गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

मायेचा ‘सुगंध


आजच सकाळी दादाने आईचा फोटो पाठवला. दिवाळी जवळ आल्यामुळे आईची खास सुगंधी कामाची सुरुवात झाली आहे. अत्यंत निगुतीने आणि तिच्या खास प्रमाणामध्ये तयार होणाऱ्या उटण्याचा सुगंध घरभर दरवळू लागला आहे. महिनाभर घरच्या सणावाराबरोबरच आईची ही लगबग सुरू होते. उटण्यासाठी लागणारे खास जिन्नस, निवडणं, वाळवणं, दळणं असे सारे सोपस्कार पार पाडून जेव्हा हे मऊसूत आणि सुगंधी उटणे हाती पडते, तेव्हा स्वर्गसुख असते ते. उटणे म्हणा, फेसपॅक म्हणा नाही तर बॉडीवॉश… सुगंधाची नि मायेच्या स्पर्शाची हमी तर असतेच…

आईचा आज फोटो पाहिला आणि थोडंस बालपणात रमले. शॅम्पूच्या बाटल्यांनी घरातील जागा अडवण्यापूर्वी न्हाणं हा सोहळा असायचा घरात. शिकेकाई, रिठा, आवळा आणि बरंच काही वाळवून दळलेली शिकेकाई गरम पाण्यात उकळून आई केसावर छान चोळून द्यायची. डोळ्याशी घट्ट फडकं धरलेलं असायचं. तरीही छोटेस कण डोळ्यात जायचे नि मी थैमान घालायचे. मग कोमट पाण्याने अंघोळ आणि कोवळ्या उन्हात केस वाळवणे असा कार्यक्रम असायचा. त्याबरोबरच आणखी एक जिन्नस आवर्जून दाखल व्हायचा. ते म्हणजे उटणे. ऑक्टोबर हीट संपली की तळेगावांत आधी सुखद आणि नंतर कडाक्याच्या थंडीचे आगमन व्हायचे. या काळात साबणाने अंग जास्त फुटते, असं म्हणत आणि तो हद्दपारच करायची. साय घालून कालवलेले उटणे आणि त्यानंतर डाळीचे पीठ लावून अंघोळ व्हायची. दिवाळीच्या दिवसांत तर उटणे हा सोहळा असायचा. चार महिने साबणाची जागा सुगंधी उटणे घ्यायचे. त्याने अंघोळ केली की पुढचा काळी काळ तो सुगंध टिकून रहायचाच 

आईच्या घरगुती स्वरूपातील या उटण्याला दादाने व्यावसायिक स्वरूप दिले. नि थोड्याश्या स्वरूपात करण्याची तयारी आता अधिक बारकाईने मोठ्या स्वरूपात होऊ लागली. स्वत: नि नातेवाईकांसाठी किलोभर होणारे उटणे आता १०० ते १५० किलोपर्यंत होऊ लागले आणि तरी या सगळ्याची जबाबदारी तिने घेतली. आज जवळपास २० वर्षे आई दिवाळीच्या आधी उटणे तयार करते. या उटण्याचे स्वरूप मोठे झाले तरी तिची रित बदलली नाही की दर्जात तडजोड नाही. उन्हाळ्याच्या वाळवणाबरोबरच उटण्याचे जिन्नस आणून दगड, माती काढून स्वच्छ निवडत कडकडीत उन्हात वाळण्यासाठी पडू लागले. गणपती झाले की तिच्या खास प्रमाणात हे जिन्नस एकत्र यायचे नि पुण्यात राजमाचीकरांकडे रवाना व्हायचे. तिथून खास उटण्याच्या गिरणीवर बारीक दळून उटणे घरी येऊ लागले. उटणे हाती आले की बंद पिशवीत ठेवून थोडे थोडेच बाहेर काढायचे. उटण्याचा मोठा ढिग करून बसायचे नाही. त्यानंतर वजनकाट्यावर सारखे वजन करत पाकिटात भरून रवाना करायचे. ही सगळी प्रक्रिया नोकरी करतानाही ती एकहाती सांभाळत होती. उटणे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तिला अजिबात लुडबूड चालत नसे. आता तर निवृत्त झाल्यापासून तिने सुखनैव हे काम हाती घेतले.    

व्यावसायिक उटण्याची सुरुवातही छोटेखानी होती सुरुवातीला १५ ते २० किलो उटणे करून ते दादाच्या हाती पडे. पण या काळातही पाकिटांपेक्षा वजनावर मोठ्या प्रमाणात उटणे घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठीच होती. दिवाळीच नाही, पण त्यानंतरही आम्हाला ते हवेच, असा हक्काचा आग्रह आईकडे केला जाई. माझ्यासाठी पाव किलो, अर्धा किलो तरी ठेवाच, असे आधीच नोंदवले जायचे. एका काकूंसाठी तर आईला पूर्णपणे नव्याने उटणे तयार करावे लागले. पण तरी दर्जात तडजोड केली नाही. तान्ह्या बाळांसाठी तिने उटणे वस्रगाळ करून दिले. पण प्रत्येकाचे समाधान महत्त्वाचे मानले. दरवर्षी वर्षभरासाठी उटणे दिवाळीच्या सुमारासच घेऊन ठेवणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले नि छोटेखोनी स्वरूप मोठे झाले. आज दादा, वहिनी, बाबा सगळे दिवाळीआधी या उटण्याच्या कामात आणि तिच्या दिमतीला सज्ज असतात. माझ्यावरच्या विश्वासाने आणि अनुभवाने लोक उटण्याची मागणी नोंदवतात. हा विश्वास नि ते तयार करण्यामागची माया यात कुठे कसूर होऊ नये गं, त्यामुळे मी स्वत:च करते हे.. असं अगदी काल ती सांगत होती.. नि मी माझ्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाच्या ‘सुगंधी’ आठवणीत रमले होते.