रविवार, १० मे, २०२०

जगणं हिरावलं…!
करोनाच्या आपत्तीनं काय केलं? कुणाचं गाव तर कुणाचं घर दूर राहिलं, कुणाकुणातील माणूसपण हरवलं नि अनेकांचं जगणं हिरावलं. आजवर आधार वाटत आलेल्या मुंबईत एकेक दिवस ढकलणं कठीण होऊन बसलं, नि मिळेल त्या वाहनानं, नाहीतर चालत ते गावची वाट धरू लागले. करोनाच्या काळात इथेच रहा, प्रशासन तुमची व्यवस्था करेल, असं कितीही म्हटलं तरी गेल्या ५० दिवसांत या मंडळींची हातातोंडाची लढाईच सुरू आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. ‘गांव जा के राशन का चावल गेंहू तो मिलेगा. बाकी नही तो पानी के साथ खा लेंगे। यहाँ भूँखे मरनेसे तो सही है ना। आज बम्बई जिने भी नही दे रही और मरने भी’, श्रमिकांची ही भावना विचार करायला लावणारी आहे. संकट मोठं नि अनपेक्षित आहेच. पण त्यात माणसाचं जगणंच पणाला लागल्याची स्थिती आहे. ११००-१२०० किमी अंतर कुणी आनंदानं नाही तुडवतं, नि पर्याय असताना कुणी उगीच नाही रुळांवर झोपत!

मी मुंबईत आले तेव्हा वॉचमनला मुद्दाम सांगितलेलं, मला घरकामाला मराठी कुणी मिळालं तर बघ. वॉचमनने सांगितलं भाभी यहाँ पे मराठी नही मिलेगा. वो सब बडे घर मे काम करते है, वो भी दिन भर का.. आपको चाहिए तो बंगाली रखना पडेगा. त्यावेळी नुकतीच बंगालहून मुंबईला आलेली रूपा कामाला येऊ लागली. गेली १३ वर्ष ती माझ्याकडे काम करतेय. दीड वर्षानी एकदा महिना दोन महिने ती गावी जाते, तर माझ्यासाठी तो संकटकाळ असतो. मुलीचं लग्न, बाळंतपण, मुलांना नोकरी बघा, पॉलिसी कोणती काढू, त्याच्या हप्त्याचे पैसे पगारातून काढून ठेवा, अशा असंख्य गोष्टी सुरू असतात. ती अत्यंत व्यवहारी. नवऱ्याला न सांगता अनेक गोष्टी राखून ठेवायच्या म्हणून माझ्या घराच्या कप्प्यात तिचं बँकेचं पासबुक साठवलेले पैसे काहीबाही असतं. पैसे साठले की स्लिप भरून नेते आणि आईला गावी पाठवते. परवा ती घरी आली. दिदी यहाँ पे गरीबों को राशन दिया जा रहा है, तो पूँछते है मराठी है क्या? मेरे बगल में रहनेवाले सबको मिला, हमे नही। यहाँ पे राशनकार्ड भी नही चलता, गाँव का है तो. मराठी को दे सकते है तो हमें क्यूँ नही? हम क्या भूँखे मर जाए? गावी जाण्यासाठी तिने अर्ज केलाय. हज्जारदा तिला बजावतेय, रेल्वेनेच जायचं. पण संयम राखणं कठीण होत चाललंय त्यांच्यासाठीही. दुपारी फोन केला नि म्हणाली वो ममता हमें गाव जाने देगी ना? गाँव के सब बोल रहे है की आने नही देंगे क्या करे दिदी, जान तो हमारीही जाएगी.. दोनो तरफसे!

इस्त्रीवाला भैया परवा लगबगीनं आला. महिन्याचे पैसे नि थोडे जास्तीचे मिळतील का विचारलं? खोदून विचारलं तरी कारण नाही सांगितलं. मला वाटलं सध्या काम नाही, तर धान्यासाठी असणार. आज फोन केला तर दुकान बंद करके गाँव जा रहा हूँ म्हणाला. एकदा सांगितलं असतं तर आपण बघितलं असतं ना काही, असं म्हटलं तर उत्तर होतं सरकार की तरफ सें गरीबों के लिए कुछ नही होगा भाभी हम बहोत लोग जा रहे एक ट्रक से। मुंबई में रहना मुश्कील हो गया था भाभी.. दुकान का रेंट, खाने का इंतजाम कैसे करते? ये कब खत्म होगा ये भी पता नही.. दो महिने में किसीने राशन नही दिया.. यूपीलाच राहणारा वॉचमन असाच रात्री निघून गेलाय नि आता अनेक सोसायट्यांत पाणी कोण टाकीत चढवणार इथून प्रश्न आहे.

परराज्यातून पोटापाण्यासाठी आलेली ही मंडळी. मिळेल ते काम करत मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याचा अर्ध्याहून अधिक वाटा ते उचलताहेत. आज त्यांची अस्वस्थता वाढतेच आहे. पण आपल्याच राज्याच्या कुठल्याशा भागातून आलेली मंडळीही आता अस्वस्थ होऊ लागली आहेत.

पाम बीचच्या सिग्नलजवळ एक आजीआजोबा सावलीला बसलेले. कुठून आलात, नि जायचंय कुठे विचारलं तर लॉकडाउनआधी उपचारासाठी ते मुंबईत आले होते. कर्नाटक सीमेवर त्यांचं गाव आहे, असं त्यांनी सांगितलं. लॉकडाउनपासून कुठल्या शिबिरात, छावणीत राहिले. मग चालत नवी मुंबईपर्यंत आले नि आता त्यांना कुठलासा टेम्पो गावी नेणार आहे. सीमेवरून आलेल्या दुधाच्या गाडीतून ते जाणार होते. कुणी त्यांना बिस्किटे दिली कुणी आणि काही. आम्ही कुणाकडं मागून खाल्लं नाही ग पोरी आजवर. मुंबईत कुणी नाही आमचं. आलो नि फसलो. पण काय वेळ आलीये बघ आमच्यावर, असं ते म्हणत होते.

चार घरी स्वयंपाक करणाऱ्या ताई सकाळी भाजी विकताना दिसल्या. काय चाललंय इतकंच विचारलं तर अस्वस्थ झाल्या. त्यांचा नवरा ड्रायव्हरचं काम करतो. मालकानं एक महिन्याचा पगार दिला, पण पुढचे महिने कसे काढणार? यांची स्वयंपाकाची कामं थांबलेली. भाजी विकून पैसे मिळवावे म्हटलं. मालकानं सकाळीच भाजी आणली नि मी विकायला घेऊन आले. पश्चिम महाराष्ट्रातून येऊन इथे राहत असलेल्यांपैकी या एक. अशा अनेकजणी रांगेत भाजी, फळं, दूध विकत होत्या. पण रस्त्यावर बसून सामान विकताहेत म्हणून पोलिसांनी माल जप्त केला. ताई २५०० चा माल गेला.. कांदे बटाटे नि टोमॅटो नाही नेले. म्हणजे ते विकून चालणार? कामच नाही तरी जगायचा प्रयत्न करतो तर असा त्रास. आता काय करू बाय बोल? त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर आज कुणाकडे आहे?

माझ्या घराच्या मागच्या सोसायटीत एका रिक्षाचालक राहतो. सांगलीच्या जवळचं कुठलं तरी गाव. मी ऑफिसला निघायच्या वेळी रोज तो भेटायचा नि मला स्टेशन सोडायचा. त्याच्या मुलांच्या क्लासची ती वेळ. त्यामुळे रिक्षात मुलं असायची. त्यांना क्लासला सोडून पुढे मला स्टेशन सोडायचा. मुलांनी शिकावं म्हणून प्रचंड कष्ट करतो. हवं ते देतो. शाळांची प्रगती सांगतो. काही नोट लिहून आली तर दाखवतो, विचारतो. परवा त्यांच्या घरातून प्रचंड भांडणाचे आवाज येऊ लागले. नंतर बायकोचा रडण्याचा आवाज. हा प्रचंड संतापून हात उगारत होता. घरातल्या भांडणात सहसा भाग नाही घ्यायचा, म्हटलं तर ती बाई कळवळून ओरडत होती. (याचा पूर्वानुभव भयानक आहे) म्हणून मी बाल्कनीतून आवाज दिला नि हात उगारू नको, पोलिसांना बोलवावं लागेल म्हटलं. तो संतापात खाली निघून गेला. संध्याकाळी बायकोनं आवाज दिला नि म्हणाली ताई हाताला काम नाही ना त्यांच्या. घरात पैसा नाही. गावी जाता येत नाही. तिकडे जाऊनही करणार काय? खूप अस्वस्थ आहेत. नाहीतर हात नाही उचलत कधी ते नंतर तो खाली भेटल्यावर त्यालाही हात नाही उगारायचा हे बजावलं.. पण अस्वस्थता, चिंता वाढतेय हे वास्तव कसं नाकारणार?

भाजी विकणाऱ्या मावशी, छोटे दुकानदार, स्वयंपाक करणाऱ्या काकू, कडधान्य विकणाऱ्या, नारळ-फळ विकणाऱ्या, पालेभाज्या निवडून देणाऱ्या अशा अनेक छोट्या छोट्या लोकांचं जगणं अशक्य झालंय आता. लॉकडाउन संपला तरी लगेच हाताला काम मिळेल याची आणि नाहीच संपला तर त्यांना जगण्याची शाश्वती नाही. एकेक दिवस त्यांना मोठा वाटू लागला आहे. संकटानं आपलं-परकं बघून वार नाही केलेत. अनेकांसाठी आज आभाळ फाटलंय नि ठिगळं लावणं त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मग प्रशासन, सरकार, विरोध पक्ष सगळ्यांनीच माणूस म्हणून आधार द्यायला हवाय. त्यासाठी तातडीने पावलं टाकायला हवी. राजकारण बाजूला ठेवून पायीच गावी जाणाऱ्या जत्थ्यांना थांबवत दिलासा द्यायला हवा. वाहतुकीची सोय वेगानं करावी. संकट गंभीर आहेच, पण रोगापासून वाचताना उपासमारीनं कुणाचं जगणं हिरावणार नाही, इतकी काळजी घ्यायला हवी. व्यक्ती, समाजाचा भाग म्हणून आपणही आपला खारीचा वाटा उचलायला हवाच.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा