सोमवार, ३१ जुलै, २०२३

अठ्ठावीस युगांचं एकटेपण!

 (ही कोणत्याही कलाकृतींची समीक्षा नाही. कलाकृतीतील तुलनाही नाही.  बाईपण, तिच जगणं आणि भावनांचा कल्लोळ यावर जोडलेले समान धागे एवढ्यापुरतीच ही मांडणी आहे.)

यामिनी सप्रे

तुकोबारायांनी गाथेतून, अभंगातून जगण्याचं सार सांगितलं. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दिला. जगण्याचं कोडं उलगडलं. पण प्रत्यक्ष तुकोबारायांचं मन कधीही संसारात रमले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीचे भाव काय असतील? संसाराच्या तिच्या कल्पनांचं काय झालं? विश्वाला चिंतेतून वाट दाखवणाऱ्या तुकोबारायांच्या आवलीची चिंता काय असेल? संवाद, जगण्याचा आनंद आणि सुखदु:खातील साथीची साधी अपेक्षाही पूर्ण होत नसताना तिचं काळीज किती तुटलं असेल? नकारात्मक परिस्थितीत पाय घट्ट रोवून संसाराला ठिगळं लावताना तिच्या वाट्याला किती एकटेपण, एकाकीपण आलं असेल?

विठ्ठलावर रखुमाई रुसल्याच्या कहाण्या सगळीकडे सांगितल्या जातात. पण, रुसलेल्या रखुमाईच्या मनीचे भाव ना कोणी जाणले, ना कुणी विचारात घेतले. आपला विठ्ठल आपल्याशेजारी उभाच असेल, या भावनेने अठ्ठावीस युगे विटेवर उभ्या असलेल्या रखुमाईच्या वाट्याचं जगणं नि त्याबाबत तिचा कल्लोळ, तरीही विठ्ठलाशी असलेले जोडलेपण कसे असेल? त्याच्यासोबत वाट्याला येईल तसंच जगणं तिनं का स्वीकारलं असेल? आवलीला स्वतंत्र, स्वच्छंद जगायला हवं सांगताना तिला स्वत:ला मुक्त जगावं वाटलं नसेल?

जिंकावा संसार। येणें नांवें तरी शूर॥

येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं॥

पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें॥

तुका म्हणे ज्यावें । सत्कीर्तीनें बरवें॥

जो संसाराला जिंकतो, तोच खरा शूर असतो, बाकीचे सारे मूर्ख असे अभंगातून सांगत जनप्रबोधन करणाऱ्या तुकोबारायांच्या आवलीच्या संसारस्वप्नाचं काय झालं?

‘देवबाभळी’तील रखुमाई आणि आवलीच्या मनीचं हितगुज काळाच्या कसोटीपल्याड जाऊन आजही पोखरत असेल, तर परिस्थितीत फारसा बदल झाला नाही का? आपण जग फिरून आल्यावरही आपलं घर, संसार आणि वाट बघणारी ती असणारच हा विश्वास असतो, तोपर्यंत सन्मान असतो. पण विश्वासापल्याड गृहित धरण्याकडे हे सरकतं, तेव्हा तिच्या भावनांचं काय होतं?



तू शेवटचं पावसात कधी भिजलीस? परसातील फुलांचा छाती भरून सुगंध कधी घेतलास? मनात दाबून ठेवलेल्या भावना दूर सारत शेवटचं मनसोक्त कधी जगलीस? कधी तरी करपू दे भाकरी, कधी तरी कढ ऊतू जाऊ दे, कधी तरी भोवताल विसरून जग… सगळं ओझं उराशी धरण्याचं बळ कायम एकवटण्याची गरज नाही.. कधीतरी तू तुझी हो, हा अर्थगर्भ सल्ला जेव्हा रखुमाई आवलीला देते तेव्हा तो जणू मलाच दिलाय, असा भाव प्रत्येकीच्या मनात तयार होतो. स्त्री-पुरुष समानतेच्या आणि पुढारलेपणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी वास्तवातील चित्र आजही फारसं वेगळं नसल्याचं जाणवतं. ‘मी आहे म्हणून टिकलेय’ या वाक्यावर समस्त महिलांचा एकसूर उमटतो नि आपल्याही आयुष्यात असा बदल व्हावा, सारं भान विसरून आवाज मोकळा व्हावा, ही इच्छा दृढ झाल्याचं जाणवतं.

पाऊस येवो न येवो, आपल्यावाटचं नांगरावच लागतं असं म्हणणारी आवली आणि आपलं आभाळ आपणच बांधायचं आणि आपला पाऊस आपणच व्हायचं, हे सांगणारी रखुमाई या आजच्या काळातील घराघरात वावरणाऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात. पण त्याचबरोबर बाई तुझ्या आयुष्यातील आनंदासाठी सतत अवलंबून राहू नको. तुझी तू जग, तुझा आनंद तू शोध, हेही त्या सहज मांडून जातात.  



दोन आठवड्यांपूर्वी ‘बाईपण भारी देवा’ पाहिला. त्यापाठोपाठ ‘देवबाभळी’. बायकांच्या मनातील गूढ विश्वावर आणि संसाराचा गाडा ओढण्याच्या ओझ्याबद्दल भाष्य करणाऱ्या या दोन्ही कलाकृती. आपल्या आयुष्यातील बाई ही साथीदार आहे, सोबती आहे. त्याचवेळी, तिचं आयुष्य तिच्या पद्धतीनं जगण्याचा आणि आयुष्याचा मनमुराद आनंद घेण्याचा तिला अधिकार आहे, हे आज २१व्या शतकात सांगावं लागतंय. तिच्यावर कुणाची मालकी नाही, तिच्या एकटीवर कुटुंब, संसार चालवण्याचा भार नाही, हे दाखवून द्यावं लागतं. समाजानं लादलेलं बाईपणाचं ओझं काळाच्या कसोटीवर टिकणारं नसतानाही बायका पेलत राहिल्या आणि आपल्याखेरीज घर आणि कुटुंब चालणार नाही, या भावतून कधी जबाबदारीचं, कधी अपराधीपणाचं तर कधी आपल्यावाचून अडले नाही तर काय, या भावनेचं ओझं अंगावर घेत राहिल्या. पण त्यातून वाट्याला येणारी घुसमट दुर्लक्षितच राहिली. ‘बाईपण…’च्या निमित्तानं सिनेमागृहात बायकांची मोठी गर्दी झाली. पण खरं तर प्रत्येक पुरुषानंही हा सिनेमा बघायला हवा, अशी गरज अधिक दिसते. या सिनेमातील मुलगी, सून आणि त्यांच्या स्वतंत्र आयुष्यासाठी धडपडणारी मंडळी हे वैश्विक रूप असायला हवं. पण प्रत्यक्षात कुठल्यातरी रूपातील घुसमट मोठ्या संख्येनं बायका स्वत:शी जोडत आहेत, हे समाज म्हणून अधिक चिंतेचं दिसतं. तिची स्वप्त, तिच्या आकांक्षा, तिचं आयुष्य अधिक व्यापक करायचं तर ते सगळ्यांना मिळून करावं लागेल. त्याची सुरुवात माझ्यावाचून सगळं अडतं या भावनेच्या गुंत्यातून बाहेर पडण्यापासून करावी लागेल. सभोवताली आपल्याला गृहित धरले जाऊ नये आणि आत्मसन्मानाशी तडजोड नाही, हा धडा आधी तिलाच गिरवावा लागेल.

जोडीदारांचं एकत्र असणं आणि सोबत असणं यातील भावनिक अंतर या कलाकृती मांडतात. कधी परतावसं वाटलं तर, घर जागच्या जागी असायला हवं, पुन्हा सांधताना हात हातात असायला हवेत, या अट्टहासातून सारं हृदयाशी धरताना आणि हातून काही निसटू नये हा प्रयत्न करताना स्वत:साठी जगायचं राहून जातंय. आपल्या आवडीचं काही करणं, त्यासाठी वेळ देणं राहून जातंय. नाट्यगृहातील, सिनेमागृहातील बाई आज याच विचारानं अंतर्मुख होऊन बाहेर जाते, तेव्हा माझ्या जखमेवर फुंकर घालायला माझा ‘विठ्ठल’ सोबत हवा, त्याने पाठवलेली कुणी रखुमाई नाही.. ही भावना कितीतरी मोठी झालेली असते.

इझू दे रे देवा अंतरीची पिडा… ही आर्त साद तिने देवाइतकीच स्वत:ला आणि समाजाला घातलेली असते.