शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

माझ्यातली तू

चित्रपटातील एखाद्या पात्राला पत्र लिहिण्याचा विचार केला नि समोर आली थप्पडमधील अमृता. तापसी पन्नूच्या सशक्त अभिनयानं अमृता मनात झिरपते. तिच्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न.



प्रिय अमृता,

तुला सखी म्हणू, माझ्यासमोर आरसा धरणारी मार्गदर्शक म्हणू की अस्तित्वाची नव्यानं ओळख करून देणारा माझाच एक भाग समजू? तू कुणीही असलीस तरी एक खरं म्हणजे तू माझी माझ्याशीच नव्यानं ओळख करून दिलीस. माझ्या अस्तित्वाची आणि स्वत्वाची नव्यानं भेट घडवून दिलीस. माझ्यासारख्याच अनेकींच्या मनात तुझी भेट झाल्यानंतर कदाचित हीच भावना असेल. तुझ्या थप्पडेने अशाच माझ्यातल्या आणि माझ्यासारख्याच अनेकींच्या सुप्त मनातील तुलाधडका देण्याचं काम केलं. त्याचबरोबर समाजाच्या वर्षानुवर्षांच्या धारणांना विरोध करण्याचं बळही दिलं.

बालपणाचे उबदार घरट्यातले दिवस, सुरवंटाचे फुलपाखरू करणारा कॉलेजचा काळ नि त्यानंतर रूढार्थाने आयुष्याला स्थैर्य देणारा, सारं काही बदलून टाकणारा जोडीदाराच्या साथीनं सुरू झालेला नवा प्रवास. प्रत्येकीच्या आयुष्यात कमी अधिक फरकाने होणारी ही स्थित्यंतरं. यातील प्रत्येक काळ म्हणजे उबदार वस्राची वीण असते. पण अचानक एक टाका चुकतो, उसवतो नि सारं काही धडाधड विरू लागतं. एकदा या उबदार वस्राची वीण उसवली की ती सांधण्याचे प्रयत्न हे अनेकदा तात्पुरत्या मलमपट्टीसारखे ठरतात. आज आपल्यापैकीच कितीतरी जणी असं हे ठिगळं लावून सांधण्याचा, जोडण्याचा प्रयत्न केलेलं आयुष्य जगत असतील. का?  समाज काय म्हणेल? आप्तेष्ट काय म्हणतील? पुढचं आयुष्य कुणाच्या आधाराने काढणार? असे अनेक विचार त्यामागे असतातच. असुरक्षिततेच्या भावनेनं घर केलेलं असतं. कारणं काहीही असोत,पण अशा परिस्थितीत वाट्याला येतं ते तडजोडीचं आयुष्य आणि ती किती, कोणी करायची हा ज्याचा त्याचा निर्णय. याचा अर्थ आपलं जगणं, आयुष्य आपण दुसऱ्याच्या हाती सोपवून चालत राहायचं? आत्मसन्मानाला लागलेल्या ठेचेमुळे ठसठसणारी वेदना सहन करत राहायची की जखमा देणारी नाती, माणसं, जगणं भिरकवायचं? तडजोड करायची तर काय आणि किती? सारं काही बदलून टाकत नव्यानं निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला आहे, याची जाणीव तरी मनाच्या तळाशी असते? आपण स्वत:वर कळत नकळत करत असलेल्या अन्यायाची बोच आपल्याला जाणवते? इतके सगळे प्रश्न स्वत:ला नव्यानं विचारावेसे वाटले. तुझ्याचमुळे!

लग्नानंतर जोडीदाच्या साथीनं, घरच्यांच्या मर्जीनं पुढचं आयुष्य जगायचं, हे आज २१व्या शतकातही सर्वमान्य असलेलं समीकरण. माझ्या स्वप्नांच्या जगात,आनंदाच्या सप्तरंगांत डुंबण्याचा मला अधिकार आहे, याचा विसर पडून कुणाच्यातरी जगण्याच्या निळाईलाही आपण आपलं मानतो. इतकं की ती आपलीच आवड असावी. स्वत:ला विसरून एखाद्याला आपलं मानणं, त्याच्या स्वप्नांशी एकरूप होणं ही निवड असते. पण त्याचवेळी माझ्या वाट्यालाही असंच उदंड आपलेपण यावं, स्वीकारार्हता यावी इतकी स्वाभाविक अपेक्षा असते. पण अनेकांच्या बाबतीत ती देखील पूर्ण होताना दिसत नाही. असं असणं चूक की बरोबर हे सरसकट ठरवणं कठीणचं. कारण आयुष्य-जगण्याच्या कल्पना या व्यक्तीसापेक्ष असतात. पण तडजोड किती नि कुठवर करायची याचे निर्णय स्वातंत्र्य असायला हवं, तरंच सर्वार्थानं जगलो म्हणण्याचा हक्क आपल्याला आहे. पण अनेकदा असं आयुष्य आपण जगावं, नव्हे जगलंच पाहिजे हा भावच बऱ्याच जणांच्या मनाला शिवत नाही. अशांना स्वत:चं अस्तित्व जपण्याच्या रस्त्यावर प्रयत्नपूर्वक चालावं लागेल, हे तू शिकवलंस आणि सोबतच त्यासाठीचं धैर्यही दिलंस.

आज लॉकडाउनमुळे प्रत्येक माणूस घरात आहे. कुणाच्या जगण्याचा आधार हिरावलाय, आर्थिक चणचण मोठी होतेय, नैराश्य वाढतंय, भावनांची गुंतागुंत वाढतेय. या सगळ्याचा परिपाक म्हणजे घरगुती छळाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होतेय. यातील बहुदा सर्वच घटना या महिला, मुलींच्या छळाच्या आहेत. या घटना ठराविक वर्ग, जात, धर्म यापुरत्या मर्यादित नाहीत. काचेच्या मनोऱ्यात राहणाऱ्या उच्चभ्रूंपासून हातातोंडाची लढाई असणाऱ्या घरापर्यंत कुठेही हे चित्र दिसलं नि जखमा भळभळू लागल्या. या अशा आत खोलवर त्रास देणाऱ्या घटनांच्या काळात तू लगावलेल्या थप्पडेचा आवाज अधिक जोरकसपणे घुमतो आहे. माझ्या, तुझ्या आणि आपल्यासारख्याच अनेकींच्या कानात तो अनेक काळ वाजत राहील. पण नुसताच आवाज घुमत राहणार की त्याचा अर्थ समजून घेत कृतीत उतरणार, हा मोलाचा प्रश्न तू प्रत्येकीला विचारला आहेस. खरं तर आरसा धरलाय, असंच म्हणूया. वर्षानुवर्षाच्या मनातून न पटलेल्या पण समाजानं मनावर बिंबवलेल्या एखाद्या धारणेला, रुढीला धडका देणं सोपं नसतं. आधी स्वत:चा स्वत:शी असलेला झगडा, विचारांवर ठाम होण्याची प्रक्रिया नि त्यानंतर समाजाच्या पारंपरिक विचारांना विरोध करण्यासाठी लागणारं धैर्य, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मानासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी असा खडतर प्रवास असतो.पण त्यातून खरेपणाच्या कसोटीवर आपण लखलखीतपणे उतरतो. घर ज्यादा जरूरी है’, ‘लोग क्या कहेंगे’, ‘सहना पडता है’, ‘एकही तो थप्पड मारा’, ‘शादी में सबकुछ चलता है’, अशाच अनेक विचारांना प्रत्येकीनं धडक द्यायला हवी. घरातल्या मुलीवर, सुनेवर, बायकोवर थप्पड मारण्यासाठी उचललेला हात,चढवलेला आवाज हा तिचं अस्तित्व मातीमोल ठरणारा असतो,हा विचार स्वत:ला सूज्ञ म्हणवणाऱ्या समाजात, माणसांत नव्यानं पेरण्याची गरज आहे, ही जाणीव तू दिलीस. एकच तर थप्पड मारली, असं म्हणत इट्स ओकेम्हणणाऱ्या प्रत्येकाला हे कळायला हवं की त्या एका कृतीतून तिचं आजवरचं जगणं क्षणात शून्यावर आलं आहे. स्वत:चं अस्तित्व विसरून कोणाच्या तरी आयुष्याचा भाग होत विरघळून जात असतानाच अचानक अशी लाट आली की तिचंही आयुष्य आतून ढवळून निघतं. मनात साठलेला विचारांचा गाळ किनाऱ्यावर येतो आणि आजवर कृत्रिमपणे उसळत, निवत असलेलं पाणी प्रवाहाविरोधात जाण्याचा विचार करू लागतं, तेव्हा प्रलय अटळ असतो,ही जाणीव आपण स्वत:ला आणि समाजाला सतत करून द्यायला हवी, या विचाराची तू नव्यानं रुजवात केलीस. जाणीवपूर्वक!

माझ्या आयुष्यावर सर्वाधिक हक्क माझा आहे. माझ्या स्वत्वाला पायदळी तुडवण्याचा, आत्मसन्मानाला नख लावण्याचा, शारीरिक-मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हा आवाज आजही कर्कश वाटणारच. कारण तथाकथित समाजव्यवस्थेच्या धारणांविरोधात तो आहे. पण तो तुझ्या-माझ्यातील खरेपणाचा चेहरा आहे आणि त्याला उजळ माथ्यानं वावरायचं असेल, तर लढाई आणि किंमत चुकवणं अटळ आहे, हे तू नव्यानं सांगितलंस.जन्माला आल्यापासून अनेक नाती आपल्या जगण्याचा, घडण्याचा, समृद्ध करण्याचा भाग असतात. त्यांचं असणं आपल्याला बळ देत असतं.पण म्हणून कुणी कुणाच्या आयुष्याचे मालक होऊ शकत नाही. प्रत्येक नात्याच्या चौकटीपल्याड एकमेकांकडे माणूस म्हणून बघता येणं ही त्या नात्याची प्रगल्भावस्था म्हणता येईल. पण अशा किती नात्यांत परस्परांकडे कोणताही चष्मा न घालता, हक्क न गाजवता आपण बघतो? नैराश्यात, आनंदात, वेदनेत, संतापात तोल जातो,तेव्हा स्वत:तील माणूस तरी शाबूत ठेवता येतो का? येत नसेल तर तशीच कृती इतरांकडून घडल्यास ते आपल्याला स्वीकारार्ह असतं का? नात्यांत समोरच्याला घालून दिलेल्या मर्यादा, अधिकार आपण स्वत:साठी काटेकोर ठेवतो का, अशा अनेक प्रश्नांचं वादळ आज तू निर्माण केलंय. त्यापासून पळ काढत सुरक्षित आसरा शोधण्यापेक्षा त्याला सामोरं जाऊन, थोडा विद्ध्वंस सहन करून नव्यानं उभं राहण्याची तयारी अधिक महत्त्वाची आहे, ही जाणीव तू दिलीस. त्याचबरोबर कुठे थांबायचं हे उमगणं आणि तसं थांबता येणं महत्त्वाचं असतं, हा विचारही पेरलास. बाकी कशापेक्षाही माझ्यातल्या स्वत्वासाठी तो किती मोलाचा आहे, हे तुलाही कदाचित सांगून कळणार नाही.

थँक्यू. खरं तर सगळ्याचसाठी. पण त्यातही माझ्यातल्या तुझ्याशी नव्यानं ओळख करून दिल्याबद्दल आणि इट्स नॉट ओकेया विचाराची उजळणी करून घेतल्याबद्दल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा