शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

थांबवा हा उन्माद


दहीहंडीच्या सरावादरम्यान सानपाड्यात १४ वर्षांच्या बालगोविंदाला पाचव्या थरावरून पडल्यामुळे जीव गमवावा लागला. किरण तळेकर या लहानग्याला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी या खेळाबाबत संताप व्यक्त केला. पण आपल्या मुलाला अशा जीवघेण्या खेळाकडे जाण्यापासून रोखण्याची जबाबदारीच खरं तर त्यांची नव्हती का?
या घटनेआधीच तीन दिवस मुंबईत करी रोड येथील एक तरुण थरावर पडला आणि मानेला गंभीर जखम झाली. त्याच्यावर ऑपरेशन करण्याची वेळ आली. या घटनेनंतरही बालगोविंदांना दहीहंडीत खेळवायचेच, राजकीय आग्रह, मंडळाची हटवादी भूमिका हे सारं सुरू झालं. दुर्घटनेनंतरही आत्मपरीक्षण करण्याचा विचार नाही, इतका हा उन्माद फोफावला आहे.
छोट्या वाडीमध्ये, चाळीमध्ये वेगवेगळ्या घरातील मुलांनी, तरुणांनी एकत्र येत दोन तीन थरांची छोटेखानी दहीहंडी रचत, या सणाचे मर्म असलेल्या मस्त दहीकाल्याचा आस्वाद घ्यावा, इतकं माफक खरं तर या सणाचे महत्त्व. छोट्याशा हंडीत असणारा इतकासा कालाही सगळ्यांनी वाटून घेत खाण्याची सवय लावणारा आणि देण्यातील आनंद शिकवणारा हा सण. त्यातही एकमेकांवर थर लावताना दुसऱ्याबाबत असलेला विश्वास, खात्री दृढ व्हावी, जबाबदारी घेण्याची सवय लागावी, असाही एक त्यामागचा दृष्टिकोन. पण काळानुरूप जसे इतर सणांचे अवडंबर माजून त्यामागचा मूळ दृष्टिकोन लयास गेला. तसेच दहीहंडीचे झाले. या सणातील दहीकाल्याची मुलांना वाटणारी मजा जाऊन त्याची जागा आधी स्पर्धेने आणि आता राजकीय चढाओढीने घेतली आहे. निखळ आनंदाऐवजी त्यात पैशाची बाजू वरचढ झाली.
दहीहंडीमध्ये या आर्थिक स्पर्धेबरोबरच थरांच्या उंचीची स्पर्धाही रंगू लागली. नऊ, दहा अशा या थरांसाठी मग लहान मुलांचा सहभागही अपरिहार्य झाला. अगदी तीन वर्षांपासूनच्या मुलांनाही या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाऊ लागले. वजनाने हलकी असलेली ही मुले वरच्या थरांसाठी उपयुक्त ठरू लागली आणि लहान मुलांना वेठीस धरण्याची स्पर्धाच जणू मंडळांमध्ये लागली.
दहीहंडीचे राजकीयीकरण झाल्यापासून त्याचे स्वरूपच बदलले. आधी मैदानात होणाऱ्या हंड्या आता रस्त्यावर, चौकाचौकात आल्या. त्यामुळे या खेळासाठी आवश्यक नियम, जागा, पद्धती सगळ्यांनाच फाटा दिला गेला. कुठल्याही खेळाच नियम असतात. त्यासाठी खास सुरक्षेची तयारी करावी लागते, ही बाब विसरून त्याचे उन्मादात रूपांतर झालेय आणि त्यामुळेच कुणीही जखमी होवो, कायमचे अपंगत्व येवो किंवा काही, आम्ही बदलणार नाही, अशी पद्धती आता रूढ झाल्याने लहान मुलांसह तरुणांचे जीव या खेळात टांगणीला लागत आहेत.
दहीहंडीच्या या स्वरूपाविरोधात अनेकांनी कोर्टात धाव घेतली. माध्यमातून चर्चा झाल्या. कुणी उघडपणे तर कुणी मनातून सध्या सण ज्या पद्धतीने साजरा होतो, त्या पद्धतीला विरोध करू लागले. त्यांच्यातीलच एक असलेल्या पवनकुमार पाठक यांनी बालहक्क आयोगाकडे मुलांच्या हिताच्या दृष्टीने धाव घेतली. या खेळात लहान मुलांच्या सुरक्षेचा कोणताही विचार होत नाही. लहान वयात झालेल्या इजांचे आयुष्यभर परिणाम भोगावे लागतात, कुणाला कायमच अपंगत्व येऊ शकतं, तसेच उंचीवरून पडल्याने असणारा मानसिक धक्काही मोठा असतो, याकडे या तक्रारीतून लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे. बालहक्क आयोगानेही या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेत १२ वर्षांखालील मुलांना सहभागाची बंदी घातली आहे. मात्र त्यावर सणांतील हस्तक्षेप असा कांगावा करत नियमभंग करण्याचा हट्ट मंडळांनी धरला. राजकीय उंबरे झिजवले. मोठमोठ्या वल्गना केल्या. मात्र निवडणुका लक्षात घेत सरकारने भूमिका जाहीर करणे टाळून सकारात्मक ​भूमिकाच घेतली आणि मंडळांना दोन पावले मागे जाणे भाग पाडले.
डांबरी रस्त्यांवर प्रचंड गर्दीत मुलांना असे थर लावत आठव्या, नवव्या थरावर चढवले जाते. त्यामुळेच त्यांच्या जीवाला असलेला धोका वाढतो. बालहक्क कायद्याच्या सेक्शन ८४ अन्वये मुलांची सुरक्षा महत्त्वाची मानली जाते. मुलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या पालकांसह इतरांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळेच या खेळात मुलांना सहभागी करून घेणारे आयोजक, मंडळे यांच्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेशी खेळणारे पालकही तेवढेच जबाबदार मानले जाणार आहे. याप्रश्नी आयोग १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना या खेळात सहभागी होण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाला अनेक थरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा निर्णय केवळ मुलांची सुरक्षा आणि हितासाठीच असेल, अशी ठाम भूमिकाही आयोगाने घेतली आहे.

या बंदीचा अर्थ कुठलेही सणच साजरे करू नका, साहसी, धाडसी खेळच मुलांनी खेळायचे नाही असा नक्कीच नाही. मात्र प्रत्येक धाडसी खेळाचेही काही नियम, अटी असतात. असे खेळ खेळण्याची योग्य जागा, आवश्यक तो पुरेसा सराव, सातत्य आवश्यक असते. मुख्य म्हणजे त्यात हुल्लडबाजीला थारा नसतो. मात्र केवळ राजकीय स्पर्धेपोटी महिन्याभराच्या सरावावर भर चौकात असे जीव टांगणीला लावणे, याचे संस्कृतीच्या नावाखाली समर्थन कसे होऊ शकते?
सानपाड्यातील बालगोविंदाचा गेलेला जीव, आजवर अनेक तरुणांची एक प्रकारे झालेली हत्या आणि जखमी अवस्थेत अनेकांचे टांगणीला लागलेले जीव या साऱ्याचाच एकत्रित विचार करून सणाच्या नावाखाली चाललेल्या हुल्लडबाजी आणि उन्मादाला आता आवरायलाच हवे. त्यादिशेने बालहक्क आयोगाने घातलेल्या नियमांच्या पुढे पाऊल टाकत सरकारने चौकाचौकातील थरांच्या जीवघेण्या स्पर्धेवर बंधने आणून चांगला पायंडा पाडावा आणि सणांचे ‘आनंदी’ स्वरूप टिकवावे, ही अपेक्षा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा