गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

मुंबई थांबलीये पण...

ऐसा हंगामा न था जंगल में
शहर में आए तो डर लगता था

इमारतींच्या उंचीने, जगण्याच्या वेगाने आणि माणसांच्या गर्दीने दडपून टाकणारी मुंबई. नवख्या माणसाला गांगरून टाकणारी, पण सामावून घेण्याच्या स्थायीभावाने आश्रयाचे छत्र धरणारी मुंबई. कुणासाठी स्वप्नांची नगरी, कुणासाठी लखलखती दुनिया, कुणासाठी नोकरीचे ठिकाण तर कुणाची दोन वेळच्या भुकेची हमी. मुंबईचा असा एक चेहरा नाही, एक रंग नाही. माणसांपासून जगण्यापर्यंत प्रचंड वैविध्य. पण इथल्या जगण्याचा एक धर्म आहे आणि तो म्हणजे माणुसकी. लोकलमध्ये हिरोगिरी करत लटकणाऱ्याचा हात सुटतोय असं जाणवलं तर जिवावर उदार होत चार हात पुढे सावरण्यासाठी जातात. भले नंतर हात साफही करतील. पण माणसाला मरू देणार नाही. हीच तर मुंबई. आपल्या माजात जगणारे वेगवान शहर.

गेल्या काही दिवसांत या मुंबईचा नूरच पालटलाय. हे शहर आपलंच आहे का, असं अगदी जुन्याजाणत्यांनाही वाटावं, इतका रंग उडालाय. वेग ही ओळख असलेलं शहर थांबलंय नि शहराचं असं थांबणं अंगावर येतंय. २२ मार्चला जनता कर्फ्यू होता. त्या दिवशी प्रत्येक माणूस नेटानं घरी होता. कधी नव्हे ते शहरात माणसं नि वाहनांऐवजी पक्ष्यांचे आवाज येऊ लागले. झाडांची सळसळ जाणवू लागली. मानखुर्दचा पूल नि फ्री वे वरून गाडीनं वेग घेतला तेव्हा शांत शहराचा चेहरा कॅमेऱ्यात बंदिस्त केला. सोशल मीडियावर या शांततेचा आवाज खुलला होता. मी ही दोन-तीन व्हिडीओ करत कसं अर्धा तासांत सीएसटी गाठलं वगैरे कल्पनेत होते. पण ही भयाण शांततेची नांदी आहे, असं तेव्हा जाणवलंही नव्हतं. अत्यावश्यक सेवेचा भाग असल्यानं अशाच रिकाम्या रस्त्यांवरून पुढेही अनेक दिवस जात राहिले. पण सुरुवातीची भावना विरत जाऊन शांतता निस्तेज वाटू लागली. शहर अनोळखी होऊ लागले. रिकामे रस्ते अंगावर येऊ लागले. रस्त्यांवर पडलेला बहाव्याचा पिवळा सडा, एरवी पेपरचा फोटो. पण हे रूपही माणसांविना उदास वाटू लागले. या सगळ्यात नेटाने पहारा देणाऱ्या पोलिसांबद्दल दिवसा आणि विशेषत: रात्रीच्या प्रवासात अपार जिव्हाळा वाटू लागला. रस्त्यावर चिटपाखरूही नसणं ही आनंददायी नव्हे तर एकटेपणाची बोचरी भावना देणारे वास्तव आहे, याची जाणीव आत आत रूतू लागली. १३ वर्षांपूर्वी या शहरात पाऊल ठेवलं, ते हे शहर नाहीच असं वाटण्याइतकं रिकामपण आलं. माझा नि शहराचा धागा हा दशकाचा. पण वर्षानुवर्ष या शहराच्या पंखाखाली वाढलेल्यांनीही अनेक संकट पाहिली. दंगे-धोपे, पाऊस, बॉम्बस्फोट यासारखी अस्मानी-सुलतानी संकट अंगावर घेतली. पण पुन्हा याच शहरावर विश्वास ठेवत ते जगू लागले. शहर असं कधीच थांबलं नाही, हे अनुभवातून मांडलेलं वाक्य शहराच्या सद्यस्थितीच वर्णन करू शकतं. ‘मुंबई स्पिरीट’ वगैरेपेक्षा इथल्या जगण्याची आणि अस्तित्व राखण्याची अपरिहार्यता म्हणू या. पण शहर थांबलं नाही. इथला गणेशोत्सव, दिवाळी, ईद, ख्रिसमसचा एक वेगळा थाट आहे. सुख-दु:ख वाटून घेण्याची एक रित आहे. पण, आज एका करोनाने सारं बदललं. ४५ दिवस शहर भयाण शांततेची नकोशी झूल वागवंतय नि त्याचा अंतही दिसत नाही.

मी पाचवीत वगैरे होते. कल्याणला राहणाऱ्या आजीकडून आम्ही डोंबिवलीला आत्याकडे निघालो होतो. सकाळी १०च्या सुमारास कल्याणहून लोकल पकडली. मी आणि आई लेडिज डब्यात नि बाबा-दादा जनरलमध्ये. डोंबिवलीला गर्दीने डब्याचा ताबा घेण्याआधी निसटून मी विजयी मुद्रेने बाहेर पडले. पण आई अडकली. तिला बाहेरच पडता येईना. लोकल सुटण्याआधी कुणी माझा गांगरलेला चेहरा पाहिला नि जवळपास आईला डब्याबाहेर ढकललं. तिकडे बाबा बाहेर पडले नि दादा अडकला. मग दादासाठी बाबा पुन्हा लोकलमध्ये चढले नि दिव्याहून परतले. त्या क्षणी मुंबई नि इथल्या लोकलची प्रचंड दहशत मनात होती. बाबा रेल्वेत असल्याने गाडीचा प्रवास नवा नव्हता. पुढे कॉलेजच्या निमित्ताने तळेगाव-पुणे रोज लोकलने प्रवास करत होते. पण तरी मुंबईची लोकल नाही जमू शकत, हे दडपण मनावर होतंच.

२००७मध्ये या मायानगरीत पाय ठेवताना ‘पुणे’ मनात नि डोक्यात पक्क होतं. दोन-चार वर्ष काढायची नि संधी मिळताच पुण्याला परतायचं, असं ठरवून शहरात पाय ठेवला होता. त्यामुळे हे शहर आपलं म्हणायचं नाही, त्याविषयी जिव्हाळा तर वाटूनच घ्यायचा नाही. आपल्याला इथे कुठे आयुष्य काढायचंय, असं ठरलं होतं. त्यातल्या त्यात या मुंबईच्या कलकलाटापासून लांब म्हणून नवी मुंबईत राहिलो. सेंट्रल-वेस्टर्नच्या तुलनेत हार्बरची गर्दीही सुसह्य असते, असं ऐकून असल्यानं आशा होती. इथल्या पावसाच्या कथा नि चित्र माहिती असल्यानं पहिल्या पावसाआधी जोरदार तयारी केली. नवी छत्री, पावसाळी पर्स, बॅगेत कपड्यांचा जोड असं रोज वागवंत होते. इथला पाऊस म्हणजे थ्रिल असतं, अशा कल्पनाविलासात होते. त्यामुळे एकदा तरी पाणी भरावं, लोकलमध्ये किमान दोन-तीन तास अडकून पडावं… म्हणजे कसं मुंबईचा पाऊस अनुभवला असं म्हणता येईल, अशा ‘फॅण्टसी’ होत्या. पुन्हा काय सांगू बाई मुंबईचा पाऊस, इतकी वाट लागली वगैरे पुण्यातल्या चार जणांना सांगताही आलं असतं. पण मुंबईत आल्यावर सलग दोन वर्षे एकदाही अडकले नाही. फार तर अर्धा तास गाडी रखडली. पण आलीच नाही असं झालंच नाही. पाऊसही रात्रीचा पडायचा, नि मी दुपारी निघेपर्यंत साठलेलं पाणीही ओसरून जायचं. एकदा ऑफिसमध्ये मी म्हटलंही काय पावसाळा सुरू आहे नि मी एकदाही का नाही अडकले? पण अडकलेल्यांची दैना, घर गाठण्याचा आकांत जवळून मांडताना या ‘फॅण्टसी’ संपून वास्तवाची जाणीव होत चालली नि मुंबई शहरही उमगू लागलं. मी कायम रात्री प्रवास करत आलेय. एकदाही भीती भरून आली नाही. मी रात्री १२ वाजता लोकलने प्रवास केला. मानखुर्दच्या पुलावर अपघातानं अख्खी रात्र गाडीत बसून काढली. कारची वाट बघत ऑफिसखाली दोन वाजेपर्यंत गाडीतच झोप काढली. काही कामानिमित्त अख्खी रात्र ऑफिसात काढली. २६/११चा हल्ला जवळून पाहिला. त्यावेळची दहशत अनुभवली. पण मुंबईत कधीच असुरक्षित नि परकं वाटलं नाही. लोकलपासून ते माणसांपर्यंत नि रस्त्यांपासून इथल्या जगण्याच्या वेगापर्यंत सगळं कधी माझ्यात भिनलं नि हे शहर कधी माझं झालं हे कळलंच नाही.

आज पहिल्यांदाच हे शहर थांबलंय. उदास आहे. हतबल आहे. गेली १३ वर्षे माझ्याकडे काम करणारी बंगालची रूपा, उत्तर प्रदेशातून आलेला इस्त्री करणारा दिनेश, वॉचमन, राजस्थानातून आलेला किराणा विक्रेता, बिहारमधून आलेला रद्दीवाला, पेपरविक्रेता केरळचा अण्णा, असाच कुठूनसा आलेला भाजीवाला सगळ्यांच्याच चेहऱ्यावर अनिश्चितता गडद दिसू लागली आहे. जगण्याचा संघर्ष पराकोटीचा होऊ लागला आहे. हाताला काम नसणं ही चिंता पोखरतेय. आजवर धीर राखून असलेली ही मंडळी हतबल आहेत. त्याचबरोबर गेल्या दीड महिन्यापासून घरी असलेला सर्वसामान्य मुंबईकरही अनिश्चिततेच्या तणावात दिसतो. परवा कुणाशी बोलताना नोकरी, भविष्य, पैसे, ईएमआय, पगाराची स्थिती असं काही सहज बोललं जात होतं.

आज या संकटातही डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार, नेते, चालक, वाहक, संस्थांचे कार्यकर्ते ही मुंबई सावरण्यासाठी नेटानं उभे आहेत. तुम्ही, आम्ही घरात राहून सावरायचा प्रयत्न करतोय. इथं जगायचं तर वेग आणि त्याच्याशी जुळवून घेणं अपरिहार्य आहे. त्यामुळेच सध्याच्या संकटाचं सावट दूर होऊन आकाश पुन्हा स्वच्छ मोकळं व्हावं, कुठल्याही दडपणाविना निरभ्र जगता यावं, इतकीच प्रत्येकाला आस आहे. या शहरानं माझ्यासारख्या अनेकांना आपलं म्हटलंय. पंखाखाली घेतलंय. भाषा, धर्म, जातीपल्याडचा माणूस दाखवलाय. मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही. दिवसाच्या कोणत्याही वेळी, रात्रीच्या इथे कोणत्याही प्रहरी इथे पोट भरता येतं हा अनुभव दिलाय. लाखोंच्या जगण्याची आस आहे हे शहर. हे पुन्हा लवकर धावायला हवं. वेगावर स्वार व्हायला हवं.  लोकलची गर्दी, स्टेशनवरचा आरडाओरडा, ट्रॅफिक, माणसांची गर्दी, सणांचे उत्साह, पाऊस सगळ्याने शहर पुन्हा गजबजू दे. आनंदाचे झाड इथे पुन्हा बहरू दे नि अनेकांच्या स्वप्नांना नवं बळ मिळू दे.

झगमगाते रहे, झिलमिलाते रहे अपने रास्ते
ये खुशी रहे, रोशनी रहे अपने वास्ते




मंगळवार, २९ मार्च, २०१६

प्रश्न… केवळ प्रश्नच!



चोरीच्या आरोपाखाली १६ वर्षांच्या मुलाला अटक, रेल्वे प्लॅटफॉर्मवर चोरी करताना मुलाला बेदम मारहाण, रस्त्याच्या कोपऱ्यात पहुडलेल्या मुलावर पोलिसांनी चालवलेला दंडुका, धारावीच्या चिंचोळ्या गल्लीत दिवसरात्र मान मोडून काम करणारे मूल नोकरीच्या निमित्ताने असे असंख्य प्रसंग रोज दिसतात, अनुभवाला येतात. काही प्रसंग आत खोलवर जखमा करतात, काही वेळा चुचकारत आपण पुढे जातो, तर काही वेळा अगदीच हतबल वाटू लागते गुन्हेगार घडू नयेत, यासाठी यंत्रणाच उभी करणे जमले नसल्याची रोज ढळढळीत दिसणारी उदाहरणे अस्वस्थ करू लागली. या घटनांवर खोलवर विचार केला, त्याच्या साखळ्या जोडण्याचा प्रयत्न केला तर या साऱ्यातून अव्यवस्थेचे दुर्दैवी वास्तव लख्खपणे समोर येते प्रत्येक यंत्रणा आपले काम चोख करत नसल्याने हे भीषण वास्तव आहे. यात दोष कुणाचा? भरडलं कोण जातं? त्यांचे किमान हक्क का नाकारले जावे असे प्रश्नच प्रश्न आहेत पण उत्तरे कुठे आहेत?

कुर्ला स्टेशन नेहमीच वर्दळ असणारा उपनगरी रेल्वेचा भाग. माणसावर माणूस धडकला तर वळून बघायलाही वेळ नसतो, इतकी येथे येणारी माणसे धांदलीत. याच स्टेशनवर एक साधारण १२ वर्षांचा मुलगा पाकीट घेऊन पळण्याच्या प्रयत्नात होता. लोकांनी त्याला पकडून प्रचंड मारलं लाथाबुक्क्यांनी चोपलं, कानशिलात लगावली. तो गयावाया करून सुटकेची याचना करत होता. पण दयेवर संतापाने मात केली होती. या मंडळींच्या तावडीतून सुटला म्हणून त्याचा जीव वाचला, असं म्हणावं इतका मार खाल्ला त्यानेतिथून तो जीव खावून पळाला आणि हार्बरच्या प्लॅटफॉर्मच्या पलिकडे असलेल्या एका माणसापर्यंत पोहोचला मात्र, इथे येऊनही त्याची सुटका नव्हती. एक साधं पाकीट मारून पळता येत नाही का, असं म्हणत इथेही त्याला टपल्या खाव्या लागल्या. त्याच्याबाबत पोलिसांना सांगितलं तर अशी रोज ५६ मुलं येतात आणि १० मार खातात, असं म्हणत त्यांनी झटकून टाकून माझं पुढे ऐकून घेण्याची तसदीही दाखवली नाही. कुर्ला स्टेशनबाहेर कोपऱ्यात, प्लॅटफॉमच्या पलिकडे लांब रूळांच्या टोकाला ही मुले, त्यांचा मुकादम यांचे चालणारे व्यवहार, मुलांचे व्यसनांना जवळ करणे यातलं काहीच कुणाला दिसत नाही? यंत्रणांनाही हा प्रश्न सोडवण्यापेक्षा दुर्लक्ष करून सोडून द्यावासा वाटतो आणि त्यातून रोज नवा गुन्हेगार घडत ​जातो. रोजच्या प्रवासात दिसणाऱ्या अशा शेकडो मुलांबाबत असे प्रश्न सतत मनात डोकावतात. त्यातील प्रतिसाद देणाऱ्या मुलांना संस्थांपर्यंत पोहोचवणे शक्य होते. मात्र, त्यातील अनेक मुले पुन्हा भेटत नसल्याने या मुलांशी संपर्कही होत नाही. कुर्ल्यातील या मुलाबाबत ऐकून घ्यायची, मदत करायची इच्छा असल्याने पुढचे खूप दिवस त्याला शोधत होते, पण तो दिसला नाही. इतक्या लहान वयात जिवाशी खेळ करणाऱ्या, व्यसनाधीन मुलांबाबत प्रशासन म्हणून, समाज म्हणून काय विचार होतो? काय झालं असेल या मुलाचं या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात त्याला मिळाला असेल? असंख्य प्रश्न मनात घर करून आहेत.
 डिसेंबरमध्ये मुंबईत कधी नव्हते ती थंडी अवतरली घरातले पंखे, एसी बंद झाले. ठेवणीतल्या रजया बाहेर आल्या. मुंबईत थंडीच पडत नसल्याने काहींना विकत घ्यायची वेळ आली.रात्री उशिरा सीएसटीला हॉटेलात खाऊन मस्त गप्पा मारत येत असताना अचानक फूटपाथवर पाय पोटाशी घेऊन दात वाजत असलेला, रस्त्यावर पहुडलेला मुलगा दिसला. अंगावरचे रोजचेच कपडे फाटलेले, तिथे थंडीच्या उबेसाठीची काय कथा. फूटपाथवरच बिऱ्हाड असलेल्या एका कुटुंबाने छोटी शेकोटी पेटवताच हा मुलगा त्यांच्यातच उबेला जाऊन बसला. काही काळाचा तरी दिलासा, असं म्हणत त्याने जमेल तेवढी ऊब जमवून घेतली. पण गरिबांकडे अन्न शिजवायची मारामार तर शेकोटीला कचरा कितीसा पुरणार त्यामुळे तो नाईलाजाने पुन्हा उठून पाय पोटाशी घेत कुडकुडत राहिला. उद्योगासाठी उत्तर प्रदेशातील कुठल्याशा गावातून त्याला आणलं होतं आणि मालकाच्या इथून त्याने पळ काढला होता रोज अशी असंख्य लहान मुले रस्त्याच्या कडेला ऊन, वारा, पावसामध्ये पाय पोटाशी घेऊन रात्र काढतात. रस्त्यावर दिशाहीनपणे भटकत दिवस ढकलतात त्यांची ना गरीबाला चिंता, ना रजईच्या ऊबेत झोपणाऱ्यांना. पाऊस, थंडी आली की शेल्टर होमच्या नुसत्या बाता होतात, तत्पर व्यवस्थेकडून त्याची जुळवाजुळव होईपर्यंत उन्हाळा आलेला असतो या प्रचंड महाकाय अशा नगरीत रोज रात्री अशी किती मुले पाय पोटाशी घेऊन झोपत असतील  त्यांच्या जगण्याचा किमान अधिकारही त्यांना मिळत नाहीये. दोन वेळच्या खाण्याची मारामार आहे आधारच मिळाला नाही, तर भूक त्यांना गुन्हेगार बनवणार नाही? या अनिर्बंध व्यवस्थेमुळे तयार होणाऱ्या गुन्हेगारांची जबाबदारी कुणावर आहे?

धारावीतील दाटीवाटीने उभे असलेले उद्योग अन्वर नावाचा ११ वर्षांचा मुलगा इथे भेटला. बिहारच्या कुठल्याशा गावातून काकाच्या पाठोपाठ मुंबईत आलेला. काकाबरोबर रहातो. धारावीत जरीकाम करतो. दिवसरात्र यात गढून जावे लागत असल्याने  शिक्षणाची इच्छा असूनही ती सध्या बारगळलेलीच आहे. हे काम त्याला अजिबात आवडत नाहीये. पण गावच्या कुटुंबाचा डोलारा दिसत असल्याने रोज पाय ओढत कामाला जातो आणि मनमारून येथे राबतो. पोलिस येतात. तात्पुरत्या धाडी होतात. त्यांच्या हातात नोटांची बंडलं कोंबली जातात आणि सारं काही अधिकृत होतं. चिमुकल्या हातात खेळ, पेन्सिल घ्यायच्या वयात या मुलांना राबावे लागत असेल आणि आपल्या व्यवस्थेचा या बेकायदा उद्योगाला आशीर्वाद मिळत असेल, तर या मुलांचे आयुष्य मार्गी लागणार कसे? त्यांच्या या बिकट जगण्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्यातून नवे गुन्हेगार घडणार नाहीत किंवा परि​स्थिती त्यांना गुन्हेगार बनवणार नाही, याच काय हमी?

मुंबईत प्रत्येकाला लोकलचा प्रवास अपरिहार्यच. या लोकलमध्ये रोज शेकडो मुले लिंबापासून ते खेळण्यांपर्यंत आणि पेनापासून ते भाज्यांपर्यंत सारं विकत फिरत असतात. एक-एक दोन-दोन रुपये जोडत असतात. याच रुपयांमधून त्यांना रोजच्या जगण्याची बेरीज साधावी लागतेय. त्यातलाच एक मुलगा तीन वर्षांपूर्वी भेटला होता. दीदी मुझे स्कूल में जाना है, लेकीन पैसे के लिए काम करना पडता है... असं सांगू लागला. मुंबईतील एका चांगल्या संस्थेच्या ओळखीच्या माणसाकडे त्याच्याविषयी बोलले होते. त्या संस्थेचे शेल्टर होम असल्याने त्याची तिथे सोय झाली आणि त्याचा शिक्षणमार्ग प्रशस्त झाला. पण लोकलमधून फिरणाऱ्या प्रत्येक विक्रेत्या, भीक मागणाऱ्या मुलाच्या वाट्याला हे जगणं येईल का?
यातील प्रत्येक समस्येचे निराकरण होत नाही, म्हणून या मुलांनी गुन्हेगार व्हावं असं मुळीच म्हणणं नाही. किंवा या मुलांनी हातात चाकू घेत खून करावे, अॅसिड फेकावे, विनयभंग करावे असंही म्हणणं नाही. पण या मुलांना जगण्यासाठीच्या किमान गोष्टीच नाकारल्या जात असतील आणि त्यांना गुन्हेगारीच्या दलदलीतच आयुष्य कंठावे लागले, तर त्यांची जडणघडण होणार तरी कशी? गुन्हेगारांच्या संगतीत राहून ते घडणार कसे? या परिस्थितीतही स्वतःला घडवणारी मुले आहेतच पण प्रत्येकाला ते जमतच असंही नाही.
खरं तर सुधारगृह, वेगवेगळ्या परिस्थितीत जगणाऱ्या मुलांसाठीची वसतिगृह, मुलांसाठी काम करणाऱ्या शेकडो संस्था, वेगवेगळ्या छोट्या प्रश्नांना घेऊन आधार देणारी मंडळी या साऱ्यांचीच मोट बांधता आली, प्रशासकीय साहाय्य मिळाले तर यातल्या कितीतरी मुलांची गुन्हेगारीची वाट रोखणे सहज शक्य आहे. त्यासाठी फार काही प्रयत्न करण्याचीही आवश्यकता नाही. करोडोंची जुळवाजुळव रात्रीतून करणारी राजकीय-प्रशासकीय-सामाजिक मंडळी आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली संवेदनशीलता जागी राहिली आणि इच्छाशक्तीची, कृतीची जोड मिळाली तर खरोखर शेकडो मुलांना त्यांच्या जगण्याचा मार्ग गवसेल
 
रोजच्या लोकल प्रवासातून येणाऱ्या अस्वस्थतेवर मनातून मिळालेले हे

खरंतर प्रॅक्टिकल उत्तर…  अंमलबजावणी कधी होईल का, माहिती नाही...




(फोटो केवळ प्रातिनिधिक)

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

‘डिजिटल’ भारताची ‘ग्राऊंड रिअॅलिटी’


राजस्थानच्या गंग्रार गावातील ही घटना. रतन लाल जाट 35 वर्षांचा पंचायत सदस्य. गावातील, जातीतील प्रथाआणि मोठेपणासाठी अगदी धोकापत्करून त्याने धाडसीपाऊल उचलले. जातीतीलच एका मुलीला बायकोचा दर्जा देण्याचा मोठेपणा त्याने केला, तोही पहिले लग्न झालेले असताना. या लग्नाची कानोकान खबर लागू नये याची पुरेपूर काळजी घेत त्याने लग्न उरकून मुलीला तिच्या आईवडिलांकडेच राहू देण्याचा शहाजोगपणा केला. या सगळ्यामागे कारण होते ते या मुलीचे वय. अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचा हा नवरा’ ‘मालक’. पोलिसांपर्यंत ही खबर सोशल मीडियातून पोहोचली नि बालविवाह कायद्याच्या उल्लंघनाखाली त्याला अटक झाली. पण हा एक रतनलाल आज अटकेत आहे. पण, अशा अनेक रतनलालला बालवधूमिळवून देणारा एजंट मात्र फरार आहे. तो हाती लागला की असे किती बळीगेले, याचे समोर वास्तव धक्कादायक असेल.
.
नागपूरच्या विवेकानंद नगरातील शाळेत तीआठवीत शिकत होती.  तिला खरंतर शिक्षणाची प्रचंड आवड. मात्र, १३ वर्षांची असतानाच तिचे काका आणि वडिलांनीछत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात लग्नाचा घाट घातला आणि मुलीच्या शिक्षणाची वाट धूसर झाली. जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळाली. त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून तिचा विवाह थांबवला. एका अर्थाने ती सुदैवी ठरली, एवढेच समाधान.
…………………..
माझ्याकडे गेल्या सात वर्षांपासून ती घरकाम करते. पश्चिम बंगालहून आपलं बस्तान आवरून इथे रोजगाराच्या शोधात आली. तिचं वय फार तर ३५ ते ४०च्या दरम्यान असावं. त्यात तिला दोन मुले, दोन मुली आणि मुख्य म्हणजे नातवंडही! तिचं असंच अगदी लहान वयात लग्न झालं. मात्र, तिच्या दोन मुलींना पश्चिम बंगालमध्ये ती शिकवतेय याचं समाधान वाटत होतं. पण मुलगी साधारण १४ वर्षाची झाली आणि ही तिच्या लग्नाविषयी काही बाही सांगू लागली. माझ्या परीनं अतिशय ठाम विरोध केला. मुलीचं लग्न लवकर का करू नये, हे समजावण्यापासून ते माझ्या घरचं काम बंद होईल, इथपर्यंत सगळं सांगितलं. त्यामुळे हा विषय तिनं थांबवला. मात्र, दरवर्षीप्रमाणे एक महिना गावाला गेली नि मुलीचं लग्नच करून आली. वर्षभराच्या आत पाळणा हलला. दिदी आपको पता है, मेरी बेटी का बहुत खून निकल गया, उसकी डिलव्हिरी के टाइम. डाक्टर तो बोल रहा था उसका बचना भी मुश्कील है! हमने दो बोतल खून चढाया तभी उसने आँख खोली!.. असं एकेदिवशी घाबरत ती सांगू लागली.  त्याला आता दोन वर्ष झाली आणि पुन्हा तिला अॅनिमियामुळे औषधपाणी करण्याची वेळ आलीये. साहजिकच १६ व्या वर्षी बाळंतपण झाल्यावर हे होणारच लग्नाची घाई करू नको, असं मी सांगितलेलं ना तुला या माझ्या वाक्यावर गाव में सबकी इसी उम्र में शादी होती है! नही तो बाद में लडका नही मिलता उसको घर बिठाऊँ क्या तिचा सवाल
देश बदलतोय विचार अतिशय आधुनिक झालेत आमचे! कम्प्युटर, मोबाइल वापरणारी आम्ही मंडळी अतिशय शहाणी झाली आहोत, असं म्हणत स्वतःची पाठ आपण थोपटून घेत असतो. मात्र, शहाणपण म्हणजे नेमकं काय? आधुनिकता म्हणजे काय? जर विचारांची पातळीच उंचावणार नसेल आणि शिक्षणाने विचार साक्षर होणार नसतील तर बदल झालाय म्हणजे काय? पुरोगामित्वाचे ढोल बडवताना या ग्राऊंड रिअॅलिटीबाबत कधी तरी गांभीर्याने विचार कुणी करतं का?
देशामध्ये १८ वर्षांखालील मुलींचा आणि २१ वर्षांखालील मुलांचा विवाह बालविवाह मानला जातो. देशात आजही ४१ टक्के विवाह हे बालविवाह होत असल्याचे युनायटेड नेशन्सचा अहवाल म्हणतो. १० ते १४ आणि १५ ते १९ या कालावधीमध्ये मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण आजही खूप मोठे आहे. लहान वयात होणारे लग्न, समज येण्याआधीचे लादले जाणारे मातृत्त्व यामुळे या मुलींना आजही अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. त्यातील अनेकांना हुंड्यासह अनेक कारणांसाठी सासरच्यांचा छळ सहन करावा लागतो. शरीराला न पेलवतील इतकी कामे उपसावी लागतात. त्यातूनच लहान वयात त्यांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित होतात.
राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरयाणा या राज्यांमध्ये आजही सर्रास बालविवाहाची प्रथा रूढ आहे. मात्र, फार पूर्वीपासून सुधारणेचा वसा घेतलेल्या महाराष्ट्राची स्थिती तरी कुठे वेगळी आहे? ब्रिटीश काळात बालविवाहबंदीच्या चळवळीने राज्यात जोर धरला. महात्मा फुलेंपासून अनेक समाजसुधारकांनी या मानसिक बदलासाठी जोडे झिजवले. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटली तरी सुधारणेचे बीज अजूनही पुरते रूजलेलेच नाही. सोन्याचे तोळे आणि पैशांच्या लगडींवर कायद्याचे भय न बाळगता बड्या आणि स्वतःला शिकलेले, पुढारलेले म्हणवणाऱ्या घरांपासून गरीबांपर्यंत सर्वांचे विवाहसंबंध ठरतात. डबल ग्रॅज्युएट असणाऱ्या आणि लाखांच्या घरात पैसे कमावणारा सुशिक्षित घरांपासून ते हातावर पोट असणाऱ्या गरीब घरांपर्यंत सगळीकडे वंशाच्या दिव्याचा अट्टहास दिसतो.  महानगरांना जोडून असणाऱ्या शहरांमध्ये किंवा मोठमोठ्या टॉवर्सच्या सावलीत असणाऱ्या वस्त्यांमध्ये ही स्थिती तर छोटी गावे आणि पाड्यांबाबत काय म्हणावे? आज अगदी छोट्या शहरांमध्येही माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींचे विवाह होतात. आम्ही बदललोय असं आपण म्हणत असू तर तो केवळ पोशाखी बदलच म्हणावा लागेल. कारण प्रत्यक्षात अपेक्षित बदलांची परिस्थिती चारच घरांपुरती स्तिमित आहे. आपल्या ओळखीच्या घरांमध्येही असेच प्रकार आपण सहज बघतो. काणाडोळा करत घडू देतो किंवा आपल्याला काय करायचंय म्हणत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. मग परिस्थिती बदलणार कशी? विचारांचं शहाणपण येणार कसं?
राज्यातील  बालविवाहांची योग्य नोंदणी करत नसल्याचा ठपका मध्यंतरी  'कॅग'च्या अहवालात ठेवण्यात आला. २०१३-१४ या वर्षांत १० ते १४ वयोगटातील याच वर्षांत १५ ते १९ या वयातील ११,८३९ मुलींचे विवाह झाले असतानाही शासनाने कमी आकडे दाखवल्याचे निरीक्षण कॅगने नोंदवले. २०१० ते २०१३ या काळात राज्यात फक्त ४५ बालविवाह झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, राजकीय, सामाजिक, आर्थिक असे कोणतेच लाभ मिळवून न देणाऱ्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहाच कशाला, या सरकारी मनोवृत्तीमुळे आजही अनेक मुलींच्या आयुष्याचे डाव पणाला लागताहेत.

उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, राजस्थान आणि झारखंड या राज्यांत तर जातपंचायतीच्यारूपाने बालविवाह कायदेशीर ठरवणारी व्यवस्थाच उभी आहे. मग त्याला धक्का कोण आणि कसा लावणार? देशभरातील १९ वर्षे वयाच्या मुलींपैकी ४१ टक्के मुलींची लग्ने आधीच झालेली असल्याची माहिती पुढे येते, तेव्हा या सामाजिक व्यवस्थेतील फोलपणा ढळढळीत समोर येतो. जातपंचायतींना स्वतःची व्होटबँक मानून जोवर पोसले जाईल, बालविवाहासारख्या सामाजिक प्रश्नाविरोधात जोपर्यंत कायद्याचा कठोर बडगा उभारला जात नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार तरी कशी? हा प्रश्न माझा नाही, याचे मला काय करायचे ही मानसिकता मूळापासून बदलण्याची  गरज आहे. अन्यथा डिजिटल भारतात सामाजिक अधोगतीची शोकांतिकाच पहावी लागेल.