दुपारी अडीच-तीनची वेळ. बातमीच्या कामानिमित्त एका रिमांड
होममध्ये गेले होते. तिथल्या अधिकाऱ्यांकडून नेमकी व्यवस्था समजून घेतली. मुले आल्यानंतर त्यांचं रूटीन, त्यांच्याबाबतची
निर्णयप्रक्रिया सारं जाणून घेत होते. काही मुलांशी गप्पा झाल्या. कुठल्याशा गुन्ह्यामुळे ही मुले येथे
पोहोचली होती. यापुढे त्यांचा मार्ग ‘सुधारण्या’ची जबाबदारी याच अधिकाऱ्यांची. नेमकी ही मुले इथे कशी आली, काय झालं त्यांच्या
आयुष्यात, कसं होतं त्यांचं जगणं आणि आता मनातला कल्लोळ काय आहे, हे सारं ऐकून सुन्न झाले होते. या तेथील ‘मित्रां’चा निरोप घेत बाहेर
पडले, माझ्या मनातील या मुलांच्या विचारांसह. तेवढ्यात एका पायरीवर गुडघ्यात डोके
खुपसून एक मुलगा बसलेला दिसला. १०-११ वर्षांचा असेल. इथल्या राहणीमानाला, शिस्तीला, जगण्याला सरावलेला
नव्हता. त्याचं नवखेपण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्याच्या बाजूला त्याच्या सारखीच
गुडघ्यात डोकं घालून बसले. काय झालं रे बाळा, तू असा एकटाच ‘मित्रां’पासून लांब का, माझा स्वाभाविक प्रश्न. त्यावर मला मित्रच नाहीत, मला कोणी त्यांच्यात घेतच नाही, अशी साधारण आईकडे शाळेत असताना वगैरे करू, अशी त्याची तक्रार. अर्थात त्याचं वयही आईकडे तक्रार
करण्याइतकच होतं. पण, ते जगणं त्याच्या वाट्याला आलं नव्हतं. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न
केला. पण, तो ढिम्म. उत्तरच देईना. आमच्यातला परकेपणा दूर करण्यासाठी माझ्याकडचा बिस्कीटचा पुडा, कॅडबरी असं त्याला दिलं आणि म्हटलं
चल मी तुझी ताई, मैत्रीण. आपण दोघं हे खाऊया. तो ही थोडा हुशारला. हात पुढे केला
आणि आमच्यातल्या संवादाला सुरुवात झाली. मला जाणून घ्यायचं
होतं तो कुठला, इथे का, इथपर्यंत कसा आला, आता शाळा आवडतेय का वगैरे. पण, माझ्या मनातलं प्रश्नांचं काहूर त्याला जाणवू न देता बोलतं
करणं महत्त्वाचं होतं. मग अगदी सहज गप्पांतून सुरुवात झाली आणि तो सांगत होता ते ऐकून हे, असं जगणं असतं? एवढंच वाटलं.
त्याला जेव्हापासून आठवतय तेव्हापासून
तो रस्त्यावरच राहिलेला. म्हणजे आधी झोपडी आणि आई त्याच्याबरोबर होती, पण एक दिवस आई अचानक कुठे गेली माहिती नाही. त्यापाठोपाठ झोपडीतून त्याची हकालपट्टी
करून कुणी दुसऱ्याने कब्जा केला आणि हा फुटपाथवर आला. येथे त्याच्याबरोबर कायम
येथेच राहणारे लोक, मुलं पाकिटमारीसारख्या गोष्टी करतच सर्रास पैसे कमवायचे. लहानपणापासून त्याने हेच पाहिलेलं. छोट्या मोठ्या पाकिटमारीसारख्या
चोऱ्या तो करू लागला. आधी पोलिसांचा मार खाऊन सुटला, कधी कुणी बदडून लहान म्हणून सोडून दिलं. पण, एकदा त्याने मोठी बॅग चोरली आणि त्यातून आधीच्या
गुन्ह्यांसह तो रिमांड होमपर्यंत पोहोचला. फुटपाथवरच्या मोकाट वातावरणातून
एकदम ‘छत्रा’खाली येणं, त्याच्या पचनीही पडलं नाही. त्यातच कुणाचं ऐकायचं, ठराविक गोष्टी, ठराविक वेळेत
करायच्या, हे असलं त्याला काही सवयीचच नव्हतं. त्यामुळे त्याची घुसमट झाली होती. इथे
आधीपासून असणारी मुले याला सरावली होती. पण, हा नवखा असल्याने अजून चार हात
लांबच होता. या सगळ्यात एकाच गोष्टीच अप्रुप होतं, की आता रोज पैसे
कमवायचे नाहीत, गाडीवर वडापाव, जेवण शोधत फिरायचं नाही, तरीही दोन वेळेला खायला मिळणार! आपण काहीतरी गुन्हा केलाय आणि त्याची
शिक्षा म्हणून इथवर आलोय, याचे गांभीर्य त्याला कळत नव्हते. त्याच्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट
म्हणजे त्याला आता रस्त्यावर झोपायचं नव्हतं!!! याच दोन गोष्टींचं कौतुक तो पुन्हा पुन्हा सांगत होता.
पण, तरीही इथली लोकं
काही करायला सांगतात, कसं वागायचं ते सारखं बजावतात, ते त्याला अजूनही पटलेलं नाही!! आजवर कुणासाठी तरी, कुणी सांगितलं म्हणून चोऱ्या करणाऱ्या त्याच्या हाताला आता ‘काम’च नव्हते. अनेकवेळा मार कसा
खाल्ला, पाकीट मारून, मोबाइल चोरून तो कसा पसार व्हायचा. त्याने चोरलेल्या गोष्टी अनेकदा कुणाला
द्याव्या लागायच्या, लोकल पकडणं, चालती गाडी सोडणं, उड्या मारणं, सगळं सगळं सांगत होता. कधी या सगळ्यातलं थ्रिल, कधी गरज, कधी नाइलाज असे सारे
भाव त्याच्या बोलण्याबरोबरच डोळ्यातूनही व्यक्त होत होते. सारे ऐकून त्याच्याशी
आणखी काही बोलण्याची, त्याला काही ‘सांगण्याची’ माझी परिस्थिती नव्हती.
एखाद्याला आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत
गोष्टी कोणत्या तरी मार्गाने पूर्ण होऊ शकतात, याचा इतका पराकोटीचा आनंद व्हावा? आयुष्याच्या दहा
वर्षांत त्याने जगण्याची इतकी वेगवेगळी रूपे पाहिली, अनुभवली की खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे
काय हे त्याला अनुभवायला मिळालेच नाही, त्यामुळे कळलेही नाही. चोरी हा गुन्हा असतो, तो करू नये, असं लहानपणापासून
त्याला शिकवलं गेलंच नाही. त्यामुळेच याची नेमकी कल्पना न मिळाल्याने तो गुन्हा करत
गेला.
बाहेर पडायला निघालेली मी पुन्हा
आत गेले. या छोट्या दोस्ताबाबत अधिकाऱ्यांशी बोलले. मोडलेल्या गोष्टी, तुटलेलं काही यातून
नवं करण्यात, ते पुन्हा जोडण्यात त्याला रस आहे, तासन तास त्यासाठी तो गुंतून रहातो, असं निरीक्षण
येथील अधिकाऱ्यांनी नोंदवलं होतं. त्याला टेक्निकल काही शिकवता येईल का, याची चाचपणी सुरू
होती. त्यांची ही ‘जोडण्या’ची आवड त्याला
आयुष्य नव्याने ‘जोडण्या’स उपयुक्त ठरू दे, असे मनोमन वाटले. या सगळ्यात त्याच्यादृष्टीने आज
एक चांगली गोष्ट घडत होती, ती म्हणजे तो तुलनेने लवकर रिमांड होमपर्यंत पोहोचला होता! आयुष्याकडे नव्याने बघण्याची संधी
त्याला मिळाली होती!
मी ज्या सुधारगृहात गेले, तिथली अवस्था, तिथे येणारी मुले, तेथील अनास्था हे
सगळं वास्तव पत्रकार म्हणून माहित आहेच. त्याच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल
होण्याचीही गरज आहे, हेही मान्य. तरीही आज येथील बच्चेकंपनी किमान गुन्हेगारीपासून दूर आहे, याच समाधान तेथून
बाहेर पडताना वाटत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा