गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

मुंबई थांबलीये पण...

ऐसा हंगामा न था जंगल में
शहर में आए तो डर लगता था

इमारतींच्या उंचीने, जगण्याच्या वेगाने आणि माणसांच्या गर्दीने दडपून टाकणारी मुंबई. नवख्या माणसाला गांगरून टाकणारी, पण सामावून घेण्याच्या स्थायीभावाने आश्रयाचे छत्र धरणारी मुंबई. कुणासाठी स्वप्नांची नगरी, कुणासाठी लखलखती दुनिया, कुणासाठी नोकरीचे ठिकाण तर कुणाची दोन वेळच्या भुकेची हमी. मुंबईचा असा एक चेहरा नाही, एक रंग नाही. माणसांपासून जगण्यापर्यंत प्रचंड वैविध्य. पण इथल्या जगण्याचा एक धर्म आहे आणि तो म्हणजे माणुसकी. लोकलमध्ये हिरोगिरी करत लटकणाऱ्याचा हात सुटतोय असं जाणवलं तर जिवावर उदार होत चार हात पुढे सावरण्यासाठी जातात. भले नंतर हात साफही करतील. पण माणसाला मरू देणार नाही. हीच तर मुंबई. आपल्या माजात जगणारे वेगवान शहर.

गेल्या काही दिवसांत या मुंबईचा नूरच पालटलाय. हे शहर आपलंच आहे का, असं अगदी जुन्याजाणत्यांनाही वाटावं, इतका रंग उडालाय. वेग ही ओळख असलेलं शहर थांबलंय नि शहराचं असं थांबणं अंगावर येतंय. २२ मार्चला जनता कर्फ्यू होता. त्या दिवशी प्रत्येक माणूस नेटानं घरी होता. कधी नव्हे ते शहरात माणसं नि वाहनांऐवजी पक्ष्यांचे आवाज येऊ लागले. झाडांची सळसळ जाणवू लागली. मानखुर्दचा पूल नि फ्री वे वरून गाडीनं वेग घेतला तेव्हा शांत शहराचा चेहरा कॅमेऱ्यात बंदिस्त केला. सोशल मीडियावर या शांततेचा आवाज खुलला होता. मी ही दोन-तीन व्हिडीओ करत कसं अर्धा तासांत सीएसटी गाठलं वगैरे कल्पनेत होते. पण ही भयाण शांततेची नांदी आहे, असं तेव्हा जाणवलंही नव्हतं. अत्यावश्यक सेवेचा भाग असल्यानं अशाच रिकाम्या रस्त्यांवरून पुढेही अनेक दिवस जात राहिले. पण सुरुवातीची भावना विरत जाऊन शांतता निस्तेज वाटू लागली. शहर अनोळखी होऊ लागले. रिकामे रस्ते अंगावर येऊ लागले. रस्त्यांवर पडलेला बहाव्याचा पिवळा सडा, एरवी पेपरचा फोटो. पण हे रूपही माणसांविना उदास वाटू लागले. या सगळ्यात नेटाने पहारा देणाऱ्या पोलिसांबद्दल दिवसा आणि विशेषत: रात्रीच्या प्रवासात अपार जिव्हाळा वाटू लागला. रस्त्यावर चिटपाखरूही नसणं ही आनंददायी नव्हे तर एकटेपणाची बोचरी भावना देणारे वास्तव आहे, याची जाणीव आत आत रूतू लागली. १३ वर्षांपूर्वी या शहरात पाऊल ठेवलं, ते हे शहर नाहीच असं वाटण्याइतकं रिकामपण आलं. माझा नि शहराचा धागा हा दशकाचा. पण वर्षानुवर्ष या शहराच्या पंखाखाली वाढलेल्यांनीही अनेक संकट पाहिली. दंगे-धोपे, पाऊस, बॉम्बस्फोट यासारखी अस्मानी-सुलतानी संकट अंगावर घेतली. पण पुन्हा याच शहरावर विश्वास ठेवत ते जगू लागले. शहर असं कधीच थांबलं नाही, हे अनुभवातून मांडलेलं वाक्य शहराच्या सद्यस्थितीच वर्णन करू शकतं. ‘मुंबई स्पिरीट’ वगैरेपेक्षा इथल्या जगण्याची आणि अस्तित्व राखण्याची अपरिहार्यता म्हणू या. पण शहर थांबलं नाही. इथला गणेशोत्सव, दिवाळी, ईद, ख्रिसमसचा एक वेगळा थाट आहे. सुख-दु:ख वाटून घेण्याची एक रित आहे. पण, आज एका करोनाने सारं बदललं. ४५ दिवस शहर भयाण शांततेची नकोशी झूल वागवंतय नि त्याचा अंतही दिसत नाही.

मी पाचवीत वगैरे होते. कल्याणला राहणाऱ्या आजीकडून आम्ही डोंबिवलीला आत्याकडे निघालो होतो. सकाळी १०च्या सुमारास कल्याणहून लोकल पकडली. मी आणि आई लेडिज डब्यात नि बाबा-दादा जनरलमध्ये. डोंबिवलीला गर्दीने डब्याचा ताबा घेण्याआधी निसटून मी विजयी मुद्रेने बाहेर पडले. पण आई अडकली. तिला बाहेरच पडता येईना. लोकल सुटण्याआधी कुणी माझा गांगरलेला चेहरा पाहिला नि जवळपास आईला डब्याबाहेर ढकललं. तिकडे बाबा बाहेर पडले नि दादा अडकला. मग दादासाठी बाबा पुन्हा लोकलमध्ये चढले नि दिव्याहून परतले. त्या क्षणी मुंबई नि इथल्या लोकलची प्रचंड दहशत मनात होती. बाबा रेल्वेत असल्याने गाडीचा प्रवास नवा नव्हता. पुढे कॉलेजच्या निमित्ताने तळेगाव-पुणे रोज लोकलने प्रवास करत होते. पण तरी मुंबईची लोकल नाही जमू शकत, हे दडपण मनावर होतंच.

२००७मध्ये या मायानगरीत पाय ठेवताना ‘पुणे’ मनात नि डोक्यात पक्क होतं. दोन-चार वर्ष काढायची नि संधी मिळताच पुण्याला परतायचं, असं ठरवून शहरात पाय ठेवला होता. त्यामुळे हे शहर आपलं म्हणायचं नाही, त्याविषयी जिव्हाळा तर वाटूनच घ्यायचा नाही. आपल्याला इथे कुठे आयुष्य काढायचंय, असं ठरलं होतं. त्यातल्या त्यात या मुंबईच्या कलकलाटापासून लांब म्हणून नवी मुंबईत राहिलो. सेंट्रल-वेस्टर्नच्या तुलनेत हार्बरची गर्दीही सुसह्य असते, असं ऐकून असल्यानं आशा होती. इथल्या पावसाच्या कथा नि चित्र माहिती असल्यानं पहिल्या पावसाआधी जोरदार तयारी केली. नवी छत्री, पावसाळी पर्स, बॅगेत कपड्यांचा जोड असं रोज वागवंत होते. इथला पाऊस म्हणजे थ्रिल असतं, अशा कल्पनाविलासात होते. त्यामुळे एकदा तरी पाणी भरावं, लोकलमध्ये किमान दोन-तीन तास अडकून पडावं… म्हणजे कसं मुंबईचा पाऊस अनुभवला असं म्हणता येईल, अशा ‘फॅण्टसी’ होत्या. पुन्हा काय सांगू बाई मुंबईचा पाऊस, इतकी वाट लागली वगैरे पुण्यातल्या चार जणांना सांगताही आलं असतं. पण मुंबईत आल्यावर सलग दोन वर्षे एकदाही अडकले नाही. फार तर अर्धा तास गाडी रखडली. पण आलीच नाही असं झालंच नाही. पाऊसही रात्रीचा पडायचा, नि मी दुपारी निघेपर्यंत साठलेलं पाणीही ओसरून जायचं. एकदा ऑफिसमध्ये मी म्हटलंही काय पावसाळा सुरू आहे नि मी एकदाही का नाही अडकले? पण अडकलेल्यांची दैना, घर गाठण्याचा आकांत जवळून मांडताना या ‘फॅण्टसी’ संपून वास्तवाची जाणीव होत चालली नि मुंबई शहरही उमगू लागलं. मी कायम रात्री प्रवास करत आलेय. एकदाही भीती भरून आली नाही. मी रात्री १२ वाजता लोकलने प्रवास केला. मानखुर्दच्या पुलावर अपघातानं अख्खी रात्र गाडीत बसून काढली. कारची वाट बघत ऑफिसखाली दोन वाजेपर्यंत गाडीतच झोप काढली. काही कामानिमित्त अख्खी रात्र ऑफिसात काढली. २६/११चा हल्ला जवळून पाहिला. त्यावेळची दहशत अनुभवली. पण मुंबईत कधीच असुरक्षित नि परकं वाटलं नाही. लोकलपासून ते माणसांपर्यंत नि रस्त्यांपासून इथल्या जगण्याच्या वेगापर्यंत सगळं कधी माझ्यात भिनलं नि हे शहर कधी माझं झालं हे कळलंच नाही.

आज पहिल्यांदाच हे शहर थांबलंय. उदास आहे. हतबल आहे. गेली १३ वर्षे माझ्याकडे काम करणारी बंगालची रूपा, उत्तर प्रदेशातून आलेला इस्त्री करणारा दिनेश, वॉचमन, राजस्थानातून आलेला किराणा विक्रेता, बिहारमधून आलेला रद्दीवाला, पेपरविक्रेता केरळचा अण्णा, असाच कुठूनसा आलेला भाजीवाला सगळ्यांच्याच चेहऱ्यावर अनिश्चितता गडद दिसू लागली आहे. जगण्याचा संघर्ष पराकोटीचा होऊ लागला आहे. हाताला काम नसणं ही चिंता पोखरतेय. आजवर धीर राखून असलेली ही मंडळी हतबल आहेत. त्याचबरोबर गेल्या दीड महिन्यापासून घरी असलेला सर्वसामान्य मुंबईकरही अनिश्चिततेच्या तणावात दिसतो. परवा कुणाशी बोलताना नोकरी, भविष्य, पैसे, ईएमआय, पगाराची स्थिती असं काही सहज बोललं जात होतं.

आज या संकटातही डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार, नेते, चालक, वाहक, संस्थांचे कार्यकर्ते ही मुंबई सावरण्यासाठी नेटानं उभे आहेत. तुम्ही, आम्ही घरात राहून सावरायचा प्रयत्न करतोय. इथं जगायचं तर वेग आणि त्याच्याशी जुळवून घेणं अपरिहार्य आहे. त्यामुळेच सध्याच्या संकटाचं सावट दूर होऊन आकाश पुन्हा स्वच्छ मोकळं व्हावं, कुठल्याही दडपणाविना निरभ्र जगता यावं, इतकीच प्रत्येकाला आस आहे. या शहरानं माझ्यासारख्या अनेकांना आपलं म्हटलंय. पंखाखाली घेतलंय. भाषा, धर्म, जातीपल्याडचा माणूस दाखवलाय. मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही. दिवसाच्या कोणत्याही वेळी, रात्रीच्या इथे कोणत्याही प्रहरी इथे पोट भरता येतं हा अनुभव दिलाय. लाखोंच्या जगण्याची आस आहे हे शहर. हे पुन्हा लवकर धावायला हवं. वेगावर स्वार व्हायला हवं.  लोकलची गर्दी, स्टेशनवरचा आरडाओरडा, ट्रॅफिक, माणसांची गर्दी, सणांचे उत्साह, पाऊस सगळ्याने शहर पुन्हा गजबजू दे. आनंदाचे झाड इथे पुन्हा बहरू दे नि अनेकांच्या स्वप्नांना नवं बळ मिळू दे.

झगमगाते रहे, झिलमिलाते रहे अपने रास्ते
ये खुशी रहे, रोशनी रहे अपने वास्ते




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा