शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

शहाणपण

एरवी कितीही खरेदी होत असली तरी दिवाळीच्या खरेदीचा आनंद निराळाच मग ती उच्चवर्गीयांची रोषणाई, झगमगाट असो किंवा सामान्यांची पणतीखरेदी हे करतानाच आनंद ​मात्र सारखाच. दोन-तीन महिने दिवाळीसाठी पै पै साठवून, काटकसर करून कुटुंबाला आनंदी करण्याचा प्रयत्न ‘गरीबा’घरी नवा नाही. परवाची गोष्ट. सीएसटीच्या सबवेतील दुकाने, गाळे, फेरीवाल्यांचे बस्तान सारे काही दिवाळीनिमित्त फुलले आहे. एक अगदी गरीब कुटुंब. ज्यांचं पोट हातावरच आहे आणि कुटुंबातील नवरा बायको मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. त्या दोघांबरोबर त्यांची म्हातारी आई आणि दोन लेकी, एक मुलगाही​. सबवेतील तिसऱ्याच दुकानात ते थांबले. दोन लेकींची कपडेखरेदी सुरू झाली. घासाघीस टिपेला पोहोचली होती. दुकानदार दीडशेवर तर हा १२० रुपयांवर अडून बसलेला. त्यांच्याजागी तुम्ही आम्ही असतो तर कुठे २०-३० रुपयाकडे बघायचं, असं म्हणत १४० रुपयांमध्ये मांडवली केलीही असती आणि पुढे गेलो असतो. पण हा काही ऐकेना. खूप वेळ त्यांचा ‘व्यवहार’ सुरू होता. मी बाजूच्या बाटामध्ये जाऊन बाहेरही आले, तरी तोडगा नाहीच. दुकानदार वैतागून त्यांना म्हणाला, २०-३० रुपयासाठी किती रक्त आटवणार? हे वाक्य ऐकल्यावर त्या माणसाचाही धीर सुटला, पटकन म्हणाला या २०-३० रुपयांची किंमत फकस्त आम्हालाच ठाव हाय  तुमच्यासाठी ते किरकोळीत असत्यालही दोन लेकींना मिळून २५० रुपये ठरवलेले! ८००-हजार रुपयांत आम्हाला दिवाळी करायचीय आई, बायकोलाही खूश करायला हवं काही बाही घेऊन शिवाय तेल, पीठ, मीठ काय फुकटं मिळतयं दिवाळीला त्यांना खायला तर घालायला हवं हे ऐकल्यावर दुकानदारानेही १२० रुपयांत देऊन टाकले ड्रेस.
हा संवाद मी कुतुहलाने दुरून ऐकत होते मुलींसाठी एवढा विचार आणि मुलावर बघा कसा सहज पैसे खर्च करेल, हा ‘सर्वसाधारण’ विचार तेवढ्यात डोकावून गेला. त्यामुळेच त्याची शहानिशा करण्याच्या अंतस्थ हेतूने बोलायचं ठरवलं. कुटुंब, त्यांचा आनंद याची इतकी पर्वा करणाऱ्या या ‘श्रीमंत’ माणसाची वास्तव जाणीव पाहावीच, म्हणून त्यांना म्हटलं लेकींच्या खरेदीनंतर आता मुलासाठी घ्यायचं असेल ना काही. त्यावर तो लगेच म्हणाला, दोन लेकींवर थांबलो आम्ही. इथं खायचे प्यायचे वांदे आणि कुठं कुटुंबाचा पसारा वाढवायचा पोरगा, पोरगी आता सारखेच असतात की. त्या बी शिकतात आनि जास्त मायेनं करतात नंतर आईबापाचं कशाला पोरासाठी लांबण लावत रहायचं आई करत्ये भुणभूण पण तिला बी गप केलंय आता. हा बहिणीचा मुलगा आलाय सहज मामाकडं मी आनी माझी बायको दिवसभर काबाडकष्ट करतो पण मुलींना आनंदात ठेवण्यासाठी झटतो त्याच तर सगळं आमचं.. शाळंत बी जातात त्या लै शिकवणारे त्यांना
मी थक्क! त्याच्या डोळ्यातली, आपुलकी प्रेम, चमक सगळं एकाच वेळी जाणवलं. शिक्षणाचा, हुशारीचा, पांढरपेशी असण्याचा आणि मुख्य म्हणजे जगाला अक्कल​ शिकवण्याची ‘ताकद’ आल्याचा टेंभा एका मिनिटांत गळून पडला.  त्या दोन इयत्ता शिकलेल्या माणसाला जे कळंतय, जे तो पोटतिडकीने करू पाहतोय, तेवढी समज तुमच्या आमच्यापैकी अनेक शिकलेल्यांकडेही नाही, हे जाणवलं., स्वतःच आणि सो कॉल्ड व्हाइट कॉलर समाजाचं सुशिक्षितपणाचं विश्व अधिक उघडं पडल्याची जाणीव झाली. त्याच्या कुटुंबासाठी सुखाची प्रार्थना करत मी आपली चालती झाले

1 टिप्पणी: