शुक्रवार, १ मे, २०२०

आजींचे उबदार स्पर्श


मी नि आदिती पुन्हा एकदा आनंदनगरला गेलो. कोथरूडचं आनंदनगर नि आमच्या आठवणींचं माहेरघर. जवळपास १० वर्षांनी. आनंदनगरचे रस्ते, पार्किंग आणि पाच नंबरची बिल्डिंग, दोन नंबरचा फ्लॅट, आमची खोली, कपाट, व्हरांडा, बाग नि मनमुराद जगणं आम्ही पुन्हा ‘आमच्या’ खोलीत गेलो. भिंतींवरून हात फिरवला. खिडकीतून डोकावलं. कपाट, बेडचे स्पर्श. सगळं अगदी काल घडल्यासारखं डोळ्यासमोर होतं. पण तिथे नव्हत्या ते या सगळ्याचा अनुभव घेऊ देणाऱ्या आमच्या आजी. आमच्या पार्टनर इन क्राइम. भरभरून प्रेम करणाऱ्या, कमालीची काळजी करणाऱ्या, हक्काने ओरडणाऱ्या नि मायेने जवळ घेणाऱ्या आमच्या केळकर आजी. आयुष्य घडवणाऱ्या, बदलणाऱ्या आणि जगण्याकडे वेगळ्या नजरेतून बघायला शिकवणाऱ्या आठवणी या सगळ्याशीच नि मुख्यत: आजींशी जोडलेल्या आहेत आजही!

प्रत्येकाच्या आयुष्याचा मंतरलेला एक काळ असतो. माझ्या नि आदितीच्या आयुष्यातली तशी ती वर्ष. जगाला बेदखल करून भिडण्याची वृत्ती बाळगणारा तो बेभान काळ. पत्रकारिता करण्यासाठी रानडेमध्ये प्रवेश घेतला. मी अदिती परांजपे, नाशिक. अशी अत्यंत माजात तिने ओळख करून दिली आणि बस हिच्याशी मैत्रीच करायची म्हणून मी पण चंग बांधला. पाच-सात दिवसांत गप्पांपर्यंतही आलो असू. आदितीने मुक्कामाची ठिकाणं बदलत आनंदनगर गाठलं नि त्या पाठोपाठ मी ही. आनंदनगरच्या टू बीएचके फ्लॅटमधील एक खोली म्हणजे आमचं हक्काचं विश्व होतं. बाहेर रहायला गेलीस की घराची किंमत कळेल नि शिस्त लागेल, असा सर्वसाधारण विचार करत आईने पुण्याला पाठवलं होतं. पण झालं उलटचं. हातने कपडे नका ग धुवू मुलींनो, मशिन लावा. बोर्नव्हिटा दूध की काय घेताय? नाश्त्याला काय करू? जेवायला आहात ना? किती वेळ झोपलीये यामिनी, ऊठ आता. वेळेवर उठावं गं अशा हक्कानं सूचना करणाऱ्या नि सतत आमच्या दिमतीला असणाऱ्या आमच्या केळकर आजी इथे भेटल्या. आम्ही नावालाच पेइंग गेस्ट. नोकरीमुळे आईनेही केले नसतील इतके लाड नि कौतुकं आजींनी सांभाळली. आमच्या कॉलेजच्या, भटकण्याच्या, बागडण्याच्या, गप्पांच्या, नोकरीच्या, सिनेमा-नाटकाच्या, शॉपिंगच्या सगळ्या वेळा त्यांनी सांभाळल्या. हाताबाहेर जातोय वाटलं की रुसवा धरला. ओरडल्या. पण पुन्हा आमच्या गाडीवर बसून भटकंतीला तयार झाल्या. ‘एज इज जस्ट अ नंबर’ असं ज्यांना अचूक लागू झालं अशा आजी.

रात्रीचे १२ वाजले होते. पुण्यातील आनंदनगर सोसायटीच्या प्रवेशाचं मागचं गेट बंद करून सुरक्षारक्षक गाढ झोपलेला. बरं आम्ही तिघी गेटवर उभ्या नि पुढच्या गेटने जायचं तर मोठा वळसा. मी आणि आजी गेटवर उभ्या राहिलो आणि आदिती गेटवरून उडी मारून जाऊन चावी घेऊन आली. इतक्या रात्री दोन गाड्या घेऊन आम्ही तिघी ‘आयुष्यावर बोलू काही’ बघून अवतरलो होतोमाझं संदीप खरे नि कविता प्रेम पाहून खास माझ्यासाठी त्यांनी केलेला हा प्लॅन आम्हा तिघींचं मस्त जमलेलं त्रिकुट.. मी आदिती आणि आजी. नाटक, सिनेमा, हॉटेलिंग, भटकंती, खरेदी, गप्पा, शेअरिंग नि भेळ-पाणीपुरी कशाकशासाठीही आमच्या हक्काच्या पार्टनर होत्या.. केळकर आजी!
कासटचा साडीचा सेल लागलाय का बघ ग संध्याकाळी आल्यावर जाता-येता बघितला का बोर्ड हा पुन्हा प्रश्न दुसऱ्या दिवशी पुन्हा आठवण मग तिसऱ्या दिवशी मी आणि आजी सेलच्या पहिल्याच दिवशी दुकानात दाखल. क्रीम कलरची प्युअर सिल्कची साडी आणि दोन कॉटन साड्या घेऊन आम्ही बाहेर पडलो. चार दिवसांनी भेट देण्यासाठी पुन्हा कासट कासटचा मान्सून सेल नि आजींची खरेदी हे समीकरणच.
क्रीम, ऑफ व्हाइट, ग्रे हे आवडते रंग नि प्युअर सिल्क आणि प्युअर कॉटन हे आजींचं प्रेम. माझंही साडीप्रेम त्यांना माहित असल्यानं आमचं मस्त जमायचं. मी साडी नेसायची म्हटलं की अख्ख कपाट खुलं नि मनसोक्त निवड रंगायची. तुला हव्या त्या साड्या घेऊन जा गं तू नेसते ना.. कपाट भरलंय. मला काय करायच्यात इतक्या. आजींचं हे सतत सांगणं अगदी लग्न झाल्यावरही!

महिला पत्रकारांच्या अधिवेशनासाठी मी बेंगलोरला जाणार होते. दुपारी बाराच्या सुमारास गाडी होती. आजी सकाळीच उठल्या. बटाट्याची भाजी-पोळी सकाळसाठी, संध्याकाळसाठी मेथीचे पराठे, फोडणीची मिरची, दही-भाताची बुत्ती बरोबर, चिवडा, बस्किटे नि काय काय.. माझी प्रवासाची बॅग भरण्याआधी आजींचे सगळे डबे तयार होते. हे सगळं घेऊन जा.. ट्रनेमधलं खाऊ नको आणि पोचलीस की नक्की फोन करून कळव आजींचं जाईपर्यंत सूचना देणं सुरू होतं नि येईपर्यंत काळजी.

तुला ही भाजी आवडत नाही ना, मग दुसरी करते काही थांब दररोजच्या जेवणासाठी आजींचे खास पर्याय असायचे. आईनेही असले चोचले पुरवले नव्हते. पण आजी हौसेने करायच्या. आजींच्या हातची उकड, खाराची मिरची, उंदियो, पुरणपोळ्या नि काय काय आजी खरंच सुगरण होत्या नि हौसेने करायच्याही. मुलींनो बोर्नव्हिटा संपलाय.. आणा की मी आणू? अगं अजून दूधही घेतलं नाहीयेस रात्री आल्यावर ११ वाजता जेवणारेस ना आजींच्या सूचना नि काळजी सुरूच रहायची. एखाद दिवस अगदी ठरवून आज मी काही करणार नाहीये. मॅगी आणून खा. नाहीतर सरळ बाहेर खाऊन या हे ही त्या हक्काने सांगायच्या. खोलीतला माझ्या बेडवर असलेला कपड्यांचा ढिग मशिनला लावायच्या नि कपडे सुद्धा धुवत नाही ही यामिनी वेळेवर म्हणत आता वाळत टाक अशी सूचना वजा आज्ञा द्यायच्या. खोलीतला पसारा आवरा असं सांगून थकल्या की स्वत:च सगळी आवरसावर करायच्या.

हा प्रसंग तर आजही जसाच्या तसा आठवतो. मला अचानक मासिक पाळीचा भीषण त्रास सुरू झाला. रात्रीची वेळ होती. मी आणि आदिती अक्षरश: बसून होतो. काही वेळाने बाथरूममधून बाहेर येणेच अशक्य झाले. मध्यरात्रीची वेळ असल्याने काय करावे तेही सुचेना. आजी बाथरूमच्या बाहेर येरझाऱ्या घालत होत्या. अखेर न राहावून त्यांनी दोन वाजता आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डॉ. रोडेंना फोन केला नि काय करता येईल विचारले. अख्खी रात्र बसून काढली. पहाट झाल्यावर आईला फोन केला नि परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी औषध देऊन थोडा फरक पडला की मगच पाठवणार असं आईला बजावलं. उपचार सुरू केले नि थोडं बरं वाटतंय हे कळल्यावर मला घराबाहेर पडू दिलं. अख्खी रात्र अस्वस्थ होत आईच्या मायेनं काळजी करत जागत राहिल्या.

यामिनी तुझं वजन वाढायलाच हवं काय ती हाडं दिसताहेत. दिवसभर फिरायचं तर तब्येतीची साथ नको? हे बारीक वगैरे नाही चालणार गं.. खायचं प्यायचं वय तुमचं झोपा जरा कमी कर गं आणि खाणं, वाचन, पेटिंग आणखी कशात मन रमवावं असा सूचनांचा डोस देत आजीच काहीतरी पुढे करायच्या. हे पेटिंग जरा पूर्ण कर, या कापडावर डिझाइन काढून दे आणि रंग घेऊन ये, आपण हे विणूया का.. सतत उत्साहात राहण्याचा त्यांचा स्वभावच.

पत्रकारितेच्या कोर्समध्ये मी आणि आदिती उत्तम गुणांनी पास झालो नि आजींना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या लेकांना फोन करून दोघी मुली पास झाल्याची बातमी दिली. आमच्या घरी फोन केले. लगोलग दुकानात जाऊन आमच्यासाठी ड्रेसचे कापड घेऊन आल्या. दोन्ही मुलांना जेवणाचे आमंत्रण दिले आणि छानशा हॉटेलात जेवायला नेऊन आमचा कौतुकसोहळा झाला. आईबाबांना झाला असेल त्यापेक्षाही कितीतरी जास्त त्याच आनंदी होत्या. माझ्या घरात राहून मुलींनी चांगलं यश मिळवलं, याचंच केवढं समाधान होतं त्यांना. पत्रकार म्हणून नोकरी सुरू झाली नि आजींना कोण अभिमान वाटू लागला. येणाऱ्या प्रत्येकाला आमची ही मुलगी पत्रकार आहे. माझ्याकडे राहत असतानाच कोर्स केलाय तिने. खूप छान लिहिते. पेपर वाचत जा, नाव येतं तिचं वगैरे भरभरून कौतुकाने त्या सांगतच राहिल्या. न आवडणाऱ्या गोष्टी मुद्देसूद मांडत राहिल्या.

रानडे इन्टिट्यूटमध्ये असताना आम्हा चौघांचा ग्रुप होता. दोन मुले नि आम्ही दोघी. आनंदनगरचं पार्किंग, स्कुटीच्या फेऱ्या असे आम्ही भन्नाट भटकायचो. गाड्या यायच्या आधी पीएमटीचा पास काढून पुण्यात कुठूनही कुठेही जायचो. वर्षभर यथेच्छ टाइमपास केल्यावर परीक्षेचे दिवस दिसू लागले नि रट्टे मारायला सुरुवात झाली. आमच्या घरामागे असलेल्या बेंचवर बसून आमची लास्ट मिनिट तयारी, शोधाशोध सुरू होती. दोन मुलांबरोबर आम्ही बसलोय म्हणल्यावर सिक्युरिटी गार्ड नाराज झाला नि वादात पर्यवसन झाले. आजी पदर खोचून बाहेर आल्या आणि माझ्या मुलींना काही बोलायचं नाही असं निक्षून सांगून तुम्ही करा ग अभ्यास मी चहा देते करून म्हणत गार्डला हुसकावून गेल्याही. 

आमची मित्रमंडळी, गप्पा, कल्ला आनंदनगरच्या पार्किंगपासून ते आजींच्या घरापर्यंत सगळीकडे चालायचा. आजी आम्हा चौघांचा पाचव्या भिडू झाल्या होत्या. तुमच्या मित्रांचं काय चालंलय, असं त्या आवर्जून विचारायच्या. दोन पिढ्यांचं अंतर गळून पडत आम्ही मैत्रिणी झालो होतो. दुर्गाच्या कॉफीपासून ते सिनेमापर्यंत आणि क्रिकेटच्या मॅचपासून ते भरताकामापर्यंत असंख्य विषयांवर आमच्या गप्पा, देवाणघेवाण सुरू असायची. रविवारी मिळणाऱ्या पॅटिससाठी त्या रांगा लावायला सांगताना पक्क्या पुणेकर असायच्या. पण एरवी बोलताना दर चार वाक्यांनंतर त्यांच्या शिवाजी पार्कातील घराचा नि आठवणींचा उल्लेख यायचा. आजींच्या प्रत्येक नातेवाईकांसाठी आम्ही त्यांच्या घरातल्याच दोन मुली झालो होतो.

आजींच्या दोन गोष्टी खूप गंमतीदार होत्या. आजींना सकाळी फिरायला जायचा कंटाळा यायचा नि टीव्ही बघण्याचा स्टॅमिना कमालीचा होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिरायला जावे लागे. पण ते टाळण्यासाठी रोज इतकी कारणं शोधायच्या की आम्हालाच हसू यायचं. कधी उठून आवरलं नि कंटाळा आला, असे तर कधी पावसाने चिकचिक झालंय म्हणून.. टीव्ही म्हणजे दिवसदिवस न हलता त्या बघू शकायच्या नंतर चार दिवस रिमोट न बघता त्या काढायच्या. एक अजब रसायन होतं त्या.

आमच्यासारख्याच बाहेर राहणाऱ्या इतर मुलींचे अनुभव भीतीदायक होते. त्यामुळे आमच्यासाठी हे आयुष्य म्हणजे चैन होती. नातं जोडणं, आपलं मानणं, त्यासाठी जीव टाकून काही करणं, हे प्रत्येकाला जमत नाही. देतानाही हातचं राखून देतो. पण आजींनी त्यांच्या स्वभावाने, आपुलकीने असंख्य माणसं जोडली होती. रक्ताच्या नात्यापल्याडची. आम्ही त्यातल्याच एक. त्यांचं असं असणं आम्ही अनुभवलं म्हणून. एरवी आपण विश्वासही ठेवला नसता. परक्या शहरात अडनिड्या वयातील मुलींना आपलं म्हणत रहायला देणं, तेही आर्थिक गरज नसताना. हेच अविश्वसनीय. त्यातही इतकं निर्व्याज प्रेम आमच्या वाट्याला येणं, हा व्यक्त न करता येणारा अनुभव. आदितीने खूप काळ त्यांच्याबरोबर घालवला. मी जेमतेम तीन वर्षे होते. पण तीन वर्ष पुढची ३० वर्षे मी कसं जगावं, याचा मार्ग दाखवणारी ठरली. नोकरी ठीकच. पण बरोबर मी अभ्यास करावा, एमए करावं, वाचावं असा आग्रह धरणाऱ्या, परीक्षेचे टाइमटेबल लिहून घेणाऱ्या, माझ्या लग्नानंतर लोणच्यांपासून मसाल्यांपर्यंत सारं काही हौसेनं देणाऱ्या आणि हे तुझंच घरं आहे, कधीही ये असं हक्कानं सांगणाऱ्या आमच्या केळकर आजी.

आजी गेल्याचा निरोप आल्यानंतर आज चार-पाच वर्षांनीही त्यांचा नंबर डिलिट करू शकले नाही. परवा आनंदनगरला आम्ही खास आमच्या आठवणीतील आजींना शोधायला गेलो. मेघनाताईला किती कारनामे सांगितले. आजींचं आमच्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचंय, हे सतत सांगत होतो. त्या घरात, त्यांच्या स्वयंपाकघरात असलेल्या छोट्या छोट्या आठवणींतून आजी आम्हाला पुन्हा भेटल्या. तितक्याच आपुलकीनं, प्रेमानं नि आईच्या मायेनं. तुम्ही आहातच आजी. माझ्या आणि आदितीच्या मैत्रीत आणि आम्हाला दिलेल्या अविस्मरणीय क्षणांत!   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा