शनिवार, ९ मे, २०२०

नीले गगन के तले…!


निळाशार अथांग समुद्र, डोक्यावर निरभ्र आकाश, किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा नि, उसळणाऱ्या पाण्याचा लयबद्ध आवाज. अशातच अचानक आकाशात तांबूस, सोनेरी किरणे दिसू लागतात. तांबडं फुटतं नि नव्या कोऱ्या दिवसाची चाहूल लागते. किनाऱ्यावर थडकणारे हे पाणी कापत, त्यातून आपली वाट काढत लांबवर लाटांचा आवाज ऐकत चालणं, नि दिवसाची चाहूल घेत नवी स्वप्न रंगवणं म्हणजे स्वर्गसुख. इतर कुठलेच आवाज न ऐकता फक्त लाटांच्या आवाजावर लक्ष दिलं तर एक छानशी लय सापडते. खोलवर समुद्रातून उसळी घेत पाणी किनारा गाठण्याचा प्रयत्न करत असतं. सोसाट्याच्या वाऱ्यानं कधी दिशा भरकटते, कधी अर्ध्या प्रवासातच लाट विरून जाते. पण उसळी घेतल्यानंतर निग्रहाने, हवेच्या वेगाशी जुळवून घेत, आव्हानं परतवत काही लाटा त्यांचा किनारा गाठतातच. प्रत्येक लाटेला हे साधत नसलं तरी उसळी घेण्याचा धर्म समुद्र नि पाणी सोडत नाही. किनारा मिळाला नाही, म्हणून सुरुवात-प्रवासच व्यर्थ होता असंही नाही. कुठे तरी पोहोचण्यासाठी केलेली सुरुवात, नि प्रयत्न काही तरी तर शिकवून जातातच.
मला या समुद्राचं प्रचंड आकर्षण वाटत आलंय. त्याची विशालता अचंबित करते. समुद्राचा तळ न लागणं, भरती-ओहोटीच्या तालावर ‘उसळी’ निश्चित करणं, काही तरी खूप आतपर्यंत ओढून नेणं नि काही बाहेर सोडून येणं सारंच खूप जवळचं नि आपल्याशी जोडलेलं वाटत आलंय. ठराविक लयीनं समुद्रावर लाटा थडकत असताना अधिकाधिक पुढे जाण्याचा मोह होतच असतो. पायाखालची वाळू सरकत असते, नि आणखी पुढे पाऊल टाकून आपण नव्या वाळूवर पाय ठेवतो. तीही सरकू लागते, मग आणखी पुढचं पाऊल. अचानक एक मोठी लाट उसळून येते नि पाणी गळ्यापर्यंत लागून आपण घाईघाईनं बाहेरची वाट शोधतो. परतताना वाळू अधिकच सरकतेय, असं वाटतं. तरी किनारा गाठण्याचं बळ आपणही पाण्यासारखंच गोळा करतो. किनाऱ्यावर आलं की काही क्षणानंतर पाण्याच्या उसळी मारण्याचं, वेगाचं नि सरकणाऱ्या वाळूचं आश्चर्यच वाटू लागतं. कारण समुद्राच्या लाटा पुन्हा लयीत उसळत असतात, वाळू त्याच लयीशी जुळवून घेत वाहत असते, नि सारं काही शांत असते. क्षणापूर्वीच्या उसळीचा आता मागमूसही दिसत नसतो. किती विलक्षण चक्र आहे ना हे समुद्र, पाणी, लाटा, वाळू नि वाऱ्याचं. आपलं जगणंही असंच एका लयीत सुरू असतं. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते. यानंतर हे करायचं, इथे जायचं, ही वेळ कशाचीये, सगळं आपण आखलेलं असतं. पण अचानक एखादी लाट उसळते, वाळू सरकू लागते. अवलंबून असलेल्यातलं काही बिनसतं नि पुन्हा सगळं जुळवत नव्यानं सुरुवात करावी लागते. पण उसळी मारण्याचा काळ नि विस्कटलेलं सांधण्याचा अवधी सावरता आला की किनारा दिसू लागतोच ना? पण त्यासाठीच बळ नि इच्छाशक्ती गोळा करता यायला हवी. हे साधणं सोपं असतं?

कुलदेवतेच्या दर्शनाच्या निमित्ताने आम्ही लहानपणी खूपदा गोव्याला जायचो. मंदिरात जाणार यापेक्षाही आपण समुद्रावर जाणार याचा कोण आनंद व्हायचा मला. अख्खा दिवस आम्ही पाण्याभोवती काढायचो. भर दुपारच्या टळटळीत उन्हात आईबाबा त्यातल्या त्यात सावली शोधून लांब न्यायचे. पण तितकंच. नाही तर मी अखंड पाण्याशी असायचे. समुद्राच्या वाळूत किल्ला करायचे. एका लाटेनं अर्धा उभा राहिलेला किल्ला वाहून जायचा. मी खट्टू व्हायचे. मग बाबा यायचे. अरे अर्धाच तर झाला होता, पुन्हा बांधू या म्हणत ते स्वत: वाळूत हात घालून माझ्या बांधणीच्या स्वप्नाला आकार द्यायचे. मला लय सापडलीये, हे कळलं की हळूच बाजूला व्हायचे. किल्ला पूर्ण झाला की निरखताना कोण आनंद व्हायचा. चिकाटी सोडली नाही, याचा आनंद बाबांच्या चेहऱ्यावरही दिसायचा. किती छोट्या गोष्टीतून टिकून राहण्याचे धडे आपल्याला मिळतात नाही?
शाळेतली महत्त्वाची वर्ष, मग कॉलेज, स्वप्नांचा पाठलाग यात समुद्र मागे पडला. कुलदेवतेच्या दर्शनालाही आता आईबाबाच जात होते. पण करिअरच्या निमित्ताने मुंबई गाठली. समुद्र नव्या रूपात भेटला. गोव्यासारखे स्वच्छ किनारे नि किल्ले बांधण्याची चैन इथे केली नसली तरी मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर बसून अस्ताला जाणारा सूर्य, लाटांचा आवाज ऐकणं, हे कमालीच सुख वाटतं. बाजूने गाड्या त्यांच्या वेगाने धावत असतात. कुणाला वेळ गाठायची असते, कुणाला लोकल पकडायची असते. पण आपण त्या जगाचा भागच नसतो. आपल्या कानावर फक्त समुद्राच्या लाटांची उसळी, स्थिरावणं पडत असतं नि आकाशात भडक रंग विरून सूर्य अस्ताला जात असतो. हे सारं पुन्हा पुन्हा नव्याने अनुभवायला फार आवडतं. सूर्य अस्ताला जात असतानाच्या कातरवेळची हुरहूर जाणवू लागते. त्याचवेळी घड्याळ वेळ दाखवत परतीचा इशारा करत असतं. गेले कित्येक वर्ष दिवसाच्या सगळ्या वेळांचा समुद्र मी अनुभवला. मुद्दाम जाऊन त्या त्या वेळचे बदल पाहिले. ऐकले! काळ-वेळ नि परिस्थितीशी जळवून घेणं, समरसून जाणं, तो आपल्याला वारंवार शिकवत असतो. आपल्याला ते किती घेता येतं नि अंमलात आणता येतं हा प्रश्न असतो. जुळवून घेणं, समरसून जाणं निश्चितच सहजसाध्य नसतं.

डिसेंबर महिन्यात कुठे तरी जायचं असं मी नि मैत्रीण ठरवत होतो. तारीख ठरलेली, पण ठिकाण ठरेना. गूगलवर अर्धा देश फिरून नि स्वप्नांत त्या ठिकाणांवर पोहोचून नियोजनाच्या पातळीवर पुन्हा नेटवरच परतत होतो. अखेर यावेळी ठरलं नाहीये तर गोवाच जाऊया असं म्हटलं नि मडगाव गाठलं. तिचा पिंड पक्षी, निसर्ग निरीक्षणाचा. माझी ओढ समुद्राकडे. मग आम्ही दिवस विभागले नि नेत्रावळी अभयारण्य गाठलं. तिच्याबरोबर फिरताना जंगलाचा आवाज ऐकायला खूप आवडतो. ठराविक वेगानं वाहणारे वारे, पानांची लयबद्ध सळसळ, पक्ष्यांचे आवाज, एकमेकांना खुणावणं नि आकाशात विहार करणं हे सगळं नोंदवणं खूप छान असतं. अनेक पक्ष्यांची ओळख झाली. जे पुन्हा पुन्हा भेटले ते लक्षात राहिले. ती मात्र नेटानं नव्यांशी ओळख करून देत राहिली. रंग, रूप, आकार, चोच, शेपटी, आवाज, त्यांचा कानोसा असे बारकावे सांगत राहिली. मी ही मनापासून समजून घेत राहिले. विस्तीर्ण जंगलामध्ये किर्रर्र शांतता नि दोघींचं काही तरी न्याहाळत चालणं.. हा अनुभवच भारी. जंगलाची शांतता, तिथलं वैभव आणि मुख्य जंगलाचा आवाज मनात साठवत आम्ही समुद्र गाठला. जुन्या आनंदाशी नव्याने भेट झाल्यासारखं वाटलं.
आम्ही निघाल्यापासून मी तिला सांगत होते, सूर्य उगवताना किंवा अस्ताला जातानाची वेळ आणि किनाऱ्यावर थडकणाऱ्या लाटा कापत, त्यांची लय ऐकत मला दूरवर चालत जायचंय. खूप दिवस हे मनाशी ठरवून आहे. स्वच्छ आकाश निरखायचंय, पाण्याचं उसळी मारणं अनुभवायचंय. वाळू सरकताना तोल सावरायचाय नि खोल आत चालत जाऊन वेगानं पुन्हा किनारा गाठायचाय. माझं सारंच ठरलेलं. मला काय करायचंय, हवंय हे मला माहित होतं. त्यामुळे किनाऱ्यावर उभं राहून दुरून निरखण्याची भूमिका तिच्याकडे आली. अस्ताला जाणारा सूर्य पाहिल्यानंतर उगवतीची ओढ लागली होती. पहाटेच पुन्हा किनारा गाठला. तांबडं फुटलं नि हायसं वाटू लागलं. काही तरी जसं डोळ्यादेखत संपलं होतं, तसंच नवं काही सुरू होणंही अनुभवता आल्याचा आनंद होता. त्याचवेळी लाटांची गाज कानात साठवत दूरवर पाणी कापत चालत होते. मला जे जे करायचं होतं, ते ते मी करू शकले याचा आनंद मनात नि चेहऱ्यावर दिसत होता. थोडा वेळानं समुद्राचं उसळणं शांत झालं नि लाटांचा वेळ मंदावला. पाणी आत ओढलं जाऊ लागलं. पाण्याची ओढ आपल्यालाही खेचत असल्याची जाणीव झाली नि तोल सावरून आता बाहेर पडायचं, अशी वर्दी मिळाली. तो क्षण कायम महत्त्वाचा वाटत आलाय. बाहेर पडण्याची ती वेळ साधता आली की आपलं गणित चुकत नाही नि गोळबेरीज करून उत्तर बरोबर आणण्याचा आटापिटाही करावा लागत नाही. पण अनेकदा ही वेळच चुकते, नि बाहेर पडून नव्या सुरुवातीचीही संधी हुकते. शांततेचा थोडा काळ तग धरला नि संयम ठेवला की लाट, पाणी, समुद्र नि आयुष्य पुन्हा उसळी घेणारंच असतं. माझ्यापुरती अनेक गणितांची उकल करत, उगवत्या सूर्याबरोबर नव्या स्वप्नांची जुळवणी करत, काही जुनी स्वप्ने नव्याने पाहत मी परतीच्या गाडीचा वेग धरला!!!
आपल्यालाही आता स्वप्नांची नव्यानं आखणी करायचीये. पूर्वीचे ठोकताळे कदाचित जसेच्या तसे आता लागू होणार नाहीत. त्यात बदल करावा लागेल. शांततेचा काळ तग धरल्यानंतर आपलं आयुष्यही पुन्हा उसळी घेणारंच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा