तुमचा खेळ होतो…
मुंबईत घर!!! प्रत्येक सामान्य, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय सर्वांसाठीच हे स्वप्नवत वाटावं असं विधान. जिथे नियमित पगार, हमखास उत्पन्न असणार्यांची बोबडी वळते, तिथे गरीबांना तर तसे स्वप्न बघण्याचीही परवानगी नाही…पण अचानकच गेल्या आठवड्यात त्यांना अंधुकशी आशा दिसली… स्वस्त घरासाठी आपल्या भागात फॉर्म वाटताहेत… ते भरायचे नि मंत्रालयापाशी जाऊन उभे रहायचे… फॉर्म घेणार, ५४००० भरायचे आणि पवईत आपल्याला घर मिळणार.. अशी सोनेरी स्वप्ने त्यांना पडू लागली. ज्यांनी त्यांना ही वाट दाखवली ते ही राजकारणातले माहीर… पण गरीबांचा नेता, हे बिरूद मिरवत असल्याने या बापड्यांचा विश्वास बसला आणि मंत्रालयाकडे मिळेल त्या वाहनाने, पदरमोड करून निघाले. मंत्रालयाबाहेर गर्दी उसळली… अशी कोणतीही योजना नाही, ही अफवा आहे, असे बोर्ड झळकले… पण आशा सरली नव्हती. दुसर्या दिवशीही तेच… एसी ऑफिसमध्ये बसून, एसी गाडीतून फिरणारी मंडळी गोरगरीबांना घराचे मृगजळ दाखवत होती आणि उन्हातान्हात ही मंडळी भविष्याची आशा लावून बसली होती. या लोंढ्याला आवरताना
दगडफेक झाली असती, चेंगराचेंगरी, अपघात यातील काही झालं असतं, तर ती जबाबदारी कोणी घेतली असती, घराच्या आशेपायी त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं असतं, तर ही एसी ऑफिसमधील मंडळी त्यांना आसरा देणार होती?
भले त्यांच्या म्हणण्यानुसार ही योजना असेलही… पण दोन ते अडीच दशकांपूर्वीच्या या योजनेची आजच का आठवण व्हावी? मला हे ही मान्य की जर योजना गरीबांसाठी असेल, तर त्यांना घरे मिळायलाच हवीत. मग या तथाकथित कैवार्यांनी एवढी वर्षे त्यासाठी पाठपुरावा का केला नाही? एवढी वर्षे या योजनेचा गरीबांना लाभ मिळावा म्हणून काहीच का झाले नाही... निवडणुकीपुरते गरीबांना आठवायचे, भुलवायचे हा खेळच झालाय ना… निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्या पदरात मतांचे दान पाडून घेण्यासाठीचे हे असले जीवघेणे खेळ… खेळ त्यांचा होतो, कदाचित या खेळातील ते मुरब्बी असल्याने त्याचा फायदाही होतो… पण जीव कोणाचा जातो?
…
कोलकात्यातील घटना… ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोनच आठवड्यापूर्वी एक प्रचंड सभा कोलकात्यात ठरली… साहजिकच लोकसभा निवडणुच्यि पार्श्वभूमीवर सभा, मोर्चांना तोटा नाहीच. न भूतो न भविष्यती अशी ही सभा घडवण्याचे दावे… त्यामुळे तळागाळापर्यंत सगळे ‘कामाला’ लागलेले… कुठून किती माणसं यायला हवी, याच्या बेरजा वजाबाक्या झालेल्या… माणसं कशी येणार यापेक्षा ती हजर व्हायला हवी हे नक्की… कोलकाता शहराला एक ऐतिहासिक महत्त्व असूनही आजही तेथील सिटी बस आणि वाहतूक व्यवस्थेचे चित्र विदारक आहे. अशाच स्थितीत गावागावातून माणसे बस, ट्रकमध्ये अक्षरशः ‘भरून’ आणली जात होती. हातभर पत्रा वाकलेल्या, मोठमोठ्या फटी, सगळीकडून खिळखिळ्या झालेल्या, गंजलेल्या अशा बसमधून चिकटवून माणसं आणल्यासारखे लोंढे कोलकात्यात धडकत होते. जाग मिळेल तिथे, टपावर, पायर्यांवर माणसं होती… कदाचित ती ममतांच्या प्रेमापोटी किंवा ममतांवरील विकतच्या प्रेमापोटी निघाली होती. पण त्या गाड्यांकडे बघूनच दचकायला होत होतं.. इतक्या धोकादायक बस, खच्चून भरून नेताना यातील एकाही बसमधील एकाही माणसाच्या जीवाचं काही बरंवाईट झालं असतं… तर ममता म्हणणार होत्या का, की ही मंडळी माझ्या रॅलीला आणायला सांगितली होती आणि ती जबाबदारी आमची आहे? पश्चिम बंगालमधील दारिद्र्य, लोकांचं किमान जीवनमान यामध्ये तसूभर फरक पडू शकला नाही… तिथे अशी जबाबदारी घेणे म्हणजे दूरची गोष्ट.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे शक्तीप्रदर्शन हा त्यांच्यासाठी खरंतर नित्याचा खेळ असेलही… पण जीव तर त्या ‘विकत’च्या लोकांचाच जाणार ना?
…
बिहारमधील पाटणा शहर… नितिशकुमारांच्या राजवटीमध्ये या शहराचा चेहरामोहरा खऱ्या अर्थाने बदलला… खरं तर बिहार बदलू लागलं, असं म्हणण्यातही वावगं नाही… याच शहरातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केल्याने त्याचा जामानिमाही तसाच. ठरल्याप्रमाणे सकाळी गर्दी जमू लागली. कुणी मोदींसाठी, कुणी भाजपसाठी, तर कुणी पैशासाठीही जमले… मोदी अवतरले आणि अनर्थ झाला. या सभेमध्ये बॉम्बस्फोट झाले… साहजिकच प्रसंगावधान दाखवून अधिकाधिक लोक सुरक्षित कसे राहतील, याचा सर्वसामान्य म्हणून विचार अपेक्षित होता. बुलेटप्रुफ सोयी आणि सुरक्षेची अभेद्य कडी व्हीआयपींना असतात हो… सामान्य माणसाला स्वतःच स्वतःचे रक्षण करायचे असते. अशा स्थितीत वेळेकाळेचे भान ठेवून मोदींनी सभा आटोपती घेऊन तिथल्या गर्दीच्या सुरक्षेचा विचार करून सभा आटोपती घेणं हा सारासार विचार होता. कदाचित त्यांच्या मानवतेच्या दृष्टीने लोकांकडून वेगळेच कौतुक झालेही असते. पण नाही!!! बॉम्बस्फोट झाल्यानंतरही काँग्रेस, राहुल गांधी, नितिशकुमार यांच्यावर टीका करणं हे सुरक्षेपेक्षा त्यांना महत्त्वाचे वाटले आणि त्यांनी सभेचे घोडे दामटले. बॉम्बस्फोटानंतर मोदींभोवती सुरक्षा कडे तयार झाले. मात्र लोक उघड्यावरच होते ना? राजकीय लाभासाठी, प्रतिष्ठेसाठी ते त्यांचा खेळ लोकांना धोक्यात टाकून खेळत राहिले… पण यात जीव कुणाचा टांगणीला लागला?
शेवटी काय… राजकीय, सामाजिक श्रेयाच्या लढाईत, तात्पुरत्या लाभासाठी, नजिकच्या यशासाठी असे खेळ सराईतासारखे खेळले जातात. …पण खेळ त्यांचा होतो… जीव मात्र तुमच्या आमच्यापैकी कुणाचा जातो… पण याची पर्वा कोण करतं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा