शनिवार, ११ जुलै, २०१५

क्षितिजापर्यंत… क्षितिजापल्याड


हिरव्यागार झाडांनी लपेटलेला डोंगर, अस्ताला निघालेला सूर्य, मावळतीच्या या सूर्याचे क्षितिजावर पसरलेले रंग आणि दूरवर डोंगर नि निळ्याशार आभाळाची विस्तीर्ण पसरलेली रेघ… अगदी लहानपणापासून मनात कोरलं गेललं, कागदावर चित्र, कविता, कल्पनाविस्ताराच्या माध्यमातून उतरवलेलं हे निसर्गरूप. डोंगर आणि आभाळाची किंवा निळ्याशार आकाशाची नि निळाईशीच स्पर्धा करणाऱ्या पाण्याची दूरवर होणारी भेट नेहमी कुतुहल वाढवणारीच ठरली. तिथपर्यंत आपण पोहोचायचंच नि हे मिलन याचि देही याचि डोळा पहायचं… असं अगदी लहानपणच्या वेड्या मनातील स्वप्न. पण, निसर्गाचं भरभरून दान मिळालेल्या काश्मीरच्या भूमीमध्ये पाऊल ठेवले नि बालपणीचं खोल मनात असलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात आल्याचा भास झाला. उंचच उंच पहाड, त्यावर आच्छादलेला बर्फ कोणता आणि आकाश कोणते असा संभ्रम निर्माण व्हावा, इतकं एकरूप झालेले आकाश… आपल्या स्वप्नातल्या ‘त्या’ दूरवर विस्तारलेल्या क्षितिजापर्यंत तर आपण आलोच आहोत. पण आता त्याही पलिकडे काही आहे… आणखी एक सुंदर जग खुणावतंय… असा नवा सुखद आभास मनात निर्माण झाला आणि क्षितिजापल्याडच्या या दुनियेमागे नव्याने मन धावू लागलं.

कडाक्याची थंडी, बोचरे वारे, हिमवर्षाव… हे श्रीनगर किंवा काश्मीरचं अगदीच ढोबळ वर्णन म्हणता येईल. पण, काश्मीरचे सौंदर्य वर्णायचं तर त्याबरोबरीने ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि अतिशय सुंदर मन असलेली सुरेख माणसे यांचाही उल्लेख करावा लागेल. रंग, गंध आणि सौंदर्याशी स्पर्धा करणारे फुलांचे ताटवे आणि शांत पाण्याचे तलाव तासनतास काठावर बसून राहण्यासाठी मोहात पाडतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विस्मरणात गेलेला आणि खर तर स्वतःमध्ये डोकावण्यासाठी हवा असलेला निवांतपणा अशा निश्चल पाण्याकाठी आणि सौंदर्याची उधळण करणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात मिळाला, तर यापेक्षा वेगळी पर्वणी ती काय?




काश्मीरमधील निसर्गाचं वैविध्य सतत चकीत करणारं…लोभस आणि खिळवून ठेवणारं! श्रीनगरकडून लेहच्या दिशेने जाताना त्याचा वारंवार प्रत्यय येतो. बर्फाच्या शिडकाव्याने होणारी प्रवासाची सुरुवात आणि त्यानंतर कुठे पांढरी, कुठे काळी-तपकीरी अशा दिसणाऱ्या छटा. पांढऱ्या शुभ्र खळाळत्या पाण्याचे प्रवाह प्रसन्न स्वागत करतात. जसंजसं लेहच्या दिशेने आपण चढू लागतो, तसतशी ऑक्सिजन परीक्षा पाहू लागतो. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या या ऑक्सिजनची नेमकी किंमत आपल्याला ​इथल्या मुक्कामात कळते. सभोवतालचे शुभ्र गालिचे खुणावू लागतात आणि थंडीनं चौफेर आक्रमण केलेलं असतं. या साऱ्याच बदलाशी जुळवून घेत निसर्गाचं रूप डोळ्यात साठवण्यात वेगळीच मजा आहे. इथला बर्फ म्हणजे तरी किती? डोंगरावरून खाली वाहत आलेलं पाणी जागच्या जागी थबकावं आणि गोठून जावं… त्यानंतर दिसणारं दृश्य केवळ विलोभनीय. कुठे खुरट्या हिरव्या झाडांनी मध्येच डोकं वर काढलेलं. रंगाच्या या नैसर्गिक छटा गमतीशीर वाटतात.



फटुला पास, जोजिला पास यासारखे थांबे उंचीच भान देत राहतात. चहूबाजूंनी बर्फानं लगडलेले पहाड संपतात नि अगदी बाजूलाच अक्राळविक्राळ रूप असणारे खडक अंगावर येतात. त्याच रूप ओबडधोबड, काहीसं भीतीदायक. त्यानंतर अगदी खास वलयांकित घडी उमटलेलं गुळगुळीत रूप समोर येतं नि निसर्गाच्या या वैविध्यपूर्ण आविष्काराची मजा वाटते.

वळणावळणाचा हा मार्ग आपण चढू लागतो. त्यानंतर कुठे रस्त्यावर येऊन पडलेले बर्फाचे ढीग वाट अडवतात, तर कुठे हिमवर्षाव थांबवतो, कुठे मोठा खडक रस्ता रोखून धरतो. त्यामुळेच विनासायास ही वाट कापायला मिळणं, ही देखील मोठीच गोष्ट. झंस्कार आणि सिंधू नदीचा संगम म्हणजेही लोभस दृश्य. या दोन नद्या एकमेकींशी एकरूप होताना आपला मूळ रंग, रूप सोडत नाहीत. त्यामुळे संगमानंतरही या दोन्ही नद्यांचे वेगळेपण जाणवत रहातेच. या नदीच्या थंडगार पाण्यात, त्याच्या लाटांवर स्वार होत सफर करणे म्हणे थ्रिलच.

वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृत, खास धाटणीची बौद्ध विहार, बैठ्या ठेवणीची घरे, तिबेटी लोकांचा वावर हा या लेह शहराचा तोंडवळा. या शहरातील मॉनेस्ट्री, शांती स्तूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उभारणीचे. लडाखच्या सफरीत लेहची भेट मध्यवर्ती. इथून पुढे जायचे नि इथे परतायचे हा सफरीचा शिरस्ता. त्यामुळेच नुब्रा व्हॅलीकडे जा किंवा पॅगाँगच्या अद्भुत निसर्गाकडे… फिरून लेहला येणे ठरलेले. त्यामुळेच दोन दिवसांत हे शहर आपले, ओळखीचे वाटू लागते ते अगदी तिथून निघाल्यानंतरही…


Nubra valley

नुब्रा व्हॅलेकडे जाणारा रस्ताही गोठवणाऱ्या थंडीचाच. हा मार्ग म्हणजे लडाख सफारीचा एक अवघड टप्पा. १८ हजार ३८० फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला पासवरून ही वाट जाते. बर्फवृष्टी आणि सभोवताली असलेल्या बर्फाच्या आच्छादनातून निघालेली चिंचोळी वाट, तीव्र वळणांचे रस्ते आणि निसर्गाचं आणखी एक रम्य रूप. कधी लांबच लांब वाहनांची रांग तर कधी दरडींनी अडवलेले रस्ते… असे नाना अडथळे पार करत जेव्हा ही वाट नुब्रा व्हॅलीकडे जाते तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. अगदी आपण राजस्थानात आहोत, असा भास व्हावा असे येथील वाळवंट. सभोवताली वाळूच वाळू आणि उंटाची सफारी. नुब्रा व्हॅलीतील मॉनेस्ट्री आणि तिथपर्यंत जाणारा रस्ता आपल्याला निसर्गाच्या प्रेमात पाडतो.

नुब्रा व्हॅलीप्रमाणेच निसर्गाचं आणखी एक रूप दिसतं ते पॅगाँगमध्ये. पॅगाँगकडे जाणारी वाट जितकी खडतर, तितकाच तेथील निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेला. निळेशार पाणी, त्याच निळ्या रंगाशी स्पर्धा करणारे आकाश आणि स्वच्छ किनारा. आकाशाच्या आणि सूर्यप्रकाशाच्या बदलणाऱ्या छटांनुसार बदलते रंग धारण करणारे पाणी मोहून टाकते. नुब्रा आणि पॅगाँग या दोन्ही दिशांना जायला मिळणार की नाही, हे येथील लहरी निसर्ग ठरवतो. लेहपासून या दोन्ही ठिकाणांना जोडणारा एकमेव पर्याय असल्याने अतिबर्फवृष्टी, दरडी यावर येथील रस्ता खुला आहे की नाही, हे ठरते. पण, निसर्गानं साथ दिली, तर स्वर्गसुख म्हणजे काय, याचे प्रत्यंतर नक्क येते.
Pangong view 1
 
Amazing Pangong
निसर्गाच्या वैविध्याचं, सौंदर्याचं जितकं आपल्याला अप्रुप वाटतं, तेवढंच आपण येथील लष्करासमोरही नतमस्तक होतो. निसर्गाची वेगवेगळी आक्रमणे, प्रतिकूल परिस्थिती यामध्येही टिकून राहण्याच्या त्यांच्या धैर्याला सलाम! लडाखमधील निसर्गाच्या सर्व रूपांशी हे जवान सतत तयार राहून दोन हात करतात. लोकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभे राहतात. येथील प्रत्येक अचणीत, परीक्षेत लष्कर हेच उत्तर. निसर्गाच्या प्रत्येक अडचणीत, लोकांच्या सुरक्षिततेत जवान तत्पर असतात. त्यामुळेच लष्करी जवानांबाबतचा आदर इथल्या भेटीनंतर शतपटीनं वाढतो. द्रासमधील वॉर मेमोरियल तर कारगील युद्धातील थरारक आठवणी जिवंत करते. त्यांचे शौर्य, परिस्थितीशी, शत्रूशी दोन हात करण्याची क्षमता, वेळप्रसंगी जिवाची बाजी लावण्याची तयारी, सगळंच रोमांचकारी आणि त्याबरोबरच हलवून टाकणारं. या मेमोरियलमधून बाहेर पडताना मनात एकाच वेळी वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ होतो. आपल्या जवानांना, त्यांच्या परिश्रमाला मनापासून सॅल्यूट!

लडाखमधील भ्रमंतीमध्ये सर्वात मोठी परीक्षा म्हणजे येथील प्रवास. निसर्गाच्या रौद्ररूपामुळे अजूनही अनेक भागांमध्ये रस्ते पोहोचलेले नाहीत. अनेक वाटा धोक्याच्या. अनेक ठिकाणी पोहोचणेही कठीण. अशा स्थितीत येथे रस्ते उभारणीचे कठीण काम बीआरओ आणि हिमांककडून केले जात आहे. रस्ते उभारणीचे आव्हान पेलताना लोकांना पावलोपावली जीवाचे मोल समजावून सांगणारे बोर्ड लावत सावध प्रवासाचा सल्ला देतात. या रस्त्यांवर वैद्यकीय सुविधा मात्र दुर्लभ. लष्कराच्या पोस्ट वगळता कितीतरी दूरपर्यंत फर्स्टएडही उपलब्ध नाही. त्यातच दरड कोसळली, हिमवर्षावाने वाट अडवली तर पेशंटच्या जिवावर बेतण्याचीच भीती अधिक. त्यामुळेच येथील प्रवास वैद्यकीय सोयींसह करणेच हिताचे ठरते.

प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होत असताना लडाखमधील लोकांसाठी रोजगाराच्या संधी मात्र अजूनही मर्यादितच आहेत. शेती, पारंपरिक पश्मिना शाली, कलाकुसर आणि पर्यटन एवढेच पर्याय येथे उपलब्ध दिसतात. त्यातही पर्यटन व्यवसाय चारच महिन्यांपुरता असल्याने तरुणांना आजही वेगळ्या वाटा आजमावण्याची संधीच नसल्याचे ​चित्र आहे.

काश्मिरी लोक आणि तिबेटी संस्कृतीचा प्रभाव असलेली लडाखमधील मंडळी यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये बरंच अंतर. दोन्ही माणसांच्या स्वभावामध्ये गोडवा असला, तरी त्यातील अंतर लख्ख जाणवंतच. लेहमधील निसर्ग, त्याचे वैविध्य यामध्येच एक अगत्यशीलता आहे. साहजिकच आठ महिने निसर्गाची परीक्षा दिल्यानंतर येणाऱ्या आल्हाददायी वातावरणात आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या येथील आर्थिक गणितांमुळे काश्मिरी लोकांच्या तुलनेत येथील मंडळींमध्ये अधिक मृदुता आहे. त्यांची अगत्यशीलता कृतीतून ओतप्रोत जाणवते. आपल्याला सुखावतेही.

सतत सुरक्षित, कम्फर्ट लेव्हल बघून, जीवाला अगदी जपून शहराच्या सुखसोयींमध्ये जगणारे आपण निसर्गाच्या कठोर-सुंदर रूपाचा अनुभव घेण्यास कचरतो, घाबरतो. ही परीक्षा निश्चित थोडी कठीण, पण तेवढीच आनंद देणारी, ओतप्रोत समाधान देणारी आणि खूप काही मनात साठवता येणारी असते. जून महिन्यामध्ये माझ्या पाच मैत्रिणींसह केलेली ही सफर त्यामुळेच वेगळी ठरली. पावलोपावली निसर्ग, हवामान परीक्षा पाहत असतानाही येथील सौंदर्य आम्हाला आणखी पुढे जाण्यास उद्युक्त करत राहिले. थंऽऽऽडी म्हणजे नेमके काय, हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले. बर्फ अंगावर झेलत उभे राहताना थंडीत विनातक्रार सज्ज राहणारे जवान दिसले नि स्वतःच्या चोचल्यांचा रागच येऊ लागला. आयुष्यात खूप काही देणारा, समृद्ध करणारा हा अनुभव. असंख्य पॅकेजची चाचपणी, एअरफेअरच्या गप्पा, आर्थिक गणिते, दोन महिने पुरून उरलेली चर्चा आणि त्यानंतर झालेली ही सफर. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, त्या काश्मीरचे देखणे, लोभस, थक्क करणारे आविष्कार याचि देही याचि डोळा पाहिले आणि मन समाधानाने काठोकाठ भरले.

निघताना येथील मंडळींना, लेहला आणि निसर्गाला मनापासून ‘झुले’ (नमस्कार) केला!!!






५ टिप्पण्या: