडत नव्हता. आजीने केलाय नि मला तो आवडतोय, इतकं पुरेसं होतं. किती छोटीशी गोष्ट किती मोठं समाधान देते. जगणं सुंदर करत असते, नकळतच. मोगऱ्याचा प्रसन्न गंध नि त्याला अबोलीची शांत साथ. किती छान वाटायचं तो आजीनं प्रेमान नि ठराविक अंतरानं गुंफलेला गजरा माळताना. आजही तळेगावला गेलं की आजी जवळ बसवून विचारते तुला आठवतंय का गं, मी रोज आपल्या दारातली आणि तिथे नसेल तर बकरे काकू, कऱ्हाडकर मामी, जोशी काकू नाहीतर भोंडे आजी, ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडून फुलं आणून गजरा करायचेच.. हे मला आठवत असावं नि मी प्रेमानं तिच्याकडे बघावं, इतकी छोटी अपेक्षा आजही तिच्या डोळ्यात दिसते. नि आम्ही सुगंधी आठवणीत काही काळ तरी रमतोच. आजी तू माझ्या वाट्याला किती सुगंधी जगणं दिलंय, याची जाणीव मला आहे गं. पण हे मी तिला का नाही सांगत?
भोंडे आजींच्या दारात अनंत पहिल्यांदा मला भेटला. ते झाड मोठं नि प्रचंड फुलणारं होतं. त्यामुळे अख्ख्या चाळीभर त्याचा घमघमाट पसरायचा. त्या सुगंधाशी एक वेगळीच, जुनी ओळख तयार झाली. मुंबईतील दोन फरश्यांच्या बाल्कनीत उमललेल्या अनंताच्या सुगंधात माझी माझ्या या आठवणींची भेट झाली. माझ्या शाळेच्या रस्त्यावर वडाची दाट सावली असायची नि या दोन वडाच्या झाडांमध्ये बुचाचं (त्याचं खरं नाव, किंवा सायंटटिफिक नाव नाही माहित) झाड उंच वाढलेलं असायचं. शाळेतून परतताना सायकल थांबवून मी ती फुलं गोळा करायचे. त्याचे लांब देठ एकमेकांमध्ये गुंफून वेणी तयार करायचे, नि घरी येऊन आईसाठी ठेवून द्यायचे. आई संध्याकाळी साडेसहा-सातला येईपर्यंत ती वेणीही सुकायची नि वीणही सैल व्हायची. शनिवारी मी शाळेतून घरी यायचे, तेव्हा आई आधीच घरी आलेली असायची नि फुलांची वेणी सुकण्याआधी आईला देता यायची. इतका आनंदाचा क्षण असायचा तो. खूप काही मिळवल्याचा. किती छोट्या गोष्टींतून आण निरपेक्ष समाधान मिळवू शकतो, खरं. कळतं पण वळत का नाही?
आमच्या चाळीत कुठूनसं एक ब्रह्मकमळाचे झाड आलं. एकेक करत ते प्रत्येकाच्या दारात रुजलं. या फुलांचा काळ अवघा दोन तासांचा असतो. ते दोन तास मंतरलेले वाटावे इतके कमाल असतात. त्या कमळाचं हळूहळू फुलत जाणं नि देखणं रूप संमोहित करायचं. ज्या घरात या फुलण्याची चाहूल लागे, तिथे आम्ही तो क्षण अनुभवण्यासाठी गोळा होत असू. फुलाचा उमलण्याचा क्षणिक काळ संपला तरी त्याच्या आनंदाच्या गप्पा उत्तररात्रीपर्यंत रंगायच्या. कॉफीचे कप रिकामे करत, हसत खिदळत सुगंधी आठवणींची ठेव घेऊन जो तो आपल्या घरी परतायचा. पुन्हा नव्या फुलण्याची आस घेऊन!!!
कॉलेज, नोकरी, करिअर या सगळ्यात मग सुगंधी आठवणींचा प्रवास मनात कुठेतरी खोलवर गेला. आठवण होणार नाही इतका. कधी तुळशीबागेत, कधी लोकलमध्ये मोगऱ्याचे गजरे दिसायचे. पण तितकंच. मुंबईत दोन फरश्यांच्या बाल्कनीत कुठली झाडं रुजणार नि बहरणार, हा विचार करत त्या वाटेलाही गेले नाही. पण आयुष्याचं जेव्हा रुटीन होऊ लागतं तेव्हा खोलवर रुजलेल्या अशा आठवणींचा सुगंध नव्यानं जाणवू लागतो. खुणावू लागतो. एक दिवस अचानक चार कुंड्या, माती नि रोपं स्कुटीवरून घरी आणली. न पेलवणारं ओझं दारापर्यंत आणलं. रोपं रुजवली पण मूळं धरेनात. कधी करपायची. कधी उंदिराच्या तावडीत सापडायची नि उत्साहाची माती व्हायची. पण मीही नेटानं नवं काही रुजवत राहिले. मधल्या काळात टोमॅटो, वांगी, मिरच्या अशा बऱ्याच भाज्या इथे ‘पिकल्या’. गंमतीने सासरे मला म्हणालेही इतकीच शेती आवडते तर गावी चल, नाही तर कामाला मिळंत कुठे कोण हल्ली? पण माझ्यासाठी या दोन फरश्यांच्या माझ्या विश्वात मी खूश होते. पण एकेक करत उंदराची नजर पडतच राहिली नि भाज्यांचा नाद सोडून सुगंधी पावले टाकली. कुठे थांबायचं नि नवी सुरुवात कशी करायची हे उमगंल की जगण मस्त होत नाही?
खूप आनंदात, कधी निराशेत, कधी वेदनेत, हरल्यावर, कधी काळजीत, समाधानात आणि जिंकल्यावरही मला घराचा हा कोपरा कायम खुणावत राहतो. सदाफुलीची सतत फुलण्याची सवय सकारात्मकता देऊन जाते. कॉफीचा कप, छानसं पुस्तक, आवडंत गाणं नि माझा हा कोपरा म्हणजे सर्वोच्च सुख वाटतं. एकांतात जिवाचे सारे आकांत इथे निमतात. नव्यानं सुरुवात करण्याची उर्मी देतात. आपल्याकडे असलेल्याच गोष्टींकडे नव्याने पहायला सांगतात. फूल फुलतं, त्याचा काळ संपला की गळून पडतं, पण झाड नव्यानं फुलण्याची उर्मी सोडत नाही. बहरत राहतं. डवरत राहतं, जगण्याची चिकाटी शिकवत राहतं. ऊन, वारा, पावसाच्या लहरीत हिंकाळतं, पाण्याअभावी मलूल होतं, पण संजीवनी मिळाली की जुनं विसरून पुन्हा सुरुवात करतं. थोडा काळ जावा लागतो. पण झाड पुन्हा बहरणारंच असतं. फुलणारंच असतं नि त्यांच्या अस्तित्वानं आपला प्रवास सुगंधी करणारंच असतं.
आज आपण सगळेच थांबलोय. मलूल झालोय. फुलण्याबाबत संभ्रम आहे. पण झाडाकडून चिकाटी नि हिरवं राहणं घ्यायचंय आपल्याला नि आनंदाची बाग बहरण्यासाठी मशागत करायचीये



६ टिप्पण्या:

  1. Sundar ...
    कुठे थांबायचं नि नवी सुरुवात कशी करायची हे उमगंल की जगण मस्त होत नाही?

    उत्तर द्याहटवा
  2. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद... नक्की लिहायच प्रयत्न करत राहीन. प्रतिक्रिया कळवत रहा

      हटवा
  3. अख्खा ब्लॉगभर मस्त सुगंध दरवळल्यासारखं वाटत होतं वाचताना...
    कॉफीचा कप, छानसं पुस्तक, आवडंत गाणं नि माझा हा कोपरा म्हणजे सर्वोच्च सुख वाटतं... हे तर कुणालाही हेवा वाटावा असं हवंहवंसं सुख आहे... अत्यंत संवेदनशील मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेलं सगळं शब्दांत उतरवल्या सारखं वाटतं आहे... कधीतरी रात्री उशिरा घरी येताना कुणाच्या तरी दारी उमललेल्या मधुमालतीचा मोहक सुगंध... कधीतरी पहाटे पहाटे फिरायला गेल्यावर मोहवणारा पारीजातकाचा सडा... हे सगळं एकेक करून मनात कुठेतरी एखादा हळव्या कोपऱ्यात जपून ठेवलेलं पुढे येत होतं वाचताना... आणि तुम्ही ज्याला बुचाचं झाड म्हणता त्याला आम्ही आजवर बकुळ म्हणत असो पण बकुळ वेगळी असते हे आताशा कळलय पण तुम्हाला जसं त्याचं मुळ नाव शोधावस वाटलं तसं मलाही वाटत होतं मग फोटो काढून पार reverse image वापरून शोधून काढलं नाव आत्ता आठवत नाहीय पण मी शोधेन पुन्हा... तर अशा वेण्या विनणाऱ्या मुली शाळेत असताना दिसायच्या आम्हालाही... खूप छान लिहिलंय तुम्ही... लिहीत रहा असंच...

    उत्तर द्याहटवा
  4. तर ते बुचाच झाड म्हणजे Indian Cork Tree.. scientific name Millingtonia hortensis
    अजून एक नाव म्हणजे आकाशनिम...

    उत्तर द्याहटवा