अस्वस्थता आणि
हतबलता
स्टेशनला येण्यासाठी
रोज शेअर रिक्षाचा प्रवास नित्याचाच. रिक्षाने स्टेशनला उतरले की दहा रुपये
द्यायचे आणि दोन रुपये परत
मिळणार हे ही ठरलेलेच. पण हेच दोन रुपये मागण्यासाठी त्याचवेळी तीन चार हात
सरसावतात. अत्यंत केविलवाणे चेहरे करून, भर उन्हात ही
चिमुकली मुले उभी असतात. त्यांच्याकडे बघून अस्वस्थ वाटू लागतं. दोन रुपये दिले तर
काय फरक पडेल, असा विचारही मनात येतो. पण त्यांच्या हातावर
पैसे टेकवणे हे प्रश्नाचे उत्तर नाहीच, असं पुढच्याच क्षणी
वाटतं.
रोज असे पुढे
येणारे हात सतत अस्वस्थ करत असतात. स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्येच तान्ह्या
बाळाला झोपवून त्याचा भाऊ पैसे मागत असतो. दोन-तीन वेळा या मुलांना बिस्कीटे, चणे-दाणेही दिले. पण त्यांचे आणि आपले
क्षणिक समाधान एवढेच त्याचे फलित. खूप अस्वस्थ वाटूनच माझा रोजचा प्रवास सुरू होतो. पण एका घटनेने मात्र
तिडीक गेली… या मुलांबाबतची अस्वस्थताही तितकीच वाढली.
एकदा अशीच दोन
मुले भीक मागायला नकार देत होती. तर जवळच बसलेल्या त्यांच्या बाप दोन सणसणीत
लगावून त्यांच्या अंगावर गेला. पैसा माँगना ही पडेगा, असे दटावू लागला. एवढी लहान मुले आणि
त्यांना होणारी मारहाण खूप संताप झाला. त्याला दोन शब्द सुनावण्यासाठी गेले. हातीपायी
धड आहात, तर तुम्ही काम करा, स्टेशनचे
काम सुरू आहे, तिथे शेकडो कामगार काम करतात, तिथे तुम्हाला जायला काय होतं, असे अनेक प्रश्न
त्याला विचारले. पण तो निर्विकार… आपको
पैसा देना है तो दे दो नही तो जाओ अपने रस्तेसे, असे
उर्मटपणे सुनावले… पैसे मागण्यासाठी केविलवाणे होणारे हेच का
ते लोक, असं वाटू लागलं. ये धंदे मे अच्छे पैसे है… बच्चे जितना रोएंगे, गिडगिडाएंगे उतना पैसा ज्यादा, ये सरासर हिसाब है,
असे निर्लज्जपणे त्याने सांगितले. मुलांना कामाला लावलं तर पोलिसांत
जाईन, असं म्हटल्यावर हसत म्हणाला, उनको
पता है सब… वो कुछ नही करेंगे… मी हतबल. एकीकडे गाल चोळत टिप गाळणारी ती मुलं, भुकेपायी समोरच्याकडे पैसे मागण्यासाठी
पुढे होणारे त्यांचे हात आणि त्यांचा निष्ठुर, उर्मट,
बिनकामाचा बाप… कशाचाच अंदाज लागत नव्हता. त्या मुलांच्या वाट्याला आलेल्या अशा जगण्याबद्दल अधिकच
खिन्नता, अस्वस्थता वाटत होती तर
समाजातील या फुकट्या वृत्तीचा अतोनात संताप येत होता. त्या माणसाला जाहीर चार
सणसणीत शिव्या देऊन चालते होणे, हाच पर्याय होता.
व्यवस्थेच्या परस्पर ‘सहकार्य’ संबंधांमुळे
अशा सामाजिक प्रश्नावर कायमचे उत्तर असे आपल्याकडे नाहीच ना… पण आजही रिक्षातून बाहेर पडताना ते हात समोर आले की अस्वस्थ
वाटतेच… त्यालाही पर्याय नाहीच!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा