समुद्राच्या लाटांची गाज मनात एक वेगळीच लय निर्माण करते. त्या लयीचा, लाटेने निर्माण होणाऱ्या खळबळीचा, किनाऱ्यावर निवांतपणे विसावण्याचा एक वेगळाच सिलसिला असतो. आधीची खळबळ आणि त्यानंतर येणारं विसावलेपण हा अनुभवच वेगळा…
नदी मूळातच शांत, संयत प्रवृत्तीची… तिचा प्रवाहही असाच निर्मळ.. खळबळ तिचा स्थायीभावच नाही… पण तरीही अडकून रहायचं नाही, साचलेपण येऊ द्यायचं नाही… प्रवाहीपण सोडायचं नाही, हा तिचा नेम.
निसर्गातील या दोन वाहिन्या मानवी स्वभावाच्या अगदी जवळ जाणाऱ्या. नेमकं कस असावं, याच उदाहरण देणाऱ्या… खरं तर हे सारं तात्विक, जीवनाचं सार वगैरे कुठुन आलं अचानक असं माझं मलाच वाटून गेलं. पण, देनवा नदीच्या शुभ्र, स्वच्छ खळाळत्या पाण्याने थोडंस अंतर्मुख केलं आणि रोज भेटणारा समुद्र आणि देनवा मनात घर करून राहिले. ही देनवा नदी भेटली ती निसर्गाचा असाच अद्भुत अविष्कार असलेल्या जंगलाच्या सफारीवेळी एक स्वतंत्र, न्यारी आणि विलोभनीय दुनिया.
सुंदरबन, ताडोबाची सैर केल्यानंतर निसर्गाच्या या रूपाकडे बघण्याची एक दृष्टी मिळावी. त्यामुळेच सातपुडा जंगल, तिथला निसर्ग, प्राणी, पक्षी यांना न्याहाळताना यावेळी केवळ भारावलेपण नव्हतं. मनात अनेक विचार, आपल्या रोजच्या आयुष्याशी असणारं येथील जीवनमानाचं जोडलेपण, असं बरंच काही मनात आलं.
येथे मुक्त विहार करताना भेटणारे अनेक प्रकारचे पक्षी, त्यांची लोभस रूपे, त्यांचा मुक्त विहार, त्यांचे स्वातंत्र्य याचा प्रत्येकाला हेवा वाटावा. जंगलातील झाडांचे वैविध्य, त्यांची प्राण्यापक्षांशी जोडली गेलेली नाळ, आभाळाकडे झोपावतानाही जमिनीत पाय घट्ट रोवून उभे असलेले वृक्ष, नुकताच पावसाळा संपल्याने चौफेर असलेली हिरवाई… हे सारंच आल्हाददायक. मनाला ‘हिरवं’, ‘ताजतवान’ करणारं.
सातपुडा जंगलाकडे जाणारी वाट ही देनवा नदीतील. या नदीत पहाटे सूर्योदयाच्यावेळी पाण्यात पडणाऱ्या तांबूस रंगाच्या किरणांचे प्रतिबिंब. लालसर तेजानं व्यापलेलं आकाश. दूरवर नदीचे पाणी आणि आकाशाची भेट होत असल्याचा आभास, सारं मनात घर करून राहतं. या पाण्यातून जाणारी वाट जंगलाबाबतचे औत्स्युक्य वाढते. जंगलात प्रवेश करताना, स्वागत करणारी हसरी कमळे, मोर, हरणांचे ताफे त्यांच्या साम्राज्याची झलक दाखवतात. या सफारीचे कुतुहल वाढवतात.
वाघाला जंगलाचा राजा का म्हणतात? त्याचे दर्शन अद्भुत का? ‘टायगर लक’ खरंच असावं लागतं? या साऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याची एक झलक दिसली तरी आपोआप मिळते. त्याचा रूबाब, त्याचा वेग, त्याचे राजेपण आणि त्याची शान… विलोभनीय! सातपुड्याला पहिल्याच सफारीच्या सुरुवातील अशी रूबाबदार सलामी मिळाली आणि राजेपणाचं दर्शन घडलं. जंगलातून रूबाबात येणारा आणि समोरच्याला खिजगणतीतही न धरता आल्याचे ऐटीत निघून जाणारा वाघ पाहिला आणि सातपुड्याला येणं सार्थकी लागलं. आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट अनपेक्षितपणे मिळाली की जो आनंद होतो, तोच आनंद व्याघ्रदर्शनानेही मिळतो.
जंगल सफारीतील अनुभव, तिथलं जीवनमान याचा विचार केला तर ही सफारी आपल्याला निर्व्याज आनंद म्हणजे काय, प्रयत्नाने आणि पुरेशा प्रतीक्षेने एखादी गोष्ट मिळवण्यातलं समाधान काय आणि सगळ्यात महत्त्वाचं न मिळालेल्या गोष्टीने न हिरमुसता प्रयत्नातील आनंद अनुभवायला शिकवते. नव्याने शोध घेण्याची उर्मी कायम राखण्याचे धडे देते.
जंगलातील प्राणी धोक्याचा इशारा म्हणून देत असलेले ‘कॉल’ ऐकत जंगल प्रदक्षिणा झाली. जंगजंग पछाडलं. तेव्हा कुठे दूरवर झाडाखाली ‘बिबळ्या’च रूप दिसलं. तेही दुर्बिणीतून! म्हणजे तुम्ही आलात आणि आम्ही तुमचे स्वागत करायला सलामी देतो, असे शहरातल्या वातावरणात होत असलं, तरी नेहमी असं घडणार नाही. इथे आमचे नियमच चालतात. याची जाणीव त्यांनी करून दिली.
रोजचा कामाचा व्याप, घड्याळाच्या काट्यावर बांधलेलं आयुष्य यातून काढलेली फुरसत आल्हाददायीही हवी आणि काही मिळवल्याचा आनंद देणारीही. सातपुड्यात निसर्गाच्या चौफेर वेळ्यात मिळालेला निवांत विसावा, सूर्योदय-सूर्यास्त बघण्याचं भाग्य आणि जंगलदर्शन… सारंच प्रफुल्लित करणारं. संध्याकाळच्या वेळी हातात निवांत कॉफीचा कप, समोर वाहणारं नदीचं पाणी, सुखद गारवा, ‘प्रदूषण’ नसलेली हवा, हे सुख तरी कुठे असतं रोजच्या आयुष्यात? स्वतःसाठी काढलेला हा वेळ त्यामुळेच वेगळा ठरला. नवे मित्रमैत्रिणी, जुन्यांचा सहवास, त्यांचे अनुभव, मजा, थट्टा-मस्करी वातावरणं हलकफुलकं करणारे. तर जुन्या आठवणी नव्याने जगण्याची संधी देणारा मैत्रिणीचा सहवासही तितकाच आपलेपणाचा!
पक्षांचे प्रकार, त्यांचे बारकावे, रंग, रूप, वैशिष्ट्य यांची अचूक माहिती असणारे आणि ती देण्याची तयारी असणारे ‘साथी’ मिळणंही भारी. एखादा पक्षी दिसेपर्यंत थांबायचे, तो प्रत्येकाला दिसावा म्हणून अट्टहास ठेवायचा, त्याला न्याहाळायचे आणि निघायचे हे सारे वेगळा अनुभव देणारे. त्यामुळेच पक्षी आणि त्यांची ओळखही आनंददायी ठरली, ती त्यासाठी झपाटलेपण असलेल्या मंडळींमुळे!
रात्रीच्यावेळी जंगल कसं दिसतं? काय हालचाल असते? घनदाट झाडीत जंगल दिसतं? या साऱ्या प्रश्नांची एकल करणारी सैरही अनुभवायला मिळाली. रोजच्या नाइटशिफ्टने ‘रात्री’चे भय नाहीसे केले असले तरी जंगलातील रात्री मनातून थोडीतरी घाबरवणारीच. एरवी दीड-दोन वाजलेत वाटावं असं नऊ-दहा वाजताचं वातावरण. निरव शांतता, पक्ष्यांचे, प्राण्यांचे आपापले आवाज, झाडाच्या पानाची सळसळ अशी सारी हालचाल… जंगलातील ‘अवघड’ वाटेवरून धावणारी गाडी आणि बॅटरीच्या झोतात भिरभिरणाऱ्या नजरा… मस्त माहोल. आत्ताच सुरू झाली आहे अशी वाटणारी दोन तासाची सफारी संपते तरी कळत नाही.
एकूणच आयुष्यात फुरसतीचे मिळणारे दोन क्षण कृत्रिम हवेत घालवण्यापेक्षा मोकळी हवा भरून घ्यायला निसर्गाकडे यायला हवं. त्याच्या अटीवर, त्याला शरण जायला हवं. हे त्याचं राज्य, त्याचं जग आणि इथे फक्त निसर्गाचे इशारे चालतात, हे मान्य करण्यासाठी यायला हवं. कधी मिळणारं भरभरून दान, कधी रिते हात, कधी प्रतीक्षा, कधी हुरहुर सारं ‘स्वीकारण्याची’ तयारी जोखण्यासाठी यायला हवं. सातपुड्याच्या अनोख्या जंगलानं अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. केवळ सफारीचा आनंद, सहलीची मजाच नाही तर वेगळी दृष्टी, दिशा दाखवली. आपल्या चकचकीत एसीच्या हवेतून खुल्या आकाशात फिरण्याचा निर्भेळ आनंद दिला. नवी उर्मी मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा येण्याचा निर्णय परतेपर्यंत निश्चित झाला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा