शनिवार, ११ जुलै, २०१५

क्षितिजापर्यंत… क्षितिजापल्याड


हिरव्यागार झाडांनी लपेटलेला डोंगर, अस्ताला निघालेला सूर्य, मावळतीच्या या सूर्याचे क्षितिजावर पसरलेले रंग आणि दूरवर डोंगर नि निळ्याशार आभाळाची विस्तीर्ण पसरलेली रेघ… अगदी लहानपणापासून मनात कोरलं गेललं, कागदावर चित्र, कविता, कल्पनाविस्ताराच्या माध्यमातून उतरवलेलं हे निसर्गरूप. डोंगर आणि आभाळाची किंवा निळ्याशार आकाशाची नि निळाईशीच स्पर्धा करणाऱ्या पाण्याची दूरवर होणारी भेट नेहमी कुतुहल वाढवणारीच ठरली. तिथपर्यंत आपण पोहोचायचंच नि हे मिलन याचि देही याचि डोळा पहायचं… असं अगदी लहानपणच्या वेड्या मनातील स्वप्न. पण, निसर्गाचं भरभरून दान मिळालेल्या काश्मीरच्या भूमीमध्ये पाऊल ठेवले नि बालपणीचं खोल मनात असलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात आल्याचा भास झाला. उंचच उंच पहाड, त्यावर आच्छादलेला बर्फ कोणता आणि आकाश कोणते असा संभ्रम निर्माण व्हावा, इतकं एकरूप झालेले आकाश… आपल्या स्वप्नातल्या ‘त्या’ दूरवर विस्तारलेल्या क्षितिजापर्यंत तर आपण आलोच आहोत. पण आता त्याही पलिकडे काही आहे… आणखी एक सुंदर जग खुणावतंय… असा नवा सुखद आभास मनात निर्माण झाला आणि क्षितिजापल्याडच्या या दुनियेमागे नव्याने मन धावू लागलं.

कडाक्याची थंडी, बोचरे वारे, हिमवर्षाव… हे श्रीनगर किंवा काश्मीरचं अगदीच ढोबळ वर्णन म्हणता येईल. पण, काश्मीरचे सौंदर्य वर्णायचं तर त्याबरोबरीने ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि अतिशय सुंदर मन असलेली सुरेख माणसे यांचाही उल्लेख करावा लागेल. रंग, गंध आणि सौंदर्याशी स्पर्धा करणारे फुलांचे ताटवे आणि शांत पाण्याचे तलाव तासनतास काठावर बसून राहण्यासाठी मोहात पाडतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विस्मरणात गेलेला आणि खर तर स्वतःमध्ये डोकावण्यासाठी हवा असलेला निवांतपणा अशा निश्चल पाण्याकाठी आणि सौंदर्याची उधळण करणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात मिळाला, तर यापेक्षा वेगळी पर्वणी ती काय?




काश्मीरमधील निसर्गाचं वैविध्य सतत चकीत करणारं…लोभस आणि खिळवून ठेवणारं! श्रीनगरकडून लेहच्या दिशेने जाताना त्याचा वारंवार प्रत्यय येतो. बर्फाच्या शिडकाव्याने होणारी प्रवासाची सुरुवात आणि त्यानंतर कुठे पांढरी, कुठे काळी-तपकीरी अशा दिसणाऱ्या छटा. पांढऱ्या शुभ्र खळाळत्या पाण्याचे प्रवाह प्रसन्न स्वागत करतात. जसंजसं लेहच्या दिशेने आपण चढू लागतो, तसतशी ऑक्सिजन परीक्षा पाहू लागतो. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या या ऑक्सिजनची नेमकी किंमत आपल्याला ​इथल्या मुक्कामात कळते. सभोवतालचे शुभ्र गालिचे खुणावू लागतात आणि थंडीनं चौफेर आक्रमण केलेलं असतं. या साऱ्याच बदलाशी जुळवून घेत निसर्गाचं रूप डोळ्यात साठवण्यात वेगळीच मजा आहे. इथला बर्फ म्हणजे तरी किती? डोंगरावरून खाली वाहत आलेलं पाणी जागच्या जागी थबकावं आणि गोठून जावं… त्यानंतर दिसणारं दृश्य केवळ विलोभनीय. कुठे खुरट्या हिरव्या झाडांनी मध्येच डोकं वर काढलेलं. रंगाच्या या नैसर्गिक छटा गमतीशीर वाटतात.



फटुला पास, जोजिला पास यासारखे थांबे उंचीच भान देत राहतात. चहूबाजूंनी बर्फानं लगडलेले पहाड संपतात नि अगदी बाजूलाच अक्राळविक्राळ रूप असणारे खडक अंगावर येतात. त्याच रूप ओबडधोबड, काहीसं भीतीदायक. त्यानंतर अगदी खास वलयांकित घडी उमटलेलं गुळगुळीत रूप समोर येतं नि निसर्गाच्या या वैविध्यपूर्ण आविष्काराची मजा वाटते.

वळणावळणाचा हा मार्ग आपण चढू लागतो. त्यानंतर कुठे रस्त्यावर येऊन पडलेले बर्फाचे ढीग वाट अडवतात, तर कुठे हिमवर्षाव थांबवतो, कुठे मोठा खडक रस्ता रोखून धरतो. त्यामुळेच विनासायास ही वाट कापायला मिळणं, ही देखील मोठीच गोष्ट. झंस्कार आणि सिंधू नदीचा संगम म्हणजेही लोभस दृश्य. या दोन नद्या एकमेकींशी एकरूप होताना आपला मूळ रंग, रूप सोडत नाहीत. त्यामुळे संगमानंतरही या दोन्ही नद्यांचे वेगळेपण जाणवत रहातेच. या नदीच्या थंडगार पाण्यात, त्याच्या लाटांवर स्वार होत सफर करणे म्हणे थ्रिलच.

वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृत, खास धाटणीची बौद्ध विहार, बैठ्या ठेवणीची घरे, तिबेटी लोकांचा वावर हा या लेह शहराचा तोंडवळा. या शहरातील मॉनेस्ट्री, शांती स्तूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उभारणीचे. लडाखच्या सफरीत लेहची भेट मध्यवर्ती. इथून पुढे जायचे नि इथे परतायचे हा सफरीचा शिरस्ता. त्यामुळेच नुब्रा व्हॅलीकडे जा किंवा पॅगाँगच्या अद्भुत निसर्गाकडे… फिरून लेहला येणे ठरलेले. त्यामुळेच दोन दिवसांत हे शहर आपले, ओळखीचे वाटू लागते ते अगदी तिथून निघाल्यानंतरही…


Nubra valley

नुब्रा व्हॅलेकडे जाणारा रस्ताही गोठवणाऱ्या थंडीचाच. हा मार्ग म्हणजे लडाख सफारीचा एक अवघड टप्पा. १८ हजार ३८० फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला पासवरून ही वाट जाते. बर्फवृष्टी आणि सभोवताली असलेल्या बर्फाच्या आच्छादनातून निघालेली चिंचोळी वाट, तीव्र वळणांचे रस्ते आणि निसर्गाचं आणखी एक रम्य रूप. कधी लांबच लांब वाहनांची रांग तर कधी दरडींनी अडवलेले रस्ते… असे नाना अडथळे पार करत जेव्हा ही वाट नुब्रा व्हॅलीकडे जाते तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. अगदी आपण राजस्थानात आहोत, असा भास व्हावा असे येथील वाळवंट. सभोवताली वाळूच वाळू आणि उंटाची सफारी. नुब्रा व्हॅलीतील मॉनेस्ट्री आणि तिथपर्यंत जाणारा रस्ता आपल्याला निसर्गाच्या प्रेमात पाडतो.

नुब्रा व्हॅलीप्रमाणेच निसर्गाचं आणखी एक रूप दिसतं ते पॅगाँगमध्ये. पॅगाँगकडे जाणारी वाट जितकी खडतर, तितकाच तेथील निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेला. निळेशार पाणी, त्याच निळ्या रंगाशी स्पर्धा करणारे आकाश आणि स्वच्छ किनारा. आकाशाच्या आणि सूर्यप्रकाशाच्या बदलणाऱ्या छटांनुसार बदलते रंग धारण करणारे पाणी मोहून टाकते. नुब्रा आणि पॅगाँग या दोन्ही दिशांना जायला मिळणार की नाही, हे येथील लहरी निसर्ग ठरवतो. लेहपासून या दोन्ही ठिकाणांना जोडणारा एकमेव पर्याय असल्याने अतिबर्फवृष्टी, दरडी यावर येथील रस्ता खुला आहे की नाही, हे ठरते. पण, निसर्गानं साथ दिली, तर स्वर्गसुख म्हणजे काय, याचे प्रत्यंतर नक्क येते.
Pangong view 1
 
Amazing Pangong
निसर्गाच्या वैविध्याचं, सौंदर्याचं जितकं आपल्याला अप्रुप वाटतं, तेवढंच आपण येथील लष्करासमोरही नतमस्तक होतो. निसर्गाची वेगवेगळी आक्रमणे, प्रतिकूल परिस्थिती यामध्येही टिकून राहण्याच्या त्यांच्या धैर्याला सलाम! लडाखमधील निसर्गाच्या सर्व रूपांशी हे जवान सतत तयार राहून दोन हात करतात. लोकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभे राहतात. येथील प्रत्येक अचणीत, परीक्षेत लष्कर हेच उत्तर. निसर्गाच्या प्रत्येक अडचणीत, लोकांच्या सुरक्षिततेत जवान तत्पर असतात. त्यामुळेच लष्करी जवानांबाबतचा आदर इथल्या भेटीनंतर शतपटीनं वाढतो. द्रासमधील वॉर मेमोरियल तर कारगील युद्धातील थरारक आठवणी जिवंत करते. त्यांचे शौर्य, परिस्थितीशी, शत्रूशी दोन हात करण्याची क्षमता, वेळप्रसंगी जिवाची बाजी लावण्याची तयारी, सगळंच रोमांचकारी आणि त्याबरोबरच हलवून टाकणारं. या मेमोरियलमधून बाहेर पडताना मनात एकाच वेळी वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ होतो. आपल्या जवानांना, त्यांच्या परिश्रमाला मनापासून सॅल्यूट!

लडाखमधील भ्रमंतीमध्ये सर्वात मोठी परीक्षा म्हणजे येथील प्रवास. निसर्गाच्या रौद्ररूपामुळे अजूनही अनेक भागांमध्ये रस्ते पोहोचलेले नाहीत. अनेक वाटा धोक्याच्या. अनेक ठिकाणी पोहोचणेही कठीण. अशा स्थितीत येथे रस्ते उभारणीचे कठीण काम बीआरओ आणि हिमांककडून केले जात आहे. रस्ते उभारणीचे आव्हान पेलताना लोकांना पावलोपावली जीवाचे मोल समजावून सांगणारे बोर्ड लावत सावध प्रवासाचा सल्ला देतात. या रस्त्यांवर वैद्यकीय सुविधा मात्र दुर्लभ. लष्कराच्या पोस्ट वगळता कितीतरी दूरपर्यंत फर्स्टएडही उपलब्ध नाही. त्यातच दरड कोसळली, हिमवर्षावाने वाट अडवली तर पेशंटच्या जिवावर बेतण्याचीच भीती अधिक. त्यामुळेच येथील प्रवास वैद्यकीय सोयींसह करणेच हिताचे ठरते.

प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होत असताना लडाखमधील लोकांसाठी रोजगाराच्या संधी मात्र अजूनही मर्यादितच आहेत. शेती, पारंपरिक पश्मिना शाली, कलाकुसर आणि पर्यटन एवढेच पर्याय येथे उपलब्ध दिसतात. त्यातही पर्यटन व्यवसाय चारच महिन्यांपुरता असल्याने तरुणांना आजही वेगळ्या वाटा आजमावण्याची संधीच नसल्याचे ​चित्र आहे.

काश्मिरी लोक आणि तिबेटी संस्कृतीचा प्रभाव असलेली लडाखमधील मंडळी यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये बरंच अंतर. दोन्ही माणसांच्या स्वभावामध्ये गोडवा असला, तरी त्यातील अंतर लख्ख जाणवंतच. लेहमधील निसर्ग, त्याचे वैविध्य यामध्येच एक अगत्यशीलता आहे. साहजिकच आठ महिने निसर्गाची परीक्षा दिल्यानंतर येणाऱ्या आल्हाददायी वातावरणात आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या येथील आर्थिक गणितांमुळे काश्मिरी लोकांच्या तुलनेत येथील मंडळींमध्ये अधिक मृदुता आहे. त्यांची अगत्यशीलता कृतीतून ओतप्रोत जाणवते. आपल्याला सुखावतेही.

सतत सुरक्षित, कम्फर्ट लेव्हल बघून, जीवाला अगदी जपून शहराच्या सुखसोयींमध्ये जगणारे आपण निसर्गाच्या कठोर-सुंदर रूपाचा अनुभव घेण्यास कचरतो, घाबरतो. ही परीक्षा निश्चित थोडी कठीण, पण तेवढीच आनंद देणारी, ओतप्रोत समाधान देणारी आणि खूप काही मनात साठवता येणारी असते. जून महिन्यामध्ये माझ्या पाच मैत्रिणींसह केलेली ही सफर त्यामुळेच वेगळी ठरली. पावलोपावली निसर्ग, हवामान परीक्षा पाहत असतानाही येथील सौंदर्य आम्हाला आणखी पुढे जाण्यास उद्युक्त करत राहिले. थंऽऽऽडी म्हणजे नेमके काय, हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले. बर्फ अंगावर झेलत उभे राहताना थंडीत विनातक्रार सज्ज राहणारे जवान दिसले नि स्वतःच्या चोचल्यांचा रागच येऊ लागला. आयुष्यात खूप काही देणारा, समृद्ध करणारा हा अनुभव. असंख्य पॅकेजची चाचपणी, एअरफेअरच्या गप्पा, आर्थिक गणिते, दोन महिने पुरून उरलेली चर्चा आणि त्यानंतर झालेली ही सफर. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, त्या काश्मीरचे देखणे, लोभस, थक्क करणारे आविष्कार याचि देही याचि डोळा पाहिले आणि मन समाधानाने काठोकाठ भरले.

निघताना येथील मंडळींना, लेहला आणि निसर्गाला मनापासून ‘झुले’ (नमस्कार) केला!!!






मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

काळोखावर करुनि स्वारी…



खाली उल्लेख केलेल्या घटना व व्यक्ती काल्पनिक आहेत. प्रत्यक्ष आयुष्यातील घटना व व्यक्ती यांच्याशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

…...

ही कहाणी किंवा कर्मकहाणी आहे तिची. ती आहे ओरिसातली. तिचं नाव काय ठेवूया? अभया? चालेल. पण तिच्या ओरिसात अभयाचा उच्चार अभाया असा होतो. अभायाच्या घरात अठराविश्व दारिद्र्य. वडील लहानपणीच गेलेले. घरात तिच्यापेक्षा वयाने लहान भावंडे. वयाच्या बाराव्या वर्षी, म्हणजे डोळ्यांतील लहानपण अजूनही लहान असतानाच्या वयात अभायाला तिची आई म्हणाली, आपल्या घरासाठी तू आता काही हातभार लावला पाहिजेस. कामाला लाग. मग सुरू झाली अभायाच्या कामाची तयारी. मग एक दिवस तिची आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथे तिच्या काही तपासण्या झाल्या. त्यानंतर अभाया घरी आली. आणखी दोन दिवसांनी आईने एक कागद तिच्या हातावर टेकवला आणि फर्मान सोडले ते एका पन्नाशीच्या गृहस्थाबरोबर जाण्याचे. आपल्या बापाच्याही वयापेक्षा अधिक वयाच्या या गृहस्थासोबत आपण कुठे जायचे? का जायचे? कशासाठी जायचे? आणि आईने हाती दिलेले कागद कसला?
 
प्रश्नांची लगड…
 
आणि त्यांची उत्तरेही.

 आईने हातावर ठेवलेला कागद तिच्या कौमार्याचा. म्हणजे ‘या मुलीला अद्याप कुणी हात लावलेला नाही’ याचा पुरावा. या पुराव्याच्या बळावर मग अभायाची त्या गृहस्थासोबत रवानगी. आठवड्यातून दोन-तीन वेळा. त्याच्या गरजेनुसार. मागणीनुसार. त्याची गरज काय? मागणी काय? अभायाचे शरीर.

त्यातून अभायाच्या हाती काय? तर, अबोध वयात मनावर उठलेले असंख्य ओरखडे. आपल्या शरीरावर आपला अधिकार नाही? हा सतावणारा प्रश्न आण‌ि डोळ्यांत दाटलेली अमाप वेदना. आण‌ि तिच्या आईच्या हाती काय? तर बरे पैसे. त्यातून कर्जाची परतफेड.

आई आपल्याबाबतीत नेमकं काय करतेय, हेच अभायाला कळत नव्हतं. डोक्यात भुंगा होता एका प्रश्नाचा… पण, आजवर समाजापासून, अगदी घरच्यांपासून जे शरीर संपूर्ण कपड्यांनी आईने झाकायला लावलं, ते पैसे मिळावे म्हणून की काय? आपल्याबाबतीत काहीतरी वाईट होतंय, त्याचा आपल्याला खूप त्रास होतोय, एवढंच तिला कळत होतं. याच काळात आई तिच्याकडून विणकाम, एम्ब्रॉयडरीची कामेही दिवसा करून घेई.

काही दिवसांनी तो पन्नाशीचा माणूस तिला नाकारू लागला. मग अभायाची रवानगी आईच्या फर्मानाने तीन दिवसांसाठी दुसर्या एकाकडे. तिथे सहा जणांकडून तिच्या शरीराची, मनाची ओरबाडणूक. 

तीन दिवसांनंतर अभाया घरी आली ती पूर्णपणे कोलमडलेल्या आणि विषण्ण मनाने. पण त्याचवेळी तिच्या डोक्यात चक्र सुरू होती ती या नरकातून सुटकेच्या प्रयत्नांची. आई पुन्हा एकदा आपला सौदा करणार, याची कुणकुण लागल्यानंतर अभायाने हिंमतीने घराचा उंबरठा स्वतःहून ओलांडला. पळण्याचा मार्ग पत्करला तिने. पण तिच्या दुर्दैवाने पाठ सोडली नाही. पुन्हा आणि कुणाच्या हाती लागली. तेच दुष्टचक्र वाट्याला. आधी इंदौर, मग अहमदाबाद असा शरीर ओरबाडून घेणारा प्रवास करत पोहोचली ती मुंबईत, एका सामाजिक संस्थेत.

 
इथे तिचे आयुष्य बदलले…

अर्थात ते काही सहज सोपे नव्हते. चार वर्षांत मनावर झालेले आघात, मनासोबत शरीराचे झालेले राक्षसी शोषण, आईबद्दलचा पराकोटीचा संपात, पुरुषांबद्दलची पराकोटीची दहशत. ही दहशत इतकी की संस्थेतला एखादा पुरुष आसपास जरी आला तरी ती थरथर कापायची. इथे असलेल्या मॅडम, ताईंनी ​तिची मानसिक ​स्थिती ओळखली. ती या संस्थेत पूर्णतः सुरक्षित असून आता तिच्या बाबतीत काहीच वाईट होणार नाही, याची सतत ग्वाही त्या देत राहिल्या. तिचं मन रमावं, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमात तिला सहभागी करून घेण्यात आलं. रिकामपण आणि त्याबरोबर विचारांचे चक्र सुरू राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. अशा अवस्थेत कौन्सिलर्सची मदत घेऊन तिची भीती दूर करण्याचा प्रयत्न झाला. तरीही तिचे मन रमेल, असं काही करण्याची आवश्यकता होतीच. हीच बाब हेरून तिला लहानपणी आईनेच शिकवलेलं एम्ब्रॉयडरी​ करण्याचं काम सफाईने जमतंय, हे लक्षात घेऊन ते सोपवण्यात आलं. त्यात तिचं हळूहळू रमू लागलं, उभारी घेऊ लागलं. संस्थेतल्या लोकांच्या जिव्हाळापूर्ण प्रयत्नांना यश येऊ लागलं. मुंबईत आत्मविश्वासाने वावरण्यासाठी, बोलण्यासाठी ती हिंदी शिकू लागली. हातातील कलाकुसरीचा वेग वाढवला. हेच काम आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. संस्था आणि तिच्या एकत्रित प्रयत्नांतून आधी छोट्या आणि हळूहळू मोठ्या ऑर्डर्स तिला मिळू लागल्या आणि त्यातून बरे पैसेही मिळू लागले.
 
काळाकुट्ट भूतकाळ मागे टाकून आज ती नव्या प्रकाशमय काळाच्या स्वागतासाठी उत्सुक  उभी आहे. तिच्या नावाला साजेल अशा निर्भयतेने…

…

इथे एक तळटीप सुरू होते…

वर उल्लेख केलेल्या सगळ्या घटना आणि त्यातील सगळ्या व्यक्ती अगदी खरोखरीच्या आहेत. प्रत्यक्ष आयुष्यातील काही घटना वा कुणी व्यक्ती यांच्याशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो योगायोग अजिबात समजू नये.
 

ही अभाया मला खरोखर भेटलेली.

परवा एका मैत्रिणीला भेटायला गेले. एमएसडब्लू केल्यानंतर ती गेल्या काही वर्षांपासून एका एनजीओमध्ये काम करतेय. सेक्स वर्कर म्हणून ट्रॅफिकिंग झालेल्या मुलींच्या पुनर्वसनाचे काम ही संस्था करते. तिच्या संस्थेत गेल्यावर नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळालेल्या अनेक मुली भेटतात. त्यांचे अनुभव जितके अंगावर काटा आणणारे, तितकेच समाजात काय चाललंय, हे वास्तव दाखवणारे. कुणाला या उद्योगात ढकललं असतं, कुणी कुठली कुठली सोनेरी स्वप्न घेऊन मायावीनगरीकडे आलेलं असतं. परिस्थिती वेगळी, पण त्यांच्याबाबतीत घडलेलं थोड्या फार फरकाने सारखंच.

मैत्रिणीचे अनुभव, तिचं काम अशा काही गप्पा सुरू असतानाच एक १७-१८ वर्षांची अतिशय देखणी, चुणचुणीत मुलगी आमच्या समोर आली. काही फाइल्स तिने समोर ठेवल्या, छानशी हसली आणि गेली. एक वेगळा आत्मविश्वास, वेगळी चमक तिच्या डोळ्यात होती. तिचं काम करून ती गेली आणि तिच्याबाबतीत काय झालं असेल, ही एवढी सुंदर मुलगी कुठली असेल, तिचे आईवडील कुठे असतील, आता ती काय करते, असे अनेक प्रश्न पिंगा घालू लागले. माझ्या मनातले हे प्रश्न सखीने ओळखले आणि म्हणाली आज हिच्याचबद्दल तुला सांगायचंय.

हीच ती अभाया…

मग मैत्रिणीने अभायाच्या आयुष्याचा पट माझ्यासमोर मांडला.  तिच्या आयुष्यात काही चांगलं घडल्याचा मलाच खूप आनंद झालाय आणि तो तुझ्याशी शेअर करायचाय, असं म्हणत तिने सारं सांगितलं. एखाद्या चित्रपटाची कथा असावी, किंवा त्यासाठी केलेला कल्पनाविस्तार वाटावा इतकं या मुलीने भोगलं होतं. पण, ते सारं मोठ्या हिंमतीने दूर ठेवून आज ती नव्याने उभी राहते आहे…

मैत्रिणीशी गप्पा झाल्यानंतर खास अभायाला भेटायला गेले. आजवरच्या आयुष्यात माझ्या आईने मला फसवंल, माझा वापर करत  ‘तिचा’ संसार उभा केला. हो तिचाच संसार… कारण यात मी कुठेच नव्हते गं… असेन तर फक्त पैसे देणारं मशीन एवढंच माझं स्थान… आईनेच जिथे माझा सौदा केला, तिथे बाकीच्यांना काय बोल लावायचे? पण, चार वर्षांनी का होईना, सावरायची संधी मिळाली. संस्थेतल्या प्रत्येक माणसाने मला जपलं… माझी काहीच चूक नसताना माझ्या भूतकाळात जे भोगलं, त्यासाठी मी स्वतःला का दोष देत कुढत मरायचं, हा विचार माझ्या मनात आला आणि सगळं दूर फेकलं. आता मला माझ्यासाठी जगायचंय… माझं शरीर ओरबाडलं तरी मनाने मी खंबीर आहे, स्वतःच नाव समाजात मानाने घेतलं जावं हा प्रयत्न आहे… अभाया सांगत राहिली… तिच्या हिंमतीचं खूप कौतुक वाटलं. आयुष्यातल्या नाजूक अशा चार वर्षांत ब्रह्मांड दिसल्यानंतरही तिने हिंमत हरली नाही. समाजातील ओरबाडण्याच्या प्रवृत्तीवर थुंकत ती पुन्हा उभी राहिलीये… स्वतःला सिद्ध केलंय… बायकांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघण्याच्या, वापरा आणि फेका म्हणून समजण्याच्या वृत्तीला अभायाने खणखणीत उत्तर दिलंय… तिच्यासारख्या अनेक मुली आज आधाराअभावी किंवा योग्य आसरा न मिळाल्याने या दलदलीत रूतलेल्या आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी, नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अनेक संस्थांच्या पातळीवर हे प्रयत्न होत असले तरी फसवले गेलेल्या मुली आणि त्यांना मिळणारी मदत याचे प्रमाण आजही व्यस्तच आहे. या मुलींना त्यांच्या हक्काचं जगणं जगता यावं यासाठी सरकार, संस्था आणि समाज म्हणून आपण एकत्र येऊन ठोस प्रयत्न करायला हवेत, असं तिला भेटून निघताना वाटत राहिलं…

सोमवार, २३ मार्च, २०१५

जगणं तिला कळले हो…


वय वर्ष १६ ते १८… या वयात आपण काय करतो? शाळा, कॉलेजचं रूटीन. आपल्याला काय हवं, याची आईवडिलांसमोर यादी ठेवायची. क्लास, अॅक्टिव्हिटीज यात जगाचा विसर पडू देत भन्नाट, बेबंद जगायचं. त्या वयाची नशाच वेगळी. पण, असं मुक्त स्वच्छंद जगण्याचा, भान हरपायला लावणाऱ्या वयाचा अनुभव घेण्याचा आनंद प्रत्येकालाच मिळतो, असे नाही. काही मुले याच वयात स्वतःबरोबर कुटुंब, आपला समाज, त्यांचे कल्याण असे प्रचंड बोजड (आपल्यासाठी बोजडच) विचार करतात. नुसतेच विचार नाही, तर कृतीही करतात. इतक्या लहान वयात हे भान येतं कुठुन?

परवा ‘तिचा’ फोन आला. हॅलो, ताई ओळखलंस का गं? सांग मी कोन बोलतेय ते… आवाज अगदी ओळखीचा, लक्षात राहिलेला वाटला.. पण नावच डोळ्यासमोर येईना… अग ताई आपण एकदाच भेटलो, पण माझ्या लक्षात आहेस तू… तू मात्र विसरलीस? खट्टू होत तिने असं म्हटल्यावर मला अधिकच ओशाळल्यासारखं वाटू लागलं… त्याचक्षणी लख्खकन आठवलं.. अरे हीच ती. पुरस्कार वगैरे मिळवलेली. प्रचंड आत्मविश्वास बाळगणारी आणि सतत जगाशी दोन हात करण्यासाठी सरसावलेली.. तीच शेवंता. एकदाच भेटलेले तिला. पण जादू केली या पोरीनं. तिला मिळालेला पुरस्कार घेण्यासाठी ती मुंबईत आली आणि पत्रकार म्हणून मी तिला भेटले. तशा आणखीही लढवय्या होत्याच. पण, माहीत नाही, शेवंता अगदी मनाला भिडलेली. तिला मी माझं कार्ड दिलं आणि मुंबईत कधी आलीस, किंवा केव्हाही कसलीही मदत लागली तरी हक्कानं फोन कर, असं आवर्जून सांगितलेलं. त्यामुळे मला वाटलं नेमकी काय अडचण असेल? माझे विचार सुरू असतानाच तिनं थांबवलं नी म्हणाली. ताई, सहज फोन केला. आठवण आली तुझी. काही सांगावं वाटलं तुला… पुढेही ती बोलत राहिली. पण, मी मात्र आमच्या त्या मला थक्क केलेल्या भेटीत पोहोचले होते.

लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये असलेल्या फरतपूर तांड्यांवर राहणारी शेवंता राठोड. आई-वडील ऊसतोडणी कामगार. त्यामुळे सहा महिने विंचवाचं बिऱ्हाड. उरलेले दिवस रस्त्यावर डांबर ओतण्याचं काम. हरभरा, तुरीच्या शेतातली कामं, असं करत गुजराण करणारं तिचं कुटुंब. त्यातच वडलांनी साडेसात लाख रुपये खर्च करून एका ‘शिक्षका’शी बहिणीचं लग्न करून दिल्यानं घरावर कर्जाचा डोंगर. त्याही आधी सख्ख्या आत्यानं ब​हिणीसाठी न पेलवणारा हुंडा मागितल्यानं वडील पुरते कोलमडलेले. मुलींच्या लग्नाच्या चिंतेनं त्यांना दिवसरात्र पोखरलेलं. अशा स्थितीतच हुंड्याच्या हंड्या देऊन वडिलांनी तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न केले. समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात जागृत करण्याचे बाळकडून देण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकाशी तिचं लग्न झाले. शेवंतासाठी हा पहिला धक्का होता. ज्यानं हे थांबवायला हवं, तोच हात पसरून उभा आहे, हे तिच्या मनाला लागलेलं. आत्याचं घर तर तिनं टाकलंच होतं. पण, या कर्जाच्या ओझ्यानं खचलेल्या वडिलांना हात द्यायलाच हवा, हा विचार त्या बालवयातही तिच्या मनानं घेतला आणि दिवसरात्रीचं भान न बाळगता ती त्यांच्या बरोबरीनं मेहनतीची कामं करू लागली. गुरं राखणं, खुरपणी, शेताला पाणी देणं ही कामं करू लागली. माणसं, प्राणी, जनावरं, दिवस, रात्र.. कशाचंच भय तिला उरलं नव्हतं. हे सगळं करताना शाळेच्या दिनक्रमात तिनं कधी अडथळा येऊ दिला नाही. हाती असलेला पैसा पाहून कधी एसटीनं, कधी चालत जात १५ किमीवर असलेल्या शाळेतून आपलं शिक्षण सुरू ठेवलं. बोचरी थंडी, कडाक्याचं ऊन याची पर्वा न करता इतक्या लहान वयात तिचे हात राबत राहिले.

या वाटेतील अडथळा म्हणजे चौदाव्या वर्षी तिचं लग्न करण्याचा घातलेला घाट. पण, त्याक्षणी तिनं वडिलांशी भांडण केलं. बघायला आलेल्या मुलाला दोन शब्द सुनावून वाटेला लावले. मोठ्या हिंमतीनं तिनं आपलं लग्न थांबवलं. गावातील आणखीही चार-पाच बालविवाह रोखले. यासाठी हिंमतवाल्या मैत्रिणींची टोळीच जमवली. कुणाचं शिक्षण थांबवलं जातंय, कुणाला मारहाण होतेय, कुणाला सक्तीने बोहल्यावर उभं केलं जातंय, कुणाकडे वाकवणारा हुंडा मागितला जातोय… सगळ्या अडचणींवेळी ही टोळी​ हजर होते. मुलासाठी अट्टहास करणाऱ्या समाजातील या मुली म्हणजे त्यांच्या आईवडलांना त्यांची ताकद वाटावी, इतका बदल या मैत्रिणींनी घडवून आणलाय. दहावीत शिकणाऱ्या शेवंतानं गावात मुलींचा बचतगट सुरू केलाय. त्यातून मुलींना त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकीन गावात स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा तिचा प्रयत्न आहे. पुढची पिढी व्यसनमुक्त असावी, त्यांचं आयुष्य असंच रगडलं जाऊ नये, असले विचारही या मुली करताहेत. आमच्या तांड्यावर एकही पानपट्टी नाही, हे सांगताना अभिमान तिच्या डोळ्यात चमकला होता. ताई रडत बसणं, हार मानणं मला पटतच नाही. सरळ जाऊन भिडायचं, द्यायची टक्कर असं बोलताना तो आवेशही तिच्यात संचारला होता…

शेवंताच्या एका फोननं मला हे सगळं पुन्हा आठवायला लावलं.  पुन्हा कुणाचा तरी बालविवाह तिनं थांबवला होता. कुणाच्या शिक्षणातील अडथळा दूर केलेला. सगळं भरभरून बोलत होती. हे सांगतानाच ताई बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्जही फिटत आलंय गं… त्यामुळे बाबा खूष असतात, हे सांगताना ती हळवी झाली होती. पण काही क्षणच… छान वाटलं तुझ्याशी बोलून. करेन पुन्हा फोन असं म्हणत, तिनं फोन कटही केला. पण… खरं तर मलाच तुझ्याशी बोलून मस्त वाटतंय.. बळ मिळंतय… वगैरे… जे मला सांगायचं होतं, ते सांगण्याइतकं भानच मला उरलं नव्हतं.

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०१५

अन्न, वस्त्र, निवारा…



दुपारी अडीच-तीनची वेळ. बातमीच्या कामानिमित्त एका रिमांड होममध्ये गेले होते. तिथल्या अधिकाऱ्यांकडून नेमकी व्यवस्था समजून घेतली. मुले आल्यानंतर त्यांचं रूटीन, त्यांच्याबाबतची निर्णयप्रक्रिया सारं जाणून घेत होते. काही मुलांशी गप्पा झाल्या. कुठल्याशा गुन्ह्यामुळे ही मुले येथे पोहोचली होती. यापुढे त्यांचा मार्ग ‘सुधारण्या’ची जबाबदारी याच अधिकाऱ्यांची. नेमकी ही मुले इथे कशी आली, काय झालं त्यांच्या आयुष्यात, कसं होतं त्यांचं जगणं आणि आता मनातला कल्लोळ काय आहे, हे सारं ऐकून सुन्न झाले होते. या तेथील ‘मित्रां’चा निरोप घेत बाहेर पडले, माझ्या मनातील या मुलांच्या विचारांसह. तेवढ्यात एका पायरीवर गुडघ्यात डोके खुपसून एक मुलगा बसलेला दिसला. १०-११ वर्षांचा असेल. इथल्या राहणीमानाला, शिस्तीला, जगण्याला सरावलेला नव्हता. त्याचं नवखेपण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्याच्या बाजूला त्याच्या सारखीच गुडघ्यात डोकं घालून बसले. काय झालं रे बाळा, तू असा एकटाच ‘मित्रां’पासून लांब का, माझा स्वाभाविक प्रश्न. त्यावर मला मित्रच नाहीत, मला कोणी त्यांच्यात घेतच नाही, अशी साधारण आईकडे शाळेत असताना वगैरे करू, अशी त्याची तक्रार. अर्थात त्याचं वयही आईकडे तक्रार करण्याइतकच होतं. पण, ते जगणं त्याच्या वाट्याला आलं नव्हतं. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, तो ढिम्म. उत्तरच देईना. आमच्यातला परकेपणा दूर करण्यासाठी माझ्याकडचा बिस्कीटचा पुडा, कॅडबरी असं त्याला दिलं आणि म्हटलं चल मी तुझी ताई, मैत्रीण. आपण दोघं हे खाऊया. तो ही थोडा हुशारला. हात पुढे केला आणि आमच्यातल्या संवादाला सुरुवात झाली. मला जाणून घ्यायचं होतं तो कुठला, इथे का, इथपर्यंत कसा आला, आता शाळा आवडतेय का वगैरे. पण, माझ्या मनातलं प्रश्नांचं काहूर त्याला जाणवू न देता बोलतं करणं महत्त्वाचं होतं. मग अगदी सहज गप्पांतून सुरुवात झाली आणि तो सांगत होता ते ऐकून हे, असं जगणं असतं? एवढंच वाटलं.
त्याला जेव्हापासून आठवतय तेव्हापासून तो रस्त्यावरच राहिलेला. म्हणजे आधी झोपडी आणि आई त्याच्याबरोबर होती, पण एक दिवस आई अचानक कुठे गेली माहिती नाही. त्यापाठोपाठ झोपडीतून त्याची हकालपट्टी करून कुणी दुसऱ्याने कब्जा केला आणि हा फुटपाथवर आला. येथे त्याच्याबरोबर कायम येथेच राहणारे लोक, मुलं पाकिटमारीसारख्या गोष्टी करतच सर्रास पैसे कमवायचे. लहानपणापासून त्याने हेच पाहिलेलं. छोट्या मोठ्या पाकिटमारीसारख्या चोऱ्या तो करू लागला. आधी पोलिसांचा मार खाऊन सुटला, कधी कुणी बदडून लहान म्हणून सोडून दिलं. पण, एकदा त्याने मोठी बॅग चोरली आणि त्यातून आधीच्या गुन्ह्यांसह तो रिमांड होमपर्यंत पोहोचला. फुटपाथवरच्या मोकाट वातावरणातून एकदम ‘छत्रा’खाली येणं, त्याच्या पचनीही पडलं नाही. त्यातच कुणाचं ऐकायचं, ठराविक गोष्टी, ठराविक वेळेत करायच्या, हे असलं त्याला काही सवयीचच नव्हतं. त्यामुळे त्याची घुसमट झाली होती. इथे आधीपासून असणारी मुले याला सरावली होती. पण, हा नवखा असल्याने अजून चार हात लांबच होता. या सगळ्यात एकाच गोष्टीच अप्रुप होतं, की आता रोज पैसे कमवायचे नाहीत, गाडीवर वडापाव, जेवण शोधत फिरायचं नाही, तरीही दोन वेळेला खायला मिळणार! आपण काहीतरी गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा म्हणून इथवर आलोय, याचे गांभीर्य त्याला कळत नव्हते. त्याच्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला आता रस्त्यावर झोपायचं नव्हतं!!! याच दोन गोष्टींचं कौतुक तो पुन्हा पुन्हा सांगत होता. पण, तरीही इथली लोकं काही करायला सांगतात, कसं वागायचं ते सारखं बजावतात, ते त्याला अजूनही पटलेलं नाही!! आजवर कुणासाठी तरी, कुणी सांगितलं म्हणून चोऱ्या करणाऱ्या त्याच्या हाताला आता ‘काम’च नव्हते. अनेकवेळा मार कसा खाल्ला, पाकीट मारून, मोबाइल चोरून तो कसा पसार व्हायचा. त्याने चोरलेल्या गोष्टी अनेकदा कुणाला द्याव्या लागायच्या, लोकल पकडणं, चालती गाडी सोडणं, उड्या मारणं, सगळं सगळं सांगत होता. कधी या सगळ्यातलं थ्रिल, कधी गरज, कधी नाइलाज असे सारे भाव त्याच्या बोलण्याबरोबरच डोळ्यातूनही व्यक्त होत होते. सारे ऐकून त्याच्याशी आणखी काही बोलण्याची, त्याला काही ‘सांगण्याची’ माझी परिस्थिती नव्हती.
एखाद्याला आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी कोणत्या तरी मार्गाने पूर्ण होऊ शकतात, याचा इतका पराकोटीचा आनंद व्हावा? आयुष्याच्या दहा वर्षांत त्याने जगण्याची इतकी वेगवेगळी रूपे पाहिली, अनुभवली की खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे काय हे त्याला अनुभवायला मिळालेच नाही, त्यामुळे कळलेही नाही. चोरी हा गुन्हा असतो, तो करू नये, असं लहानपणापासून त्याला शिकवलं गेलंच नाही. त्यामुळेच याची नेमकी कल्पना न मिळाल्याने तो गुन्हा करत गेला.
बाहेर पडायला निघालेली मी पुन्हा आत गेले. या छोट्या दोस्ताबाबत अधिकाऱ्यांशी बोलले. मोडलेल्या गोष्टी, तुटलेलं काही यातून नवं करण्यात, ते पुन्हा जोडण्यात त्याला रस आहे, तासन तास त्यासाठी तो गुंतून रहातो, असं निरीक्षण येथील अधिकाऱ्यांनी नोंदवलं होतं. त्याला टेक्निकल काही शिकवता येईल का, याची चाचपणी सुरू होती. त्यांची ही ‘जोडण्या’ची आवड त्याला आयुष्य नव्याने ‘जोडण्या’स उपयुक्त ठरू दे, असे मनोमन वाटले. या सगळ्यात त्याच्यादृष्टीने आज एक चांगली गोष्ट घडत होती, ती म्हणजे तो तुलनेने लवकर रिमांड होमपर्यंत पोहोचला होता! आयुष्याकडे नव्याने बघण्याची संधी त्याला मिळाली होती!
मी ज्या सुधारगृहात गेले, तिथली अवस्था, तिथे येणारी मुले, तेथील अनास्था हे सगळं वास्तव पत्रकार म्हणून माहित आहेच. त्याच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल होण्याचीही गरज आहे, हेही मान्य. तरीही आज येथील बच्चेकंपनी किमान गुन्हेगारीपासून दूर आहे, याच समाधान तेथून बाहेर पडताना वाटत होते.

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

यहाँ के हम सिकंदर

समुद्राच्या लाटांची गाज मनात एक वेगळीच लय निर्माण करते. त्या लयीचा, लाटेने निर्माण होणाऱ्या खळबळीचा, किनाऱ्यावर निवांतपणे विसावण्याचा एक वेगळाच सिलसिला असतो. आधीची खळबळ आणि त्यानंतर येणारं विसावलेपण हा अनुभवच वेगळा…

नदी मूळातच शांत, संयत प्रवृत्तीची… तिचा प्रवाहही असाच निर्मळ.. खळबळ तिचा स्थायीभावच नाही… पण तरीही अडकून रहायचं नाही, साचलेपण येऊ द्यायचं नाही… प्रवाहीपण सोडायचं नाही, हा तिचा नेम.

निसर्गातील या दोन वाहिन्या मानवी स्वभावाच्या अगदी जवळ जाणाऱ्या. नेमकं कस असावं, याच उदाहरण देणाऱ्या… खरं तर हे सारं तात्विक, जीवनाचं सार वगैरे कुठुन आलं अचानक असं माझं मलाच वाटून गेलं. पण, देनवा नदीच्या शुभ्र, स्वच्छ खळाळत्या पाण्याने थोडंस अंतर्मुख केलं आणि रोज भेटणारा समुद्र आणि देनवा मनात घर करून राहिले. ही देनवा नदी भेटली ती निसर्गाचा असाच अद्भुत अविष्कार असलेल्या जंगलाच्या सफारीवेळी एक स्वतंत्र, न्यारी आणि विलोभनीय दुनिया.

सुंदरबन, ताडोबाची सैर केल्यानंतर निसर्गाच्या या रूपाकडे बघण्याची एक दृष्टी मिळावी. त्यामुळेच सातपुडा जंगल, तिथला निसर्ग, प्राणी, पक्षी यांना न्याहाळताना यावेळी केवळ भारावलेपण नव्हतं. मनात अनेक विचार, आपल्या रोजच्या आयुष्याशी असणारं येथील जीवनमानाचं जोडलेपण, असं बरंच काही मनात आलं.

येथे मुक्त विहार करताना भेटणारे अनेक प्रकारचे पक्षी, त्यांची लोभस रूपे, त्यांचा मुक्त विहार, त्यांचे स्वातंत्र्य याचा प्रत्येकाला हेवा वाटावा. जंगलातील झाडांचे वैविध्य, त्यांची प्राण्यापक्षांशी जोडली गेलेली नाळ, आभाळाकडे झोपावतानाही जमिनीत पाय घट्ट रोवून उभे असलेले वृक्ष, नुकताच पावसाळा संपल्याने चौफेर असलेली हिरवाई… हे सारंच आल्हाददायक. मनाला ‘हिरवं’, ‘ताजतवान’ करणारं.

सातपुडा जंगलाकडे जाणारी वाट ही देनवा नदीतील. या नदीत पहाटे सूर्योदयाच्यावेळी पाण्यात पडणाऱ्या तांबूस रंगाच्या किरणांचे प्रतिबिंब. लालसर तेजानं व्यापलेलं आकाश. दूरवर नदीचे पाणी आणि आकाशाची भेट होत असल्याचा आभास, सारं मनात घर करून राहतं. या पाण्यातून जाणारी वाट जंगलाबाबतचे औत्स्युक्य वाढते. जंगलात प्रवेश करताना, स्वागत करणारी हसरी कमळे, मोर, हरणांचे ताफे त्यांच्या साम्राज्याची झलक दाखवतात. या सफारीचे कुतुहल वाढवतात.

वाघाला जंगलाचा राजा का म्हणतात? त्याचे दर्शन अद्भुत का? ‘टायगर लक’ खरंच असावं लागतं? या साऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याची एक झलक दिसली तरी आपोआप मिळते. त्याचा रूबाब, त्याचा वेग, त्याचे राजेपण आणि त्याची शान… विलोभनीय! सातपुड्याला पहिल्याच सफारीच्या सुरुवातील अशी रूबाबदार सलामी मिळाली आणि राजेपणाचं दर्शन घडलं. जंगलातून रूबाबात येणारा आणि समोरच्याला खिजगण​तीतही न धरता आल्याचे ऐटीत निघून जाणारा वाघ पाहिला आणि सातपुड्याला येणं सार्थकी लागलं. आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट अनपेक्षितपणे मिळाली की जो आनंद होतो, तोच आनंद व्याघ्रदर्शनानेही मिळतो.

जंगल सफारीतील अनुभव, तिथलं जीवनमान याचा विचार केला तर ही सफारी आपल्याला निर्व्याज आनंद म्हणजे काय, प्रयत्नाने आणि पुरेशा प्रतीक्षेने एखादी गोष्ट मिळवण्यातलं समाधान काय आणि सगळ्यात महत्त्वाचं न मिळालेल्या गोष्टीने न हिरमुसता प्रयत्नातील आनंद अनुभवायला शिकवते. नव्याने शोध घेण्याची उर्मी कायम राखण्याचे धडे देते.

जंगलातील प्राणी धोक्याचा इशारा म्हणून देत असलेले ‘कॉल’ ऐकत जंगल प्रदक्षिणा झाली. जंगजंग पछाडलं. तेव्हा कुठे दूरवर झाडाखाली ‘बिबळ्या’च रूप दिसलं. तेही दुर्बिणीतून! म्हणजे तुम्ही आलात आणि आम्ही तुमचे स्वागत करायला सलामी देतो, असे शहरातल्या वातावरणात होत असलं, तरी नेहमी असं घडणार नाही. इथे आमचे नियमच चालतात. याची जाणीव त्यांनी करून दिली.

रोजचा कामाचा व्याप, घड्याळाच्या काट्यावर बांधलेलं आयुष्य यातून काढलेली फुरसत आल्हाददायीही हवी आणि काही मिळवल्याचा आनंद देणारीही. सातपुड्यात निसर्गाच्या चौफेर वेळ्यात मिळालेला निवांत विसावा, सूर्योदय-सूर्यास्त बघण्याचं भाग्य आणि जंगलदर्शन… सारंच प्रफुल्लित करणारं. संध्याकाळच्या वेळी हातात निवांत कॉफीचा कप, समोर वाहणारं नदीचं पाणी, सुखद गारवा, ‘प्रदूषण’ नसलेली हवा, हे सुख तरी कुठे असतं रोजच्या आयुष्यात? स्वतःसाठी काढलेला हा वेळ त्यामुळेच वेगळा ठरला. नवे मित्रमैत्रिणी, जुन्यांचा सहवास, त्यांचे अनुभव, मजा, थट्टा-मस्करी वातावरणं हलकफुलकं करणारे. तर जुन्या आठवणी नव्याने जगण्याची संधी देणारा मैत्रिणीचा सहवासही तितकाच आपलेपणाचा!

पक्षांचे प्रकार, त्यांचे बारकावे, रंग, रूप, वैशिष्ट्य यांची अचूक माहिती असणारे आणि ती देण्याची तयारी असणारे ‘साथी’ मिळणंही भारी. एखादा पक्षी दिसेपर्यंत थांबायचे, तो प्रत्येकाला दिसावा म्हणून अट्टहास ठेवायचा, त्याला न्याहाळायचे आणि निघायचे हे सारे वेगळा अनुभव देणारे. त्यामुळेच पक्षी आणि त्यांची ओळखही आनंददायी ठरली, ती त्यासाठी झपाटलेपण असलेल्या मंडळींमुळे!

रात्रीच्यावेळी जंगल कसं दिसतं? काय हालचाल असते? घनदाट झाडीत जंगल दिसतं? या साऱ्या प्रश्नांची एकल करणारी सैरही अनुभवायला मिळाली. रोजच्या नाइटशिफ्टने ‘रात्री’चे भय नाहीसे केले असले तरी जंगलातील रात्री मनातून थोडीतरी घाबरवणारीच. एरवी दीड-दोन वाजलेत वाटावं असं नऊ-दहा वाजताचं वातावरण. निरव शांतता, पक्ष्यांचे, प्राण्यांचे आपापले आवाज, झाडाच्या पानाची सळसळ अशी सारी हालचाल… जंगलातील ‘अवघड’ वाटेवरून धावणारी गाडी आणि बॅटरीच्या झोतात भिरभिरणाऱ्या नजरा… मस्त माहोल. आत्ताच सुरू झाली आहे अशी वाटणारी दोन तासाची सफारी संपते तरी कळत नाही.

एकूणच आयुष्यात फुरसतीचे मिळणारे दोन क्षण कृत्रिम हवेत घालवण्यापेक्षा मोकळी हवा भरून घ्यायला निसर्गाकडे यायला हवं.  त्याच्या अटीवर, त्याला शरण जायला हवं. हे त्याचं राज्य, त्याचं जग आणि इथे फक्त निसर्गाचे इशारे चालतात, हे मान्य करण्यासाठी यायला हवं. कधी मिळणारं भरभरून दान, कधी रिते हात, कधी प्रतीक्षा, कधी हुरहुर सारं ‘स्वीकारण्याची’ तयारी जोखण्यासाठी यायला हवं. सातपुड्याच्या अनोख्या जंगलानं अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. केवळ सफारीचा आनंद, सहलीची मजाच नाही तर वेगळी दृष्टी, दिशा दाखवली. आपल्या चकचकीत एसीच्या हवेतून खुल्या आकाशात फिरण्याचा निर्भेळ आनंद दिला. नवी उर्मी मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा येण्याचा निर्णय परतेपर्यंत निश्चित झाला होता.