गुरुवार, २६ जून, २०१४

अन्याय भिरकावलेली…


भर दुपारची वेळ लोकल, लोकलमधील प्रवासी सारेच थोडे सुस्तावलेले. एवढ्यात महिलांच्या डब्यामध्ये असणाऱ्या दोन विक्रेत्या महिलांचा संवाद कानावर पडला. संवादच तो. सुखदुःखाची वाटणी. अश्रूला वाट करून द्यायची नी पुन्हा पदर खोचून उद्योगाला लागायचे. त्यातील एक जण अगदी पंचवीस ते तिशीच्या आसपासची. ती नवरा, घर असं काही बोलू लागली अन् अचानक अश्रू अनावर झाले. थोडा वेळाने आवंढा गिळला आणि संतापानेच कर्मकहाणी सांगू लागली.
नवरा गवंडीकाम करतो. दारूचे व्यसन आहेच.  आज काम तर उद्या नाही, अशी गत दारूला पैसाही हिच्याच पदरचा. दिवसभर लोकलमध्ये काहीबाही कमावून जे मिळवायची त्यातून पोरींना दोन घास खाऊ घालत होती. त्यातूनही काही, नवऱ्याच्या दारूसाठी.  हे सारं मान्य करत संसाराचा गाडा ती रेट होती. पण दोन मुलींच्या पाठीवर तिसरी मुलगीच झालीअन् सारं बिनसलं. नवऱ्याने दुसरा घरोबा करत तिला तीन मुलींनिशी हाकलून दिलं माहेरी अठराविश्व दारिद्य्रत्यामुळे तिथे आसरा मिळणं कठीणच. आता गोवंडीला शेजार पाजारांच्या आधाराने राहातेय पण पदरात असलेली तीन मुलींसह जगणं, उभं राहणं त्यात नवऱयाने टाकलेली हेबिरूदसोबत घेत, अनेक नजरा झेलत, चुकवत जगायचं म्हणजे कधी तरी अवसान गळायचंच तिची कहाणी ऐकून हादरले मुलाच्या हट्टापायी अशा कितीतरी शेवंतांना आज बेघर व्हावं लागलंकुणी आत्महत्या केल्या, कुणी लाचारीचं जिणं आपलं मानू लागल्या पण या शेवंतामध्ये मला वेगळीच चमक दिसली.
लोकलमध्ये आपल्या सखीशी बोलता बोलता अचानक अश्रू तिने आवरले नवऱयाने टाकलं म्हणून काय झालं? नाहीतरी घर मीच चालवत होते. त्याच्या दारूलाबी पुरत होते. माझ्या तीन पोरींना मी वाढवेन, समाजापासून, वाईट नजरांपासून जपेन. त्यांचा बाप नी माय दोन्ही होईन, पण जीव नाय देणार आणि त्याच्या पायाशी बी नाय जाणारसंकटाचा डोंगर कोसळला असतानाही ताठ उभं राहण्याची तिची जिद्द पाहून चमकले. तिन्ही मुली तिच्या भोवती फिरत होत्या. फाटके फ्रॉक घातलेल्या अनवाणी, काहीशा भुकेलेल्या आणि  सगळ्याच प्रसंगांमुळे भेदरलेल्या एकाच वेळी मी सुन्न झाले, संताप आला, कौतुक वाटलं आणि त्या मुलींच्या आजच्या अवस्थेमुळे काळजीही वाटली.
ताई आता मी माझ्या दूरच्या आत्याला बोलावलय माझ्याकडे रहायला गोवंडीत झोपडं मिळालय ती पोरींना तर सांभाळेल. मी इथे माझी काम करेन. सकाळी भाजी पण विकणारे जेवढं जमेल तेवढं करेन. पोरींना शाळेत पण घायलाचंय तिच्याजवळ तिला काय करायचंय हे सारं तयार होतं आणि महत्त्वाचं कुणापुढे हात पसरायचे नव्हते स्वाभिमानाने जगायचं होतं. परिस्थितीच्या तडाख्याने ती हाललेली पण कोलडून पडली नाही. त्या परिस्थितीला शिंगावर घेत लढायला तयार झाली. कुर्ल्यात ती उतरूनही गेली पण माझ्या डोळ्यासमोरचीतिची १५ मिनिटांत दिसलेली वेगवेगळी रूपं हलत नव्हती. मी तिला दुसऱ्या दिवशी त्याच लोकलला नक्की भेटायला सांगितलं..
दुसर्या दिवशी आमची भेट झाली भाचीने केवळ कंटाळा आला म्हणून फेकलेले बूट, तिचे तिला काही फ्रॉक, माझे काही बरे ड्रेस अशी पिशवीच तिच्या हातात ठेवली यात नवं काही नाही, पण तरीही तुला कामात येईल वाटलं म्हणून आणलं तिच्या मुलींसाठी सहजच थोडा खाऊ दिला. तिच्या चेहर्यावर आनंदाची, समाधानाची लकेर उमटली पुन्हा कुर्ल्यात उतरताना म्हणाली पैसे पुढे केले नाहीत, हे फार बरं झालं पण तुमच्या या मदतीने माझी काही काळाची अंग झाकण्याची आम्हा सगळ्यांची चिंता मिटवलीत दहा वेळा आभार मानत ती उतरली पण माझ्या नजरेत ती आणखी मोठी झाली
आज जगात अनेक शेवंता, त्यांच्या पातळीवर त्यांच्या लढाया समर्थपणे लढत असतील नाकारलेपणाच्या जगण्यावर थुंकून आपलं विश्व उभारत असतील त्यातल्याच एकीला मी ओळखते, ​याचं मला खरंच समाधान आहे छोट्या छोट्या गोष्टी न मिळाल्याने संतापणारे, अन्यायाची भाषा करणारे आपण आणि सगळच नाकारलेलं असताना ठामपणे उभे राहिलेली ती दोन्हीतलं अंतर, विचार लख्खपणे जाणवलं!!! खरं तर स्वतःत नव्याने डोकावण्याची गरज वाटली

1 टिप्पणी: