बुधवार, २० मे, २०२०

कोलाहलात साऱ्या माणूस शोधते मी


प्रिय,
एकच कुणी नाही, तर खूप खूप जण नावं तरी कुणाकुणाची घेणार? यादी इतकी लांबलचक होर्इल की मांडायचा मायना मनातच राहून जाईल. त्यामुळे कुणा एकाचा उल्लेख करण्याच्या चौकटीपल्याड जाऊन आयुष्यात, मनात, कामात, जगण्यात असलेले सगळेच म्हणू या

पत्रास कारण की,

सध्या आपण लॉकडाउनमध्ये आहोत नि पत्रलेखन हा कालबाह्य झालेला प्रकार अचानक पुन्हा जवळचा वाटू लागलाय. हरवलेलं काही शोधता, मांडता येईल का, भावनांना वाट मिळेल का या प्रयत्नांनी पत्राला पुन्हा जवळ आणलंय. हे पत्र लाल रंगाच्या पोस्टाच्या पेटीत जाऊन पडणार नाही, हे माहितीच आहे. पिवळ्या कार्डावर किंवा निळ्या आंतरदेशीय पत्रावरही कोरलेलं नाही. पण तरी ज्यांच्यापर्यंत ते पोहोचावं असं वाटतंय, त्यांना ते मिळेल, अशी हमी मनातून मिळतेय. शाळेत असताना १० गुणांसाठी पत्रलेखनाचा विषय असायचा. त्यातही व्यावहारिक आणि घरगुती असे काही प्रकार असायचे. एकतर चौकोनी मायना असणारे, नाहीतर भावनेच्या पार तळाशी जाऊन १०च्या १० गुण वसूल करण्याच्या हेतूनं डोळ्यात पाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणारं. आजचं हे पत्र दोन्हीच्या मधलं. कुणाच्या तरी असण्याची कदर करणारं नि काहीतरी तूर्त निसटलंय याची खंत मांडणारं.
शाळा सुटली नि तंत्रज्ञानाच्या जगात पत्राशी संबंधही संपला. पण काही काळानंतर मला पत्र आणि त्यातून साधता येणारा संवाद हा प्रकार खूप आवडू लागला. मनातलं अगदी खोल असं काही आपण त्यातून मांडू शकतो, असं वाटत आलं. त्यामुळेच आई, बाबा, नवरा, जवळची मैत्रीण अशा अनेकांना मी आवर्जून पत्र लिहित आले. जगातील सर्वात उंचीवर असलेलं पोस्ट ऑफिस म्हणून ओळख असलेल्या स्पिती व्हॅलीतील हिक्कीमहूनही मी अशीच छानशी पत्र पाठवली होती. कधी नव्हे ते मी ही पत्र पोहोचण्याची वाट बघत होते. ज्यांना पाठवली, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकताही लागलेली. मी ट्रिपहून परत येऊन इतिवृत्त सांगून झाल्यानंतर ही पत्र पोहोचली. पण इतक्या उंचावर जाऊनही त्या क्षणी तिला आपली आठवण आली, ही ज्यांना पत्र मिळाली, त्यांची भावना सुखावणारी होती. त्यातल्या मायन्यापेक्षाही इतक्या लांब असतानाही आलेली आठवण ही भावना कितीतरी वरचढ होती. अशा बारीकशा गोष्टीतूनच तर आपापसातला कनेक्ट वाढत राहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अनेक माणसं असतं ज्यांच्याशी रोज बोललं नाही, १५ दिवस बोललं नाही तरी जेव्हा संवाद होतो, तेव्हा तो कालच्या पुढे सुरू होतो. काहीही बदललेलं नसतं. पण १५ दिवसांनी, महिन्यानी आपली भेट होणार नि अखंड माणूस आपल्याला स्पर्शाच्या अंतरावर दिसणार, ही मनोमन खात्री असते. ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’, हे शाळेत कुठल्याशा इयत्तेत घोकलेलं वाक्य हे पत्र लिहिताना मनात घोळतंय. अनेकांशी ‘झूम’वरून, व्हिडीओ कॉल, स्काइप कॉल, अखंड फोनवरून बोलणं होतंय, व्हॉट्सअॅप चॅटला तर अंत नाहीये. घरात निवांत लोळत पडण्याची चैन करता येतेय. प्राइम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार दिमतीला उत्तम कंटेट घेऊन आहेत. वाचायला पुस्तकं आहेत. पण तरी आपलं असं काही हरवंतय, अंतरावर राहतंय असा भाव मनात खोल आहेच. गॅझेट आणि त्यातील कंटेट, व्हर्च्युअल संवादाचा सभोवताली कोलाहल असला तरी माणूस शोधावा लागतोय आज, अशी भावना आहेच. एरवी घरातून खाली उतरलं की वॉचमन, दुकानदार, रिक्षावाले, बसचालक, कंडक्टर, भाजीवाल्या, लोकलमधला नेहमीचा ग्रुप किंवा एकमेकींशी कुठलाच कनेक्ट नसलेल्या सहप्रवासी, आपल्याच वेगाने धावणारे प्लॅटफॉर्मवरचे लोक नि इच्छितस्थळी पोहोचल्यावर भेटणारी आपली माणसं. ही सगळी मंडळी आपल्या जगण्याचा भाग झालेली असतात. घरी राहणाऱ्या दोन-चार माणसांपलिकडे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी, व्यावसायिक हितचिंतक, तज्ज्ञ अशी अनेक मंडळी आपल्या विस्तारित कुटुंबाच्या भाग असतात. अनेकांना कॉल केल्यावर एकदा भेटू या ग आता, असं म्हटलेलं असतं. पण तो एकदा जुळलेला नसतो. आई सतत फोनवर म्हणत असते, एक चक्कर मार गं. त्यावर पुढच्या आठवड्यात नक्की अशी आश्वासनं दिलेली असतात. पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या आठवड्यात नक्की जमवून भेट घेतलेली असते. तिथे पोहोचल्यावर अरे वा कधी आलीस असं अनेकांनी येता-जाता विचारलेलं असतं. सासूबाई काय काय तयार करून ठेवलंय, याची यादी सांगत असतात. भाची-पुतणीची मागण्यांची लांबलचक यादी असते. पण एकमेकांशी बांधून ठेवणाराच तर धागा असतो ना तो. जेव्हा भेटतो तेव्हा भावनांपासून वस्तूंपर्यंत सगळ्याची देवघेव होते. आज यातल्या कुणालाच भेटीच आश्वासनही देता येत नाहीये. एरवी घड्याळाच्या काट्यावर आयुष्य पळत असतं. नि अनेकदा इच्छा असून वेळ नसतो. आज हाताशी मुबलक वेळ आहे, पण तो आपल्या म्हणता येईल, अशा अनेकांना देताच येत नाहीये. हे कसलं अंतर म्हणावं? ऑफिसात पोहोचल्या पोहोचल्या आधी माझं ऐक असं म्हणत मैत्रिणींना, मित्रांना आपलं असं सक्तीनं काही ऐकायला लावता येत नाहीये, नि त्यांचे भावही टिपता येत नाहीत. तासनतास फोन सुरू आहेत, पण समोर उभं राहून अक्कल काढण्याची मजा त्यात नाहीये. कामाच्या डेडलाइनच्या वेळीच कम्प्युटरने असहकार केला, तर झालेल्या संतापात मार्ग काढायला इतर कुणी नाहीये. लॅपटॉपवर राग काढला तर उद्याचा दिवस कठीण होईल, ही जाणीवही स्वत:ची स्वत:लाच करून द्यावी लागतेय. आयुष्यात घडत असलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी, भावनांचा कल्लोळ शांत करण्यासाठी हक्काचा मित्रैत्रिणींचा खांदा, समोर बसवून आपण आळस तर करत नाहीये ना हे चाचपडणारी मंडळी सगळ्यांची उणीव जाणवतेय, अगदी रोज बोलणं होत असतानाही. हाडामासाचा माणूस समोर असणं नि त्याच्यासमोर भावनांचा निचरा करणं याचं समाधान वेगळंच असतं नाही?
परक्या प्रांतात गेल्यावरही मायेनं आपलीशी करणारी किती तरी नवी माणसं भेटत आली. लेहच्या ट्रिपमध्ये होम स्टेसाठी ज्यांच्याकडे राहिलो त्या आंटींच्या कुटुंबानं कडाक्याच्या थंडीत आपलेपणाची दिलेली ऊब, स्पितीच्या ट्रिपमध्ये माहिती देणारा आमचा चालक, तिथे शेवटच्या गावात रात्रीच्यावेळी लाइट नसताना आमच्यासाठी रांधणारी माऊली, बुलेटस्वारी करायला आलेला भन्नाट ग्रुप, नॉर्थ ईस्टच्या रस्त्यांवर काळजी घेणारा टोंडू, जंगल सफारीच्या निमित्तानं भेटलेली निसर्गवेड्यांची गँग, इंदोरच्या ट्रिपमध्ये कुमारजींच्या घरात भेटलेल्या उत्तरा, गोव्याच्या ट्रिपमध्ये आपलेपणानं घरी ठेवून घेणारे नि भटकताना सतत आमची खुशाली विचारणारे आदितीचे मामा-मामी असे किती तरी जण न कळत जोडले गेलेत. त्या त्या वेळी त्यांची झालेली भेट नि मदत किती मोलाची होती, हे सक्तीने घरी बसल्यावर कळतंय.
आशू तुला आठवतंय? डिसेंबरमध्ये आपण किती वर्षांनी असं समोरासमोर भेटलो. शाळेच्या दिवसांच्या गप्पांचा नुसता धबधबा पडत होता. व्हॉट्सअॅपवर रोज बोलत असतानाही किती काही सांगायचं राहूनच गेलेलं. दोन-तीन तास सभोवतालंचं सगळं विसरून बोलत होतो आपण. तो दिवस प्लॅन न करता ज्या दिशेने जाणार तिथे भेटू शकणाऱ्यांना फोन करायचे  नि भेटायचं असं ठरवलं. इतक्या जणांना थोडावेळ ना होईना पण भेटता आलं. एरवी ठरवून भेटू असं बोलण्यापुरतं राहिलेले अनेक जण भेटले जिची वेळ फक्त घरच्यांना नि तिच्या ड्युटी अवर्समध्ये असलेल्यांनाच मिळू शकते, अशी ज्ञानदा काहीही न ठरवता एक फोन केला नि त्यादिवशी भेटली. तिथून प्राजक्ता, तेजस्विनी, गायत्री गप्पा मारल्या. गॉसिप केलं. एकत्र नवं काय करू शकू यावर मंथन केलं. नि आपली वाट धरली. ठाण्यात गेल्यावर बाहेर यथेच्छ जेवूनही आदितीला कॉल केला नि ऑफिसला पोहोचायचंय, अजिबात फार वेळ नाही. वरण-भात नि नंतर चहा घ्यायला येतेय. तयार ठेव. असं सांगून दहा-पंधरा मिनिटांच्या भेटीत जे जे बोलायचं होतं, ते भसाभस बोलून टाकलं बॅग अडकवली नि निघालेही. अशी १०-१५ मिनिटांची आपल्या म्हणता येईल, अशा माणसांची भेटही ऊर्जा देते. एरवी यातल्या कुणाचसाठी आपल्याला खास असा वेळ नसतो. दहावेळा नियोजन नि पंधरावेळा आश्वासन देऊन आपण एकदा भेटतो. मनात आज नाही तर उद्या भेटू या हे समीकरण असतं. आज यथेच्छ वेळ असताना आयुष्याच्या भाग असलेली अगदी जवळची मंडळी कितीतरी लांब आहेत, वाटलं तरी भेटायला जाऊ शकत नाही, ही भावना हतबल करणारी आहे ना? परवा आई विचारत होती हा करोना जाणार कधी, नि तू येणार कधी गं? खूप महिने झालेत भेटून. एकदम अगतिक वाटून गेलं तिचं बोलणं. लगेच बॅग भरावी नि चालू पडावं, असं झालं. पण पायात बेड्या पडल्या.
संकट बाहेर घोंघावत असतानाही जिवावर उदार होऊन अनेकजण गाव गाठताहेत. आपल्या माणसांमध्ये काही करून पोहोचण्याचा आकांत करताहेत. वाट्टेल ती किंमत देताहेत. ते शहाणे, मुर्ख असं जजमेंटल होण्यापलिकडे आपल्या माणसांची ओढ किती मोठी असू शकते, हे सतत विचार करायला लावतंय. एका मैत्रिणीशी बोलताना ती सहज म्हणाली, संधी मिळाली तर मला गावी आईकडे जायला आवडेल. तिथे गच्चीवर गेलं की सभोवताली गप्पा मारता येतात, अख्खी गल्ली आपली असते. माणसांचे आवाज कानावर पडतात. इथे आता भकास वाटू लागलंय. आपणच निर्माण केलेल्या असंख्य गोष्टी सभोवताली असल्या तरी माणसं सभोवताली असणं, भेटणं, वावरणं याशिवाय काहीच आलबेल असू शकत नाही, ही जाणीव नव्यानं होऊ लागलीये. या माणसांचं भोवती असणं, चिडणं, रूसणं, संतापणं, प्रेम करणं, हक्क गाजवणंच तर आपल्यातल्या माणसाला जिवंत ठेवत असतं. आपल्यातील माणूस जगवायचा तर सभोवताली माणसांचा वावरही अपरिहार्य आहेच.
कुठल्याशा नात्यानं बांधलेल्या, मैत्रीच्या धाग्यात गुंफलेल्या, कुठल्याच नात्यात नसलेल्या अशा तुम्हा सगळ्यांच्या असण्यानं तर माझं माणूसपण अबाधित ठेवलंय. जगवलंय. माझ्यातील ‘माणसा’चा श्वास सुरू राहण्यासाठी आपल्याला भेटत राहायला हवंच, तेही स्पर्शाच्या अंतरावर येऊन. भेटू या लवकरच
तोपर्यंत मोठ्यांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद
लोभ आहेच, तो वाढावा
कळावे,
तुमचीच
यामिनी
ता. क. : सगळ्यांच्या निरोगी आयुष्याची कामना नि खूप प्रेम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा