सोमवार, १५ जून, २०२०

मातीशी जोडलेली नाळ



एखादं रोप, बी मातीत रुजतं, मूळं धरू लागतात. रोपं वाढू लागतात. त्यानंतर त्यातल्या अनेक फळा, फुलांचा नवा प्रवास सुरू होतो. रोप रुजवणाऱ्या बियांचाही वेगळाच प्रवास असतो. कुठल्याशा मातीतून येऊन त्या नव्या मातीत रुजतात नि त्या मातीशी आपली नाळ घट्ट जोडतात. आपलंही असंच असतं ना? आपण एका मातीत रुजतो, बहरतो. काही निमित्ताने नव्या ठिकाणी जाणं होतं. नवं ठिकाण हेच आपलं सर्वस्व होऊन जाण्याइतपत आपण तिथे एकरूप होऊन जातो. पण त्यानंतरही आपल्या मूळ मातीशी, तिथल्या सुखदु:खांशी, मायेशी आपली नाळ जोडलेली असतेच. त्यामुळेच पुण्या-मुंबईत स्थायिक झालेल्या, पिढ्यान् पिढ्या शहरांत वास्तव्य केलेल्यांचेही गावाशी जोडलेपण राहते आणि ते पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचतेच.
कोकणातून अनेक कुटुंबं मुंबईत आली. पक्की मुंबईकर झाली. पण तरी गणपती नि शिमग्याला ते अस्सल कोकणी असतात. मे महिना संपताना त्यांना गणपतीचे वेध लागतात. नि नवं वर्ष उजाडताच शिमग्याचे. त्यानंतर आंब्याफणसाचा मोसम खुणावू लागतो. गावच्या दारात आंब्याची अढी लागते, नि त्याचा दरवळ मुंबईतल्या घरातही जाणवू लागतो. पुन्हा एकदा चाकरमानी कोकणाच्या दिशेने निघतो. एसटी, रातराणी, मंगला मिळेल त्या गाडीनं गाव गाठायचं नि ओसरीत निवांतपण अनुभवायचं, ही सुखाची परमोच्च कल्पना. जन्मानं मुंबईकर असलेल्या आमच्या पिढीतल्या मंडळींनाही गाव, गावपण, घर, माती नि तिथल्या जगण्याची ओढ वाटते, हे अधिक महत्त्वाचं.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातूनही अनेक मंडळी कामाच्या निमित्तानं मुंबई, पुण्यात आली आणि इथलीच झाली. पण तरी गाव, तिथल्या घडामोडी, राजकारण, जगणं, आनंद, वेदना सगळ्यावर त्यांचं लक्ष असतंच. गौरी, गणपती, दिवाळी, श्राद्ध, लग्न, समारंभ सगळं आजही मूळ घरी म्हणजे गावी जाऊनच करण्याचा कल असतो. त्यासाठी दरवेळी शहरांतून अनेक गोष्टींचा भार गावी वाहून न्यावा लागतो. मांडवापासून ते वस्तूंपर्यंत आणि श्रमापासून पैशापर्यंत सगळ्याची जुळवणी करावी लागते. पण मांडव गावातच पडणार, हे ठरलेलंच असतं. अनेकांची गावी राहणारी पिढीही आज हयात नाही. पण मूळ घर, मूळ देव नि आपलं मूळ मानत पावलं गावाकडे वळतातच.
तळेगाव-मुंबई हा प्रवास एसटीने करायला मला फार आवडतं. या एसटी प्रवासात खूप वेगळ्या प्रकारची, स्वभावाची माणसं भेटतात. त्यांना जवळून अनुभवता येतं. अत्यंत खरी नि मातीशी एकरूप झालेली ही माणसं मायेचं गाठोडं बांधून स्वप्ननगरीकडे प्रवास करतात. थेट मुंबई एसटी नसल्याने जुन्नर, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर अशा तळेगावमार्गे जाणाऱ्या गाड्यांचा पर्याय असतो. एका प्रवासात नारायणगावहून कुर्ल्याला चाललेले आजी-आजोबा भेटले. सत्तरी सहज ओलांडलेली असेल. बस पूर्ण भरल्यानं उभ्यानं लोणावळ्यापर्यंत जावं लागेल. तिथे दोन सीट रिकाम्या होतील, अशी कल्पना कंडक्टरनं दिली. प्रवास सुरू झाला नि या आजींनी हाक मारली. बाय इकडं यं किती वेळ उभी राहशील, असं म्हणत आजोबांना म्हणाल्या घ्या ज्जराशी सरकून. बस बाय. तुला कितीशी जागा लागतेय, असं म्हणत लोकलच्या भाषेतील फोर्थ सीट करून दिली. मग मी कुठली? लग्न झालंय का? तळेगावची मुलगी पार सातारच्या गावाकडं कशी दिली? असे नेहमीचे प्रश्न झाले. त्यांच्या पायाशी दोन, तीन भल्या मोठ्या पिशव्या होत्या. त्याकडं बोट दाखवून म्हणाल्या पोरं, सुना त्यांची कुटुंबं असतात मुंबईत. त्यांच्यासाठी हा शेतातला वानवळा चालवलाय. भाज्या हायती, कांदं, डाळी, कुरडया, पापड, चटण्या, अनारसं नि गावची भेळ हाय. पोरं दरवेळी सांगतात, मुंबईत सगळं मिळतं आता. पण मीच म्हणते त्याला गावची नि माझ्या मायेची चव थोडी असल? नको म्हणतात ते. पण आम्ही जाणार म्हणलं की ते पण आमच्या पिशवीतून काय काय बाहेर येतंय, याची वाट बघतच असतात. होतंय तोवर द्यायचं. मी नाही नेलं तर माझी नि गावाची माया त्यांच्यापर्यंत पोचंल कशी?
सातारहून आमच्या घरीही अनेकदा असं मायेचं पार्सल येतं. पप्पा जिवाच्या पलिकडे सारा भार उचलून ज्वारी, गहू, डाळी, वाळवणं, मसाले, चटण्या, भडंग असं घेऊन येतात. मुंबईत किती महागडी ज्वारी घे, पण गावच्या ज्वारीची गोडी तुला कुठंच मिळणार नाही, लक्षात ठेव. बिनापॉलिशची चवदार डाळ मिळावी म्हणून किती पैसे मोजता तुम्ही, पण गावच्या शेतातल्या डाळीची सर नाही बघ त्याला. गाव, शेतातले त्यांचे कष्ट, तिथली माती, उगवणं, पेरणं, रुजणं यात ओतप्रोत आपुलकी असते. ती ओझं उचलून आणण्यात आणि त्याचं वर्णन सांगण्यात आपल्यापर्यंत पोहोचतेच. पुढच्या वेळी अजिबात ओझं आणायचं नाही, असं बजावलं की लै शहाणी लागून गेली, असं असतंय थोडीच म्हणत उडवून लावतात नि त्यांचा नेम सुरूच राहतो.
आमच्या घराच्या वरच माझी मैत्रीण शिवाली रहायची. तिचे आई-वडीलही येताना पिशव्या भरून सामान नातीसाठी घेऊन यायचे. शेतातला खाऊ, हरभरा, लोणची, लाडू असं काय काय यायचं नि आमची भाचीबाई पळत येऊन खाऊचं वर्णन करायची. आजी अप्पांची पिशवी म्हणजे तिच्यासाठी सांताबाबाची पोतडीच. नातीनं खाऊ खाऊन आवडल्याची पावती दिली की आजी आजोबांना भरून पावायचं. आजही तिला आजीचं गावचं घर, अंगण, झोपाळा यांचं मुंबईच्या घरापेक्षा अधिक अप्रुप वाटतं.
दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात दुष्काळ पडला. या दुष्काळानं पैसा राखून असलेल्यांचीही दैना केली. तिथे पोटापुरतं कमावून खाणाऱ्यांची काय कथा? गावाकडं सारं कोलमडू पाहतंय, म्हणल्यावर मुंबईत राहणाऱ्या मराठवाड्यातल्या अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. धान्यापासून ते पाण्यापर्यंत नि पैशापासून शिक्षणापर्यंत लागेल ती मदत करण्यासाठी तयारी केली. गाव उभं राहिलंच पाहिजे, या एका भावनेनं प्रत्येकाला जोडलेलं होतं. या संकटातून गाव तरलं नि जो तो पुन्हा आपल्या व्यापात मग्न झाला. पण गावाकडच्या संकटावेळी मुंबईतला जीवही हळहळला होताच.
गेल्या वर्षी पुरानं सांगली, कोल्हापुराला गाठलं. माणूस म्हणून आपल्यातल्या प्रत्येकालाच तिथल्या परिस्थितीची, अडकलेल्या माणसांची, उद्ध्वस्त झालेल्या घरादारांची काळजी होती. वेदना जाणवत होती. मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. कुणी श्रमदान केलं, कुणी धान्य-वस्तू पाठवल्या. कुणी आर्थिक मदत केली. पण त्यापलिकडे शहरांमध्ये राहणारा सांगली, सातारा, कोल्हापूरकर आतून अस्वस्थ होता. आपली माणसं, भाऊबंद, नातीगोती, आपलेपणा जपणारं शहर असं विस्कटताना, झुंजताना पाहून तो अगतिक झाला होता. संधी मिळताच अनेकांनी गावाकडे धाव घेऊन सारं काही पाहण्याचा, अश्रू लपवण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न केलाच. वर्षानुवर्ष शहरात राहिलो तरी आपलं गाव, नि तिथल्या जगण्याशी जोडलेपण असतंच. ते कसं तुटणार?
गेल्या आठवड्यात आणखी एकानिसर्गदणक्यानं कोकण हादरलं. स्वच्छ समुद्रकिनारे, नारळ, माड, सुपारी, पोफळी, आंबे, फणसाच्या बागा आणि सुशेगात जगणारा दिलदार माणूस ही कोकणाची ओळख. एका पिढीनं रुजवलेल्या आंबा, फणस, नारळाची फळे आज पुढच्या पिढीला चाखायला मिळत होती. पण वादळाच्या तडाख्यानं उंचच उंच वाढलेली ही झाडं आडवी झाली आणि इथल्या लोकांचं अपरिमित नुकसान झालं. कौलं, पत्रे उडाले, कुटुंब बेघर झाली. वीज गायब. फोन लागेना. अनेकांच्या जीवाचं पाणी झालं. गावात नेमकं काय झालं असेल, कुटुंब कशी असतील, अशी घालमेल शहरांमध्ये सुरू होती. काही वेळानं सारं उद्ध्वस्त झाल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर होऊ लागले नि अनेकांच्या अस्वस्थतेत भरच पडली. रडू कोसळलं. जी घरं आपल्याला मायेनं अंगाखांद्यावर खेळवतात, ज्या बागा प्रेमानं खाऊ घालतात त्यांचं उद्ध्वस्त होणं जिव्हारी लागलं. लॉकडाउनमुळे पाय पुण्यामुंबईत अडकले नि मन गावच्या घरात सैरभैर होऊन फिरू लागलं. मित्रांशी फोनाफोनी, आप्तेष्टांशी बोलणं करत मदतीसाठी हात सरसावले. पैशापासून ते धान्यापर्यंत नि धीरापासून ते जगण्याची उमेद देण्यापर्यंत साऱ्याची जुळवाजुळव करोना संकटाच्या काळातही शहरांमध्ये होऊ लागली. परवानगीनं शहरातील भरलेल्या गाड्या, असंख्य निरोप गावच्या वाटेवर प्रवास करू लागले. खुशाली नि सावरण्याच्या वार्ता तिकडून येऊ लागल्या. पण उद्ध्वस्ततेच्या कल्पनेनं शहरातील अश्रू वाहतच राहिले. शहरात रहा, परदेशात रहा, गावची माती आणि नाती जशी तुम्हाला कधीच पोरकी करत नाहीत, तसंच शहरातला माणूसही संकटकाळात पहाड होऊन गावासाठी उभा राहतो. गाव उभं राहिलं पाहिजे, नि मातीचा सुगंध शहरांच्या वाटेवर कायम दरवळला पाहिजे ही भावना त्याच्याही मनात असतेच. 
आता पुन्हा गणपती येतील. करोनाच्या संकटातूनही वाट काढत चाकरमानी गावच्या वाटेवर प्रवास करेल. या संकटानंतर त्याचं गाव, तिथलं जगणं कदाचित परिचयाचं नसेल. संकटातून नुकतीच उभारी घेताना अनेक यत्न करावे लागणार, ही जाणीव घेऊनच तो शहरात परतेल नि दिवसरात्र काम करून गावच्या उभारणीत योगदान देईल. त्यामागे भावना आणि जाणीव असेल ती मातीशी जोडलेल्या नाळेची.